Monday 31 May 2021

अहो आश्चर्यम्,फुलांचे आकार बाहुली,पक्षी, बदाम आणि माकडाच्या चेहऱ्यांसारखे!

मुलांनो,तुम्ही तुमच्या घरी-दारी,बागेत, शाळेत,कुठे माळरानावर विविध प्रकारची फुलं पाहिली असतील. काही फुलं अगदीच छोटी  किंवा मोठ्या आकाराची असतात. पण तुम्ही कधी एखाद्या बाहुलीसारखी दिसणारी,एखाद्या पक्ष्यासारखी अथवा माकडाच्या चेहऱ्यासारखी किंवा बदामाच्या आकाराची फुलं पाहिली आहेत का? नाहीच ना! पण अशा आकाराचीही फुलं या निसर्गसृष्टीत आहेत. चला, जाणून घेऊन या अशा फुलांविषयी!


डांसिंग गर्ल : इंपेटिएंस बेकुएरटी नावाच्या फुलझाडावर पांढऱ्या रंगाची फुलं फुलतात.ती दिसायला अगदी दोन्ही बाहू पसरून नाचणाऱ्या एखाद्या सुंदर बाहुलीसारखी दिसतात. त्यामुळे या फुलझाडाला डांसिंग गर्ल म्हणून ओळखले जाते. ही फुलझाडं पूर्व आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये आढळून येतात. ही फुलं पांढऱ्या रंगाबरोबरच हलक्या गुलाबी रंगाचीही असतात. फुलांच्या मधोमध बटनासारखी दोन पिवळ्या रंगाची संरचना असते. ही फुलं दिसायला खूप गोड दिसतात.


ग्रीन बर्ड फ्लावर : मुलांनो,तुम्ही टीव्हीवर किंवा चित्रात हमिंग बर्ड हा छोटासा पक्षी फुलांवर बसून मध शोषताना पाहिला असेल. मात्र जगात अशाप्रकारचं एक फुल आहे, जे अगदी फुलातून रस शोषणाऱ्या पक्ष्यासारखं दिसतं. हे हिरव्या-पिवळ्या रंगाचं फूल पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हिरव्या-पिवळ्या रंगाचा पक्षी फुलातून मध शोषत आहे, असं दिसतं. याला ग्रीन बर्ड फ्लावर किंवा रियल बर्ड फ्लावर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव क्रोटेलेरिया कनिंघमी असे आहे. याचा शोध एलन कनिंघम यांनी 1810 मध्ये लावला होता.हे फुलझाड उत्तर ऑस्ट्रेलियात सापडते.


ड्रॅकुला सिमिया: या फुललेल्या फुलाला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल हा माकडाचा चेहरा आहे. पण नीट पाहिल्यावर तुम्हाला ते एक फूल असल्याचं कळेल.ड्रॅकुला सिमिया प्रजातीचं हे रोप असून याला लिटिल ड्रॅगन मंकी किंवा मंकी ऑर्किड या नावानं ओळखलं जातं. हे रोप दक्षिण-पूर्व इक्वाडरच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात उंचावरील जंगलात आढळून येतं. या रोपाच्या फुलांच्या पाखळ्या लांब असतात. फुलाच्या मधे माकडासारखा चेहरा पाहायला मिळतो. ड्रॅकुला सिमियाची 110 पेक्षा अधिक प्रजाती आढळून येतात. एक फुल एका वेगळ्या रंगात आणि आकारात फुललेलं दिसतं. पण प्रत्येकात माकडाच्या चेहऱ्याचा आकार पाहायला मिळतो.


ब्लीडिंग हर्ट : ब्लीडिंग हार्ट ही पॉपी कुटुंबातील एक प्रजाति आहे. हे रोप लँडप्रोकॅप्नोस स्पेक्टेबेलिस, फ़ॅलोपियन बड्स किंवा एशियन ब्लीडिंग-हार्ट अशा नावांनी ओळखलं जातं. हे रोप सायबेरिया,उत्तर चीन,कोरिया आणि जपानमध्ये आढळून येतं. या रोपाचं फुल वसंत ऋतूमध्ये पत्त्याच्या पानातील बदाम चिन्हाच्या आकारात गुलाबी, लाल आणि पांढऱ्या रंगात फुलतं. बदामासारख्या दिसणाऱ्या या फुलामधून एक बट निघते. ही वेगळ्या रंगाची असते. लाल फुलाची बट लाल-पांढऱ्या रंगाची असते. गुलाबी फुलाची बट गुलाबी-पांढरी आणि पांढऱ्या फुलाची बट पांढऱ्याच रंगाची असते. या रोपाच्या एका फांदीवर ओळीने जवळपास वीस फुल फुलतात. ही फुलं पाहिल्यावर वाटतं की कुणीतरी कागदापासून बनवलेल्या बदामाच्या आकाराचे पताके झाडाच्या फांदीवर अडकवले आहेत. ही फुलं खूपच आकर्षक दिसतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Saturday 29 May 2021

तेल पाण्यावर का तरंगते?


आपण बऱ्याचदा पाहिले असेलच की जेव्हा आपण कधीकधी पाण्याच्या भांड्यात काही थेंब तेल टाकतो तेव्हा ते थेंब पाण्यावर तरंगू लागतात. परंतु, आपण कधी असा विचार केला आहे की तेल पाण्यापेक्षा वजनदार जास्त असते तर हे कसे काय होते? जेव्हा कोणती वस्तू पाण्यावर तरंगते तेव्हा त्याचे घनत्व पाण्यापेक्षा कमी असते, तेलाच्या रेणूचे घनत्व पाण्याच्या घनत्वापेक्षा कमी आहे. दुसरे असे की पाणी आणि तेल हे आपसात न विरघळणारे आहे. म्हणजे हे आपसात घुळत नाही जर आपण याला किती वेगाने ढवळले तरी ही काही वेळाने वेगळे होतात. म्हणून तेल पाण्याच्या वर तरंगते. दुसरीकडे या पाण्याचे रेणू ध्रुवीकरण केलेले असतात. पाण्याच्या रेणूच्या एका टोकाला सकारात्मक चार्ज आहे आणि एका टोकाला नकारात्मक चार्ज आहे. हेच कारण आहे की, हे पाण्याचे रेणू आपसात चिटकतात तर तेलाचे रेणू ध्रुवीय नसतात, म्हणून तेल आणि पाण्याचे रेणू एकमेकांकडे आकर्षित होत नाहीत, या कारणास्तव तेल पाण्यावर तरंगते.

ॲमेझॉन: जगाला 20 टक्के ऑक्सिजन पुरवतं


अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी असे ॲमेझॉन जंगल आहे. दक्षिण अमेरिकेत असलेल्या ॲमेझॉन जंगलाला पृथ्वीचे फुप्फुस समजले जाते. कारण हे एकटे जंगल जगाला २० टक्के ऑक्सिजन पुरवले.पृथ्वीवर अ‍ॅमेझॉन जंगल जवळपास 550 लाख वर्षांपासून आहे.  अॅमेझॉनच्या सीमा तब्बल ९ देशांना लागून आहेत. यात ब्राझील, बोलिविया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, वेनुझुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे.

या जंगलाचा ६० टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेले आहे. या जंगलात २५ लाख किड्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय हजारो प्रकारची झाडेझुडपे आणि
जवळपास २००० पशुपक्षी या जंगलात राहतात. अॅमेझॉनचे जंगल म्हणजे गुपितांचा खजाना आहे. अॅमेझॉन जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल आहे. ते ५५ लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भागात पसरलेले आहे. या जंगलाचा आकार ब्रिटन आणि आयर्लंडसारख्या देशांच्या १७ पट आहे. इतका मोठा आकार असल्यानेच हे जंगल जगातील २० टक्के ऑक्सिजनची पूर्तता करते. या जंगलाच्या उत्तरेला
ॲमेझॉन नदी वाहते. ही नदी म्हणजे शेकडो पाण्याच्या
प्रवाहांचे विस्तीर्ण जाळं आहे. या नदीचे जाळे तब्बल ६,८४० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. असे असले तरी यावरून काही वादही आहेत. अनेक संशोधकांच्या
मते, सर्वात मोठी नदी नाईल नदी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी अॅमेझॉन आहे. २००७ मध्ये
मार्टिन स्ट्रेल नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण अॅमेझॉन नदी पोहून पूर्ण केली. यासाठी त्याला जवळपास ६६ दिवसांपर्यंतचा वेळ लागला. दरदिवशी तो १० तास पोहत होता. अॅमेझॉनचे जंगल जवळपास ४००-५००
स्वदेशी अमेरिंडियन आदिवासी जमातींचे घर आहे. यातील ५०० जमातींचा तर बाहेरच्या जगाशी कधीच संबंध आलेला नाही. अॅमेझॉनची स्वतःची एक विशाल आणि समृद्ध इकोसिस्टीम आहे. येथे जवळपास ४० हजार वनस्पतींच्या प्रजाती, १३००
पक्ष्यांच्या प्रजाती, ३००० प्रकारचे मासे, ४३० प्रकारचे स्तनधारी आणि २५ लाख प्रकारचे कीटक आहेत.

Friday 28 May 2021

सव्वाशे मुलांचा बाप:शंकरबाबा पापळकर


 अनाथांचा नाथ अशी ओळख असलेल्या शंकरबाबा पापळकर यांना नुकतीच मानद डी.लिट.पदवी मिळाली आहे. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने शंकरबाबांना हा सन्मान दिला आहे. शंकरबाबा पापळकर हे अनाथ आणि दिव्यांग मुलांचे आधारवड आहेत. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. भारतातील हे अशाप्रकारचे एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. सध्या वसतिगृहात 98 मुली आणि 25 मुले असे एकूण 123 मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित वास्तव्य करत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बऱ्हाणपूर रस्त्यावर असलेल्या वझ्झर फाट्याजवळ सुमारे 25 एकरांच्या हिरव्यागार पहाडावर पापळकरांनी 'अपंगांची काशी' उभी केली आहे. 1 मे 1993 ला गोपाला शिक्षण संस्था या नावानं पापळकरांनी हे काम सुरू केलं. ते सुरू करावं यासाठी त्यांना कुणी प्रेरणा दिली,ते सांगणं मोठं कठीण आहे. पण शंकरबाबा हे मुळातले संत गाडगेबाबांच्या वंशातले आहेत. सेवेचा वसा त्यांच्याकडे तिथूनच आला असावा. त्यांचे मूळ गाव अचलपूर. पारंपारिक व्यवसाय धोब्याचा. अचलपूरमधलं त्यांचं घर गरिबीच्या सर्व खुणा मिरवणारे. अमरावतीत त्यांचं 'देवकीनंदन गोपाला' नावाचं एक मासिक होतं. त्याचे ते संपादक होते. पत्रकाराच्या नजरेतून समाजातल्या समस्यांकडे पहात असताना त्यांच्या नजरेनं टिपलं ते या अंध,अपंग,बहुविकलांग आणि भिन्नमती मुलांचं केविलवाणं जिणं. ओझं झाल्यानं आईवडिलांनी टाकून दिलेली आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानं सरकारी सुधारगृहांनीदेखील नाकारलेली अशी मुलं जाणार तरी कुठे? हा विचार शंकर पापळकरांना सतावत असे. काही मुलांच्या किडन्या काढून त्यांना मरणाच्या दारात ढकललं जातं. मुलींची गर्भाशयं काढून त्यांना रेडलाईट वस्त्यांकडे वळवलं जातं,हे भयावह चित्र ते पाहत होते. 

याच अस्वस्थतेतून त्यांनी एक भिन्नमती मूकबधिर मुलामुलींचं बालगृह सुरू केलं. पुढे या आपल्या संस्थेचं 'अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृह' असं नामकरण केलं. हे भारतातलं पहिलंवहिलं आणि एकमेव बेसहारा विकलांग पुनर्वसन केंद्र आहे. आज शंकरबाबा पंच्याऐंशीच्या उंबरठ्यावर आहेत. पण पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे अव्याहतपणे त्यांचं फिरणं सुरूच आहे. कल्पकता, मेहनत,माणुसकीचा सुगंध आणि स्वभावातला स्नेहार्द्र गहिवर यांचं एक विलक्षण मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या बालगृहात 18 वर्षावरील तरुण-तरुणीही आहेत. अशा मुलांना शंकरबाबा  घर देऊन,त्यांची लग्ने लावून तसेच त्यांना नोकरीधंदा देऊन आयुष्यात उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कितीतरी मुलामुलींना त्यांनी आपलं नाव दिलं आहे. लहानपणी खडे,माती खाणाऱ्या मुलांना शंकरबाबांनी जवळ केलं आणि त्यांच्या तोंडात अन्नाचा घास घातला. माता-पित्याचा ओलावा दिला. अशा बापमाणसाला डी.लिट.पदवी देऊन संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 26 May 2021

इस्लामी वास्तुशैलीचं शहर विजापूर


कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूर शहराचं नामकरण इथल्या सरकारनं आता विजयपूर असं केलं आहे. हे शहर एक पर्यटन स्थळ आहे. या शहराला घुमटांचं शहरदेखील म्हणतात. विजापुरातील गोलघुमट म्हणजे आदिलशाही  घराण्याचे सातवे शासक महंमद आदिलशहा  यांची कबर असलेलं स्थळ. ही जगप्रसिद्ध वास्तू विजापूरचं मुख्य आकर्षण आहे. तिथं शेजारीच वस्तुसंग्रहालय आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या घुमटाचा व्यास 44 मीटर आणि उंची 51 मीटर आहे. याच्या चारही बाजूच्या कोपऱ्यात अष्टकोनी आकाराचे सातमजली मनोरे आहेत. या घुमटाच्या वरच्या भागात गोलाकार आकारात कमान बनवलेली आहे. तिथं उभं राहून बोलल्यावर 10 ते 12 वेळा प्रतिध्वनी  ऐकू येतो, म्हणून त्याला 'बोल घुमट'ही म्हटलं जातं. 33 वर्षांनंतर ही वास्तू साकार झाली. गोलघुमटावरून  संपूर्ण विजापूर पाहायला मिळतं. गोलघुमट पाहिल्यानंतर विजापूर किल्ल्याच्या शाह  बुरुजावर ठेवण्यात आलेली मुलुख मैदान तोफ पाहण्यासारखी आहे. तिच्या शेजारीच लांडाकसाब ही तिच्याहून  आकाराने थोडी लहान तोफ आहे. मुलुख मैदान  तोफला 'मलिक-ए-मैदान' तोफ असेही म्हणतात.  ही तोफ निजामशाही काळात अहमदनगर इथं इ.  स. 1549 मध्ये तयार केली गेली. या तोफेचं वजन 55 टन असून, निजामशाहीतील राजा बुम्हाणशहा  यांच्याकडे काम करत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनीनं याने तांबे, लोखंड आणि जस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर इथं ही तोफ गाळली होती. मुलूख मैदान  तोफेची लांबी 14 फूट 4 इंच असून, तिचा व्यास 4 फूट 11 इंच आहे. या व्यतिरिक्त विजापुरात इब्राहिम रोझा कबर, मोती घुमट, जोड घुमट, ताजबावडी, चांदबावडी, अली रोझा,  चिंदडी मशीद, करीमुद्दीन मशीद, जामी मशीद,  अंडू मशीद, अमिन दर्गा, मेहतर महल अशा अनेक  वास्तू विजापुरात पाहायला मिळतात. यातून इस्लामी वास्तुकलेचं दर्शन घडतं. कर्नाटकातील इस्लामी वास्तुशैलीच्या नमुन्यांसाठी  विजापूर शहर प्रसिद्ध आहे. हिंदू वास्तुशिल्पाचे नमुनेही  इथं आहेत. या वास्तूंमध्ये स्तंभांचं प्रमाण फार कमी  आहे. संपूर्ण वक्राकार कमानींची निर्मिती आहे. हे  विजापूरचं खास वैशिष्ट्य. आदिलशाही काळात  विजापूरमध्ये अशा अनेक वास्तुकलांची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारची ऐतिहासिक ठिकाणं पाहून मन क्षणभर त्या काळाचा शोध घ्यायला लागतं. हेच दृश्य नेमकं त्या काळी कसं असेल? इथं कोण कोण वास्तव्य करत असेल? त्या काळी हाच परिसर  किती सुजलाम्-सुफलाम् दिसत असेल? असे अनेक  प्रश्न समोर उभे राहतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday 24 May 2021

आयलंडमध्ये आढळत नाहीत साप


साप म्हटलं की माणूस घाबरतो. कुठे समोर दिसला तरी पोटात भीतीचा गोळा उठतो. साहजिकच माणूस सापापासून तो विषारी असो अथवा बिनविषारी लांबच राहण्याचा प्रयत्न करतो. या जगात सापाच्या असंख्य जाती आहेत. काही देशांमध्ये किंवा बेटांमध्ये सापच साप आढळतात. परंतू जगाच्या पाठीवर सर्वत्र साप आढळतात असाच आपला समज असतो. एक बेट तर असे आहे जे 'स्नेक आयलंड' म्हणूनच ओळखले जाते व तिथे अक्षरशः पावलापावलावर साप आढळतात. ब्राझील या देशात साप मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, जगाच्या पाठीवर एक देश असा आहे जिथे साप आढळत नाहीत. हा देश म्हणजे आयर्लंड! आयलँड या थंड देशात साप का आढळत नाहीत याचे अनेकांना कुतुहल वाटू शकते. आयर्लंडमध्ये मानव वसाहत ईसवी सनापूर्वी १२८०० वर्षांपासून असल्याचे पुरावे आढळलेले आहेत. मात्र, याठिकाणी साप आढळल्याचा एकही उल्लेख आढळत नाही. संशोधकांच्या मते, आयर्लंडमध्ये कधीच सापांचे अस्तित्व नव्हते. जीवाश्म अभिलेख विभागातही तेथील सापांची कोणतीही नोंद नाही. याबाबत असेही म्हटले जाते की एके काळी तिथेही साप होते; मात्र अत्याधिक थंडीमुळे ते हळूहळू लुप्त होत गेले. आताही तिथे साप नसण्याचे हेच कारण मानले जाते. अत्यंत थंड हवामान असलेल्या या देशात सापांना आपले अस्तित्व टिकवता आले नाही.


जगातील सर्वात उंच 'निर्जन' इमारत


अलिकडे शहरांमध्ये माणसांची गर्दी वाढली आहे. साहजिकच क्षेत्रफळाने मर्यादित असलेल्या शहरांमध्ये मग इमारतींच्या उंची वाढवल्या जातात. त्यामुळे बहुमजली इमारतींची संख्याही वाढली. यातूनच मग जगात सर्वात उंच इमारतींची नोंद घेतली जाऊ लागली. अर्थात जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईतील 'बुर्ज खलिफा' या इमारतीची जगप्रसिद्धी आहे. मात्र, जगातील सर्वात उंच 'निर्जन' इमारत कुठे आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. ही इमारत उत्तर कोरियात आहे. आता निर्जन म्हणजे काय, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. या इमारतीमध्ये अजूनही कुणी राहत नाही. उत्तर कोरियातील पिरमिडच्या आकाराच्या या इमारतीला 'शापित' किंवा 'भुताटकी असलेली'  असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे 33 वर्षांनंतरही या इमारतीचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. ही इमारत एका हॉटेलची आहे. त्याचे नाव आहे 'रयुगयोंग'. त्याला 'यू-क्यूंग' या नावानेही ओळखले जाते. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये असलेल्या या इमारतीची उंची 330 मीटर असून त्यामध्ये 105 खोल्या आहेत. अतिशय भव्य आणि आलिशान वाटणारे हे हॉटेल रखडलेल्या बांधकामामुळे आता भयावह बनलेले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारनेदेखील या हॉटेलच्या निर्मितीसाठी बराच पैसा खर्च केला आहे. सरकारने सुमारे 55 खर्व रुपये या इमारतीसाठी खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र, अजूनही हे हॉटेल पूर्ण झालेले नाही. सध्या या इमारतीला 'जगातील सर्वात उंच सुनसान इमारत' म्हणूनच ओळखले जाते. याच कारणामुळे हॉटेलच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही झालेली आहे. जर या हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाले तर ही इमारत जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत बनेल.

शस्त्रक्रियावेळी डॉक्टर हिरवे कपडे का घालतात?


दवाखान्यात ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना किंवा बाहेर येताना डॉक्टर मंडळी हिरव्या किंवा निळ्या कपड्यात दिसतात. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडणं साहजिक आहे की, ऑपरेशन करताना डॉक्टर याच दोन रंगाचे कपडे का वापरत असतील? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हे कपडे लाल, पिवळ्या किंवा इतर कोणत्याही रंगाचे का नसतात? असे म्हटले जाते की, पूर्वी डॉक्टरांपासून ते हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरत होते; पण 1914 मध्ये एका प्रभावशाली डॉक्टरांनी या पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या ड्रेसला हिरव्या रंगात बदलले. तेव्हापासूनच हे हिरव्या कपड्यांचे चलन सुरू झाले. मात्र, काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे वापरतात. हॉस्पिटलच्या पडद्यांनाही हिरवा किंवा निळा रंग असतो. त्यासोबतच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात. म्हणून  प्रश्न पडणं साहजिक आहे की, या हिरव्या आणि निळ्या रंगात असे काय खास आहे? जे इतर रंगांमध्ये नाही. टुडे सर्जिकल नर्सच्या 1998 च्या अंकात प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सर्जरीवेळी डॉक्टरांनी हिरव्या रंगाचे कपडे वापरणे सुरू केले, कारण या रंगाने डोळ्यांना आराम मिळतो. जेव्हा आपण एखाद्या रंगाकडे एकसारखे बघतो तेव्हा डोळ्यांना एक वेगळाच थकवा जाणवू लागतो. तसेच डोळे कोणत्याही चमकदार वस्तूला पाहून चमकतात; पण लगेच आपण जेव्हा हिरव्या रंगाकडे बघतो तेव्हा डोळ्यांना आराम मिळतो. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास आपल्या डोळ्यांची निर्मिती अशी झाली की ते मुख्यता लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यात सक्षम आहेत. या रंगांच्या मिश्रणाने तयार झालेले इतर कोट्यवधी रंग मनुष्यांचे डोळे ओळखू शकतात; पण या सर्वच रंगांच्या तुलनेत आपले डोळे हिरवा किंवा निळा रंगच अधिक चांगल्याप्रकारे बघू शकतात आणि याच कारणामुळे हॉस्पिटलमध्ये पडद्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या कपड्यांपर्यंत रंग हिरवा किंवा निळा असतो. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना आणि तिथे राहणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांना आराम मिळावा. डॉक्टर ऑपरेशनवेळी सतत रक्त आणि मानवी शरीराच्या आतील अंग बघून मानसिक दबावात येऊ शकतात. अशात हिरवा रंग बघून त्यांचा तणाव दूर होतो. म्हणून ते हिरव्या रंगाचे कपडे घालतात.

Friday 21 May 2021

वेळेचा सदुपयोग:मुलांनी बनवलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

गेल्या सव्वा वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. शिक्षण सुरू आहे. बाकीचा रिकामा वेळ मुलं टीव्हीवर कार्टून्स पाहून तर काहीजण मोबाईलवर गेम खेळून घालवत आहेत. पण काही मुलं या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करताना दिसतात. काही तरी नवीन बनवलं. काही तरी वेगळं करणं. मात्र काहींनी नवनिर्मितीचा ध्यास घेऊन जगात आपलं नाव कमावलं आहे. वाचून वाटलं ना आश्चर्य! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलेल्या काही मुलांविषयी जाणून घेऊया.


अथर्व आर. भट्ट, भारत : रुबिक क्यूब (घन) पजल गेममध्ये एकाच रंगाच्या विखुरलेल्या चौकोनी पट्ट्या सलग एकाच रंगात आणायच्या असतात. हा डोक्याच्या व्यायामाचा खेळ (गेम) आहे. रुबिक क्यूब सोडवणं तसं सोपं नाही. एक रुबिक क्यूब गेम सोडवताना कित्येक तास किंवा दिवस लागतात. पण बेंगळुरूमधल्या एका आठ वर्षांच्या मुलाने काही मिनिटांत हा गेम सोडवून विक्रम प्रस्थापित केला आहे. अथर्व आर. भट्ट असे या मुलाचे नाव असून त्याने फक्त एकच गेम एका मिनिटांत सोडवला नाहीतर दोन हातात दोन आणि एक गेम पायाने असे एकूण तीन गेम त्याने एका दमात आणि तेही काही मिनिटांत सोडवले आहेत. त्याने हा चमत्कारिक कारनामा 1 मिनिटं आणि 29.97 सेकंदात करून दाखवला आहे. सर्वात वेगाने रुबिक क्यूब सोडवणारा होल्डर म्हणून अथर्व भट्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. त्याने हा विक्रम 9 डिसेंबर 2020 मध्ये केला आहे. 


नादुब गिल, इंग्लंड :  इंग्लंडच्या दहा वर्षाच्या नादुब गिल यानेदेखील गणिताचा सराव करून आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं आहे. नादुब गिल याचे कुटुंब मूळचे पाकिस्तानी आहे. त्याने एका मिनिटात 196 गणिताचे प्रश्न सोडवले आहेत. नादुब याने ऑनलाईन मॅथ टेबल ऍप 'टाइम्स टेबल्स रॉक स्टार्स'मध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.हे ऍप गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेसोबत काम करते.  इथे एका मिनिटात सर्वात जास्त प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकचा किताब दिला जातो. नादुब गिल याने आपल्या या कामगिरीचा एक व्हिडिओ बनवला आहे. नादुबने एका सेकंदात तीन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. किती आश्चर्यकारक आहे ना हे!


एरिक क्लाबेल, अमेरिका : मुलांना आइस्क्रीम खायला हमखास आवडतं. हीच मुलं आइस्क्रीम खाऊन झाल्यावर त्याच्या लाकडी काड्या (पोप्सिक्ले स्टिक) कुठेतरी फेकून देतात किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. पण एका 12 वर्षाच्या मुलाने या लाकडी काड्यांच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. वाचून बसला ना आश्चर्याचा धक्का! एरिक क्लाबेल असे या मुलाचे नाव असून त्याने लाकडी काड्या (पोप्सिक्ले स्टिक) जोडून जगातील सर्वात उंच टॉवर बनवला आहे. या टॉवरची उंची 6.157  मीटर म्हणजेच 20.20 फूट आहे. हा टॉवर लांबूनही आपल्याला सहज दिसतो. एरीकने हा टॉवर बनवताना याचा व्हिडीओदेखील बनवला आहे. हा टॉवर बनवताना एरिकने खूप मेहनत घेतली आहे.त्याने या काड्यांपासून आतापर्यंत लहान आकाराच्या खुर्च्या,घर, फर्निचर देखील बनवले आहे. या वस्तू दिसायला फार छान दिसतात. अन्य मुलांनीदेखील अशाप्रकारची नवनिर्मिती करायला हवी. कोण जाणे आपलेही नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

जगातील विशाल मत्स्यालये

मुलांनो,तुम्ही कुणाच्या घरात किंवा एकाद्या हॉटेलमध्ये 'फिशटॅन्क' पाहिला असाल. एका काचेच्या पाण्याच्या टाकीत छोटे-छोटे रंगीबेरंगी मासे,कासव तसेच शेवाळासारखी जलीय रोपे त्यात असतात. घराच्या सजावटीचा हा एक भाग असतो. असे 'फिशटॅन्क' आपलं लक्ष वेधून घेतात. 'फिशटॅन्क' म्हणजेच छोटी मत्स्यालये. मात्र विशाल मत्स्यालयेदेखील या जगात आहेत. त्याला एक्वेरियमदेखील म्हणतात. तिकीट काढून लोक अशी मत्स्यालये पाहायला गर्दी करतात. ती पाहताना समुद्रातून सफर करत असल्याचा अनुभव येतो. अशा जगातील सर्वात विशाल अशा तीन मत्स्यालयांची (एक्वेरियम) माहिती आपण घेणार आहोत.


चिमेलांग महासागर किंगडम, चीन:  महासागरातील जीवन जवळून पाहण्यासाठी चीनमध्ये जहुहाईच्या हेंगकिनमध्ये चिमेलांग महासागर किंगडम थीम पार्क आहे. या पार्कमध्ये एक विशाल मत्स्यालयदेखील आहे. हे जगातील सर्वात विशाल मत्स्यालय आहे. या विशाल पाण्याच्या टाकीत 48.75 दशलक्ष लिटर पाणी आहे.या मत्स्यालयाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मत्स्यालयात आठ विभाग आहेत. इथे समुद्रातील शार्क,देवमासेसारखे विशाल मासे, कासव तसेच अन्य जलजीव, वनस्पती असून ते पारदर्शी काचेतून अगदी जवळून पाहता येतात. डॉल्फिन, पाणमांजर, समुद्री सिंह (सी लायन) असे विभाग आहेत.


दक्षिण पूर्व एशिया एक्वेरियम,  सिंगापुरः हे जगातलं दुसरं सर्वात मोठं मत्स्यालय आहे. दक्षिण सिंगापूरमधील सेंटोसा आयलँडच्या मरिन लाइफ पार्कचा हा एक भाग आहे. जवळपास 20 एकरात असलेल्या या पार्कमध्ये दक्षिण पूर्व एशिया एक्वेरियम आणि अ‍ॅडव्हेंचर वॉटर  असे स्वतंत्र पार्क आहेत. 49 विविध विभागात सुमारे एक हजारपेक्षा अधिक प्रकारचे मासे आणि विविध समुद्री जीव आहेत. 4 कोटी 50 लाख लिटर पाण्यानं भरलेल्या विशाल टाकीचं हे मस्त्यालय आहे.मत्स्यालय पाहात फिरत असताना कंटाळा आला आणि भूक लागली तर तुम्हाला खाण्यासाठी येथे  रेस्टॉरन्टही आहेत. याशिवाय इथे पाण्यात स्कूबा ड्रायव्हिंग शिकता येतं.


जॉर्जिया एक्वेरियम, अमेरिकाः जगातलं सर्वात मोठं तिसरं मस्त्यालय अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यात अटलांटा येथे आहे. इथे सात विभागात शेकडो प्रजातींची हजारो जलीय जीवजंतू आहेत.जगातल्या सर्वात मोठ्या आकाराचं हे मस्त्यालय आहे.  व्हेल शार्क, बेलुगा व्हेल, कॅलिफोर्निया सी लॉयन, बॉटलनोज डॉल्फिन,हवेत उडणारे मासे असे अनेक माशांचे प्रकार पाहायला मिळतात. इथे मुलांसाठी स्वतंत्र विभाग असून छोट्या छोट्या रंगीबेरंगी माशांना पाण्यात हात घालून स्पर्श करता येतो. शार्क माशांचा 2 कोटी 38 लाख 48 हजार लिटर पाण्याचा स्वतंत्र पारदर्शक टॅंक आहे. इथून चालताना पाण्यातून चालत असल्याचा अनुभव येतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Thursday 20 May 2021

हनुमानाचा द्रोणागिरी पर्वत


भारतीय संस्कृतीमध्ये सर्व चराचरामध्ये एकच परमतत्त्व व्यापून राहिले आहे असे मानले जाते. त्यामुळे विविध वृक्ष, नद्या आणि पर्वतांनाही पूज्य मानले जाते. त्यांच्या वेगवेगळ्या अधिष्ठात्री देवताही मानल्या जातात. अर्थात सर्व नामरूपांमध्ये एकच परमतत्त्व आहे याचे विस्मरण होऊ दिले जात नाही. हिमालय, मेरू, मंदार, सह्यगिरी (सह्याद्री), गिरनार, विंध्य आणि गोवर्धनसारख्या अनेक पर्वतांना आपल्याकडे पूजनीय मानले जाते. मेघनादाच्या शस्त्राने लक्ष्मण मुर्छित झाल्यावर त्याला सावध करण्यासाठी जी संजीवनी वनस्पती हनुमंताने आणली ती द्रोणागिरी पर्वतावर होती. हनुमानांना श्रीरामांचे सर्वांत मोठे भक्त मानले जाते. हनुमानांचेही कोट्यवधी भक्त केवळ भारतातच नाही तर जगभरात आढळतात. कुठलीही समस्या, संकट सामोरे आले की, संकटमोचन हनुमानांचे स्मरण केले जाते. या हनुमानाने हिमालयाच्या पर्वतराजीतील हा एक पर्वतच उचलून लंकेला नेला व कार्यपूर्तीनंतर पुन्हा मूळ जागी आणला असे वर्णन रामायणात आहे. हा द्रोणागिरी पर्वत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नीती खोऱ्यातील द्रोणागिरी गावात आहे असे मानले जाते. हे गाव जोशीमठपासून सुमारे ५० किलोमीटरवर आहे. या गावातील स्थानिक लोक या पर्वताला देवतास्वरूप मानतात. हनुमान या पर्वतावर संजीवनी शोधण्यासाठी आल्यावर तेथील नेमकी ती वनस्पती कुठली या गोंधळात पडले व त्यांनी या पर्वताचा एक मोठा भाग तोडून उचलून नेला. त्यामुळे या गावातील लोक हनुमंताची पूजा करीत नाहीत हे विशेष! हा पर्वत बद्रीनाथ धामापासून सुमारे ४५ किलोमीटरवर आहे. बद्रीनाथ धामाचे धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांनी सांगितले की, आजही या पर्वताचा वरचा भाग तुटल्यासारखाच दिसतो व तो भाग आपण सहजपणे पाहू शकतो. द्रोणागिरी पर्वताची उंची ७,०६६ मीटर आहे. हिवाळ्यात याठिकाणी मोठी हिमवृष्टी होते. त्या काळात गावातील लोक अन्यत्र राहण्यासाठी जातात. हिवाळा संपला की ते पुन्हा गावात येऊन राहतात. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठपासून मलारीकडे ५० किलोमीटर पुढे गेल्यावर जुमा नावाचे ठिकाण लागते.तेथून द्रोणागिरीकडील पायवाट सुरू होते. तेथील धौली गंगा नदीवरील पुलाच्या दुसऱ्या बाजूस जी पर्वतराजी दिसते ती ओलांडून गेल्यावर द्रोणागिरी पर्वत येतो. सुमारे दहा किलोमीटरचा हा मार्ग अतिशय खडतर आहे. मात्र, ट्रेकिंगची आवड असणारे अनेक लोक याठिकाणी येतात. दरवर्षी जूनमध्ये गावातील लोक द्रोणागिरी पर्वताची विशेष पूजा करतात व त्यावेळी तिथे मोठा उत्सव असतो.

Wednesday 19 May 2021

जगातील मानवनिर्मित विशाल धरणे

मुलांनो, तुम्ही धरणे पाहिली असतीलच. तुमच्या परिसरात किंवा शाळेच्या सहलीच्या माध्यमातून तुम्ही नदीवर बांधण्यात आलेली धरणे पाहायला गेला असाल. धरण म्हणजे काय तर नदीच्या अथवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात आलेली भिंत. म्हणजे यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा केला जातो. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी अथवा जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. प्रचंड पाणीसाठ्याचा विचार करता जगात अशी अनेक विशाल धरणे आहेत,त्यातील पहिल्या पाच धरणाची माहिती करून घेऊया.


कॅरिबा धरण : झाम्बेबीया आणि झिम्बावे देशांदरम्यान वाहणाऱ्या झाम्बेजी नदीवर कमानीच्या आकाराचे कॅरिबा नावाचे धरण बांधण्यात आले आहे. 420 फूट उंच आणि 1हजार 900 फूट लांब बांधामुळे (भिंत) मानवनिर्मित कॅरिबा धरण तयार झाले आहे.हे धरण जवळपास 5 हजार 400 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. धरणात पाण्याची क्षमता जवळपास 180 घन किलोमीटर आहे. पाण्याच्या क्षमतेनुसार हे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण आहे. या धरणाची खोली 97 फूट आहे. कॅरिबा धरणात मासे, मगरी, पाणघोडे मोठ्या प्रमाणात आढळतात. इथे वीजनिर्मिती केली जाते.


 ब्राटस्क धरण : रशियातील सायबेरियामध्ये  ब्राटस्क धरण बांधण्यात आले आहे. पाण्याच्या साठवणुकीच्या क्षमतेनुसार हे धरण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.या धरणात सुमारे 169 घनमीटर पाण्याचे संकलन आहे, जे 5 हजार 470 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. धरणाच्या बांधावरून एक रेल्वे लाईन आणि एक हाय वे जातो. या धरणाचा 'फेमस टूरिस्ट  प्लेस'च्या यादीत समावेश आहे.


 वोल्टा धरण : पाणी साठाच्या क्षमतेनुसार घाना देशातील अकोसोबो बांधावर बांधलेले वोल्टा धरण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. या धरणाची जवळजवळ 148 घन किलोमीटर पाणी अडवण्याची क्षमता आहे. जमिनीवरील क्षेत्रफळ जवळपास 8 हजार 502 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्राचा विचार केला तर वोल्टा धरण जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण आहे. हे धरण दक्षिणेतील अकोसोमबोपासून देशाच्या उत्तर भागापर्यंत पसरले आहे.  बोटिंग करताना  सुंदर निसर्ग देखावे पाहता येतात.


 मॅनिकॉगन धरण : कॅनडामध्ये मॅनिकॉगन नदीवर डॅनियल-जॉनसन बांध बांधण्यात आला आहे. यामुळे मानवनिर्मित विशाल मॅनिकॉगन धरणाची निर्मिती झाली आहे.  या धरणाची पाण्याची क्षमता 137 घन किलोमीटर असून पाण्याच्या क्षमतेनुसार हे धरण जगात चौथ्या क्रमांकावर येते. हे धरण जवळपास दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. धरणाची खोली 85 फूट आहे. या धरणाचे वैशिष्ट्य असे की, या पाण्यात एक विशाल बेटही आहे. अवकाशातून हे धरण आणि बेट स्पष्टपणे पाहता येते. याला क्यूबेकचे नेत्र म्हणतात. मॅनिकॉगन धरण बोटिंग आणि कॅपेनिंगसाठी प्रसिध्द आहे.


 गुरी धरण :व्हेनेझुएलाच्या कॅरोनी नदीवर गुरी नावाचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी साठवण्याची क्षमता 135 घन किलोमीटर आहे.पाण्याच्या क्षमतेनुसार या धरणाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. गुरी हे काळ्या पाण्याचे धरण आहे. धरणाच्या पाण्यात ह्युमिक पदार्थांची मात्रा अधिक प्रमाणात असल्यामुळे पाणी काळे बनले आहे. गुरी धरण 4 हजार 250 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. हे धरण एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ देखील आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 17 May 2021

कल्पना चावलाचे नाव अंतराळ यानाला


अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कल्पना चावला हिचे नाव एअरोस्पेस कंपनी 'नॉर्थरोप ग्रुमेन'ने सिग्नस स्पेसक्राफ्टला दिले आहे. २९ सप्टेंबर 2020 ला हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होणार आहे. सिग्नस स्पेसक्राफ्टला विकसित केलेल्या 'नॉर्थरोप ग्रुमेन' कंपनीने ट्विटरवर म्हटले आहे की आम्ही कल्पना चावला यांचा सन्मान करतो ज्यांनी 'नासा'मध्ये भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर बनून नवा इतिहास घडवला. मानवयुक्त अंतराळ मोहिमांमध्ये त्यांच्या योगदानाचा स्थायी रूपाने प्रभाव पडला आहे. हे आहे आमचे 'सिग्नस यान, एस.एस. कल्पना चावला'! मानवयुक्त अंतराळ यानांमध्ये ज्यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिलेले असते त्यांचे नाव आम्ही प्रत्येक सिग्नसला देतो असेही कंपनीने म्हटले आहे. कल्पना चावला या १६ जानेवारी २००३ मध्ये अमेरिकेच्या 'कोलंबिया' यानातून अंतराळात गेल्या होत्या. १ फेब्रुवारी २००३ मध्ये अंतराळात सोळा दिवस राहिल्यानंतर परतीच्या प्रवासात कोलंबिया यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत असताना व लँडिंगच्या केवळ सोळा मिनिटे आधी दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामध्ये कल्पनासह अन्य अंतराळवीरांचे प्राण गेले. कल्पना यांचा १७ मार्च १९६२ ला हरियाणाच्या करनालमध्ये जन्म झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या होत्या.


जगातील चिमुकले देश


जगभरातील १९५ देशांची स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. काही देश आकाराने मोठे आहेत तर काही लहान. मात्र, जगाच्या पाठीवर अतिशय चिमुकले असे अनेक देश आहेत. हे देश खरे तर छोटी बेटंच आहेत. भूमध्ये सागरात असलेल्या सात बेटांपैकी एक बेट माल्टा या नावाने ओळखले जाते. हा एक देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ३१६ चौरस किलोमीटर आहे.

या देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे. १९६४ मध्ये स्वतंत्र झालेल्या माल्टावर वेगवेगळ्या काळात रोमन, फ्रेंच आणि ब्रिटिश लोकांची सत्ता होती. कॅरेबियन समुद्रातील असाच बेटाचा देश म्हणजे सेंट किटस् आणि नेव्हीस. ही दोन अतिशय सुंदर अशी बेटं आहेत. ख्रिस्तोफर कोलंबसने सन १४९८ मध्ये त्यांचा शोध लावला. सन १९८३ मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशाचे एकूण क्षेत्रफळ २६१ चौरसकिलोमीटर आहे. सेंट किटस् हे १६८ चौरस किलोमीटरचे आणि नेव्हीस ९३ चौरस किलोमीटरचे आहे. या देशाची एकूण लोकसंख्या ५० हजार आहे. हिंदी महासागरातील मालदिवही असाच देश आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत तो आशियातील सर्वात छोटा देश आहे. २९८ चौरस किलोमीटरचा आकार असलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख आहे. १९६६ मध्ये स्वतंत्र झालेला हा देश पर्यटकांचे आकर्षण आहे.

चंद्र अनुमानापेक्षा साडेआठ कोटी वर्षांनी लहान!


चंद्राचे वय त्याच्या आजपर्यंतच्या अनुमानापेक्षा ८ कोटी ५० लाख वर्षांनी लहान असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत जर्मन एरोस्पेस सेंटरच्या संशोधकांनी नवे संशोधन केले आहे. एकेकाळी चंद्रावर मोठा व भयावह असा मॅग्माचा समुद्र होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या आकाराच्या एका खगोलाची धडक पृथ्वीला झाली होती. या धडकेतून अवकाशात पृथ्वीचे जे अवशेष विखुरले त्यापासून चंद्राची निर्मिती झाली. ही घटना कधी घडली असावी, याबाबतही नव्याने संशोधन करण्यात आले आहे. यापूर्वी खगोल शास्त्रज्ञांना वाटत होते, की चंद्राची निर्मिती करणारी ही धडक ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी; मात्र आता नव्या संशोधनात असे दिसून आले, की चंद्राची निर्मिती ४.४२५ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. चंद्राच्या वयातील ८ कोटी ५० लाख वर्षांची चूक शोधण्यासाठी संशोधकांनी काही गणितीय मॉडेल्सचा वापर केला. चंद्रावर एके काळी तप्त व द्रवरूपातील मॅग्मा होता. तो थंड होण्यासाठी किती कालावधी लागला असावा, याचे ठोकताळे मांडून हे संशोधन करण्यात आले.

जगभरातील खगोल शास्त्रज्ञ अवकाशातील तारे, ग्रह आणि अन्य खगोलीय पिंडांबाबतचे रहस्य उलगडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. याबाबत त्यांना एक मोठे यश मिळाले आहे. या खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र हा सुरुवातीला एक आगीचा गोळाच होता. तो सुमारे २० कोटी वर्षांनंतर थंड झाला आहे. शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष चंद्रावरून आणण्यात आलेल्या नमुन्यांचा अभ्यास करून काढला आहे. चंद्रासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनात खगोल शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. चंद्राच्या आयुष्याचा शोध लावण्यात जर्मन एअरोस्पेस सेंटरच्या शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या संशोधकांच्या मते, चंद्र हा आजपर्यंतच्या अंदाजापेक्षा ८५ दशलक्ष वर्षांनी युवा आहे. म्हणजेच चंद्राचे वय सुमारे ८.५ कोटी वर्षे इतके आहे. चंद्राचा अभ्यास करणारे थ्रॉस्टेन क्लिन यांनी सांगितले की, जर चंद्राच्या नेमक्या वयाचा शोध लावण्यात यश मिळाले तर आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली असेल,याचा अंदाज बांधणे शक्य होऊ शकते. असेही म्हटले जाते की, पृथ्वीचा उपग्रह असलेल्या या चंद्राचे वय सुमारे ४.५१ अब्ज वर्षे असावे. मात्र, वास्तविक चंद्राचे वय यापेक्षाही कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थिया नामक ग्रहाने पृथ्वीला दिलेल्या धडकेने चंद्राची  निर्मिती झाली. यावेळी चंद्र हा एक तप्त आगीचा गोळा होता आणि २० कोटी वर्षांनंतर तो थंड झाला.


कोयना धरण (सातारा जिल्हा)


कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते.16 मे 1962 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राच्यादृष्टीने भाग्याचा आणि आनंदाचा म्हणावा लागेल. कोयना प्रकल्प हा स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा अध्याय आहे. विज्ञानाचे आणि विकासाचे मंदिर म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. आशिया खंडातील हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. महाबळेश्वरपासून 64 किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण आहे. धरणातील पाणीसाठ्यावर वीजनिर्मिती करून पूर्वेकडील शेती हिरवीगार करण्याबरोबरच दुष्काळ निवारणाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येते. धरणातील पाण्याचा वापर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसाठीही होतो. धरणापासून मिळणारी वीज महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू करणारी आहे. या परिसरात जवळपास 200 इंच पाऊस पडणारे मोठे पाणलोट क्षेत्र आहे. धरणातील तब्बल 67.5 टीएमसी पाणीसाठा वीज निर्मितीला वापरला जातो. त्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान झाला आहे. तसेच महाराष्ट्रासह जवळच्या राज्यांना शेती, उद्योगाकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याची मूलभूत गरज भागविण्याचे कामही धरणाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. कोयना धरणामुळे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला. धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. या माध्यमातून ओलिताखाली येणारे क्षेत्र 12.23 हजार हेक्टर आहे. ओलिताखाली येणारी गावांची संख्या 100 इतकी आहे. 11 डिसेंबर 1967 ला झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने सह्याद्री हादरला. मात्र, ही भीषण आपत्ती कोयना धरणाने पेलली. या भूकंपाने जमिनी भेगाळल्या. सव्वाशे जणांचे जीव गेले, तर, बऱ्याच काळापर्यंत या भूकंपाची भीती सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यांसह पश्चिम महाराष्ट्रात व्यक्त होत राहिली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही या परिसराने व कोयना प्रकल्पाने भूकंपाचे लक्षावधी धक्के पचविले आहेत. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली. हजारो भूकंपांचे धक्के सहन केले. तसेच अतीवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला. मात्र, तरीही साठ वर्षांनंतरही हे धरण भक्कम असेच आहे. 

39 बायका,94 मुलं असा 181 सदस्यांचा कुटुंब काफिला


सध्या आपल्या देशात एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी नियमांमुळे म्हणा किंवा आर्थिक अडचणींचा परिणाम म्हणा अलिकडे कुटुंबे छोटी होत चालली आहेत. आपल्या देशात सरकारी कर्मचाऱयांना दोन मुलांवर कुटुंब शस्त्रक्रिया बंधनकारक आहे, नाही तर नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे 'हम दो हमारे दो' अशीच पद्धत रूढ होऊ लागली आहे. मात्र, जगात तेही भारतात असे एक कुटुंब एकत्र आहे, त्यामध्ये एकूण 181 लोक अगदी  गुण्यागोविंदाने राहत आहेत. उल्लेखनीय म्हणजे कोरोना काळातही हे कुटुंब अगदी सुरक्षित आहे. मिझोराममधील जियोना चाना या 74 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक 'इंडिपेंडंट कम्युनिटी' म्हणू शकता. जियोना चानाला एकूण 39 बायका आहेत. तसेच त्यांना 94 मुलं आहेत. आणि या कुटुंबात मिळून तब्बल 181 लोक राहतात. हे सगळे लोक एका मोठाल्या घरात राहतात. एकाच घरात एवढी गर्दी असूनही आतापर्यंत तरी सर्व लोक कोरोनापासून सुरक्षित आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 181 सदस्य संख्या असलेले हे जगातील सर्वात मोठे कुटुंब ठरले आहे. जियोना चाना हा कुटुंबप्रमुख. त्याला एकूण 39 पत्नी, 94 मुले, 14 सुना, 33 नातवंडे व परतवंडेही आहेत. हे सर्वजण 100 खोल्यांच्या एका मोठ्या इमारतीमध्ये राहतात. हे कुटुंब मिझोराममधील हिरव्यागार पहाडी इलाक्यातल्या वनराईने नटलेल्या बटवंग गावात राहते. या कुटुंबाला रोज जेवणासाठी 45 किलो पेक्षाही जास्त तांदूळ, 30 ते 40 कोंबडे, 25 किलो डाळ, अनेक डझन अंडी, 60 किलो भाजी लागते. याशिवाय रोज 20 किलो फळे लागतात. विशेष म्हणजे कुटुंबाला लागणारा भाजीपाला हे कुटुंब स्वतः उगवते. या कुटुंबाची स्वतःची शेती आहे. आणि कोंबड्या, अंड्यांसाठी पोल्ट्री फॉर्मही सुरू केले आहे.बटवंग परिसरात या चाना कुटुंबाचा मोठा दबदबा आहे.

अमेरिकन अवकाशात दिसत होत्या 'उडत्या तबकड्या'


'उडत्या तबकड्यां'ची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे. या उडत्या तबकडया पाहिल्याचे अनेकजण दावा करत आहेत. मात्र त्या कोठून येतात, का येतात, याचा शोध लागत नाही. यासाठी अनेक प्रकारे संशोधन सुरू आहे. काही लोक या तबकड्या परग्रहवासीयांच्या असतात, असे म्हटले जात आहेत. काहीजण या उडत्या तबकड्या अनेक देशांच्या असल्याचे व ते देश आपल्या देशाची टेहळणी करत असल्याचे म्हणत आहेत. इतकेच काय, तर अमेरिकेत पहाडी इलाख्यात परग्रहवासीयांची वस्ती असल्याचेही म्हटले जात आहे, परंतु यातून ठोस असे काही समोर आलेले नाही. आता नुकतीच आणखी एक माहिती समोर आली आहे. सुमारे दोन वर्षे रोज अवकाशात आपण हजारो उडत्या तबकड्या उडताना पाहिल्या असल्याचा दावा, अमेरिकेचे माजी नौसैनिक पायलट लेफ्टनंट रेयॉन ग्रेव्ह यांनी केला आहे. या उडत्या तबकड्या पृथ्वीच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उडत्या तबकड्याबद्दल बोलताना ग्रेव्ह यांनी सांगितले की, २०१९ च्या सुरुवातीला व्हर्जिनिया किनारपट्टीवर रोजच्या रोज अज्ञात विमानसदृश उडत्या तबकड्या दिसून येत होत्या.

दरम्यान, अमेरिकन संरक्षणमंत्री आणि नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकांकडून उडत्या तबकड्याबाबत एक महिन्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत. तत्पूर्वी रेयॉन ग्रेव्ह यांनी उडत्या तबकड्या 'यूएफओ'बाबत दावा करून खळबळ उडवून दिली आहे. ग्रेव्ह यांनी सीबीएस चॅनेलशी बोलताना सांगितले की, मी या उडत्या तबकड्यांवरून चिंतीत आहे. जर ही विमाने दुसऱ्या देशांची असती तर मुद्दा वेगळा असता. मात्र, हा काही दुसराच प्रकार आहे. आम्ही मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असलो तरी ते प्रत्येकवेळी आपल्यावर नजर ठेवत आहेत. या विमानाचा वेग आणि उंची फार आहे. हा एक धोकादायक प्रकारच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, २०१९ मध्ये त्रिकोणी आकाराच्या या यूएफओची छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. मात्र, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. असे झाल्यास यूएफओवरचा पडदा हटण्यास मदत होणार आहे.

अवकाशात आढळून आले जुळे सूर्य


या अवकाशात असंख्य ग्रह,तारे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे आणि अभ्यासही केला जात आहे. यातून अनेक उत्साहवर्धक आणि गंमतशीर माहिती पुढे येत असते. पृथ्वीसारखा ग्रह अवकाशात कुठे आहे का आणि तिथेही जीवसृष्टी आढळून येते का ,याचा प्रामुख्याने शोध घेतला जात आहे. आता हेच बघा ना! या अवकाशात जुळे सूर्य आढळून आले आहेत.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या 'केपलर स्पेस टेलिस्कोप'च्या माध्यमातून मिळालेल्या डाटाच्या मदतीने शास्त्रज्ञांच्या पथकाने एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या खगोलशास्त्रज्ञांनी पाच जुळ्या सूर्यांचा शोध लावला आहे. उल्लेखनीय म्हणजे या सूर्याजवळ त्यांचे ग्रहसुद्धा आहेत. या प्रत्येक सूर्यमालेत असा एक ग्रहसुद्धा आहे की, तेथे जीवन शक्य आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस'च्या शास्त्रज्ञांनी केपलरकडून उपलब्ध झालेल्या डाटाचा वापर करून एक नवा पर्याय शोधून काढला आहे. यामध्ये अशा स्पेस सिस्टम शोधल्या जातात की, ज्यामध्ये दोन तारे आणि आपल्या पृथ्वीसारखा ग्रह असून तेथे जीवन शक्य आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने या ताऱ्यांचे द्रव्यमान, त्यांची चमक व सिस्टमच्या हिशेबाने व ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर असे निश्चित केले की, या ग्रहावर कितपत जीवन शक्य आहे. दरम्यान, 'केपलर ३८ सिस्टम'मध्ये एका ताऱ्यासोबत आणखी एक ताराही आहे. जो पृथ्वीपासून ३९७० प्रकाशवर्षे दूर अंतरावर आहे. या मोठ्या आकाराच्या ताऱ्याभोवती वरुणच्या आकाराचा एक ग्रहसुद्धा फिरताना आढळून आला.

संशोधकांनी केपलर मिशनच्या माध्यमातून मिळालेल्या ९सिस्टममधील तारे आणि ग्रहांबाबत अभ्यास केला. यावेळी राहण्यायोग्य स्थिती असलेल्या खगोलीय पिंडांचा प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला. त्यांनी निवडलेल्या सिस्टममध्ये वरुणच्या आकाराचा एक ग्रहसुद्धा होता. यासाठी केपलर ३४, ३५, ३८,६४ आणि ४१३ ला निवडण्यात आले. यापैकी ३८ खगोलीय पिंड पृथ्वीसारखे असल्याचे स्पष्ट झाले.

Sunday 16 May 2021

जगातील अनोखे रेस्टॉरंट

 मुलांनो,तुम्ही तुमच्या आई-वडिलांबरोबर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेला असाल. तिथे तुम्ही तुमच्या मनपसंद मेनूचा आस्वाद घेतला असाल. पण या जगात असे काही रेस्टॉरंट आहेत की, तिथे तुम्हाला मेनूपेक्षाही तिथली बैठकव्यवस्था,डेकोरेट आवडल्याशिवाय राहणार नाही. बर्फापासून बनलेलं रेस्टॉरंट, पक्ष्यांच्या आकाराचं रेस्टॉरंट,धबधब्याजवळच रेस्टॉरंट आणि आकाशात गरम हवेच्या फुग्यावर चालणारं रेस्टॉरंट यांच्याविषयी कधी कुठं वाचलं आहे का? नाही ना, मग चला त्यांच्याविषयी जाणून घेऊ या.


आईस रेस्टॉरंट,संयुक्त अरब अमिरात: या देशाची राजधानी असलेल्या दुबईत आईस म्हणजेच संपूर्ण बर्फात बनवण्यात आलेले रेस्टॉरंट आहे. याच नावच आईस रेस्टॉरंट आहे. बर्फातलं हे जगातील एकमेव रेस्टॉरंट आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथली प्रत्येक वस्तू जसं की खुर्ची, टेबल, सजावटीचे साहित्य बर्फापासून बनले आहे. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर अंटार्क्टिकासारख्या  प्रदेशातील थंडीची जाणीव होते. रेस्टॉरंटमधील तापमान नेहमी शून्य अंशाच्या खाली असते. त्यामुळे थंडीपासून स्वतः बचाव करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खास प्रकारचे जॅकेट घालावे लागते.


बर्ड्स नेस्ट रेस्टॉरंट,थायलंड: झाडावर असलेल्या पक्ष्यांचं घरटं सगळ्यांनी पाहिलं असेलच. त्यापासून प्रेरणा घेऊन थायलंडमध्ये घरट्याच्या आकाराचं रेस्टॉरंट उभारण्यात आलं आहे. हे रेस्टॉरंट जमिनीवर नाही तर झाडावरच घरट्यासारखं बांधण्यात आलं आहे.रेस्टॉरंटला वायरीच्या (केबल)साहाय्याने सोळा फूट वरती झाडावर  मजबूतपणे लटकवण्यात आले आहे.रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी केबलचाच आधार घ्यावा लागतो. यात एकावेळेला चार व्यक्ती बसू शकतात. ग्राहकाला जेवण पुरवण्यासाठी वेटर केबल तारेचा उपयोग करतो. हे रेस्टॉरंट समुद्र किनारी आहे. ग्राहक भोजनाचा आस्वाद घेताना आजूबाजूचा सुंदर नजराणा पाहू शकतो.


लबस्सिन वाटरफॉल रेस्टॉरंट,फिलिपिन्स: हे  रेस्टॉरंट एका धबधब्याजवळ उभारण्यात आले आहे. धबधब्यातून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याचा आनंद लुटत जेवणाचा आस्वाद घेता येतो. माडाच्या बनात वसवण्यात आलेले हे जगातील एकमेव अनोखे रेस्टॉरंट आहे. इथला धबधबा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे,पण तुम्हाला हा धबधबा मानवनिर्मित आहे, असं अजिबात भासत नाही. पाण्यात उतरण्यासाठी ग्राहकाला चपला बाहेर सोडाव्या लागतात.


हॉट एअर बलून रेस्टॉरंट, नेदरलँड: तुम्ही टीव्हीवर हॉट एअर बलून म्हणजेच गरम हवेचा फुगा पाहिला असेलच. कधी कुणी यातून सैरसपाटाही मारला असेल.  नेदरलँडमध्ये असेच एक रेस्टॉरंट आहे,जे हॉट एअर बलूनमध्ये चालवले जाते. या बलूनच्या टोपलीत बसून आकाशात काही हजार फुटांवर भोजनाचा आस्वाद घेता येतो. हे रेस्टॉरंट एंजेलिक श्मीइनक नावाची एक शेफ महिला चालवते. ती बलूनमध्येच जेवण बनवते व ग्राहकाला पुरवते.गरम हवेच्या फुग्याच्या टोपलीत भोजन बनवण्याची आयडिया तिचीच आहे. ग्राहक बलूनच्या टोपलीत उभा राहून आकाशातील सुंदर नजारा पाहत भोजन करू शकतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 15 May 2021

राम वनवासातील स्थळे


भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात दोनशेपेक्षाही अधिक ठिकाणी निवास केला होता,असे तज्ज्ञांनी शोधले आहे. अयोध्येपासून वीस किलोमीटरवर तमसा नदी आहे. तिथेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. प्रयागराजपासून वीस किलोमीटरवर श्रृंगवेरपूर तीर्थ आहे. सध्या त्याला सिंगरौर असे म्हटले जाते. इथेच श्रीरामाचे मित्र निषादराज गुह राहत होते. सिंगरौरच्या कुरई येथे श्रीराम राहिले होते व येथूनच निषादराजाने त्यांना नौकेतून गंगापार नेले होते. कुरईतून श्रीराम प्रयागला आले होते. मंदाकिनी नदीच्या काठी चित्रकुटावर श्रीरामांनी निवास केला होता. इथेच भरतभेट झाली होती. नदीच्या एका घाटावर त्यांनी पिता दशरथांच्या नावे तर्पण केले होते. सतना येथे अत्रीऋषींचा आश्रम होता. तिथेच अत्रीपत्नी अनसुया मातेने सीतेला पतिव्रता धर्माचा उपदेश करून काही भेटवस्तू दिल्या होत्या. रामायणकालीन दंडकारण्याचा भाग सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील काही भागापर्यंत होता. तिथे श्रीरामांनी दहा वर्षे निवास केला. नाशिक येथे गोदावरीजवळील पंचवटीत निवास करीत असतानाच शुर्पणखेचे नाक कापण्यात आले होते व तिथेच सीताहरण घडले. आंध्र प्रदेशच्या खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम येथे पर्णशाला हे ठिकाण आहे. तिथेही श्रीरामाचा निवास घडला होता. सीतेच्या शोधात तुंगभद या आणि कावेरी नदीच्या काठीही श्रीराम व लक्ष्मण गेले होते. ऋष्यमुक पर्वतावर श्रीरामांची सुग्रीव व हनुमानाशी भेट झाली. कोडीकरई येथून वानरसेनेने रामेश्वरकडे कूच केले. रामेश्वरम येथेच लंकेत जाण्यापूर्वी श्रीरामांनी शिवाराधना केली होती. धनुषकोडीपासून रामसेतूचा प्रारंभ होतो. श्रीलंकेत नुवारा एलिया पर्वतावरच रावण धबधबा, रावण गुंफा, अशोक वाटिका, विभिषण महाल आदी स्थळे आहेत. नुवारा एलिया पर्वतापासून भव्य सुमारे ९० किलोमीटरवर फिरतेस बांद्रवेलाजवळ रावणाचा महाल होता असे मानले जाते.


Friday 14 May 2021

जगातील सर्वात मोठी मंदिरे


भारताला जगात मंदिरांचा देश म्हणून ओळखले जाते. मात्र जगातील सर्वात मोठ्या पहिल्या 10 पैकी चार मंदिरे विदेशी भूमीवर आहेत. यातील एक कंबोडियात तर दुसरे एक मंदिर अमेरिकेतआहेत.बाकीची  दोन इंडोनेशियात आहेत. क्षेत्रफळाच्या तुलनेत जगातील पहिल्या सात मोठ्या मंदिरांची माहिती जाणून घेऊ या.

• अंगकोर वाट मंदिर,कंबोडिया: 402 एकर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कंबोडियातील अंगकोर येथील 'अंगकोर वाट' नामक मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर ठरते. हे तब्बल 402 एकर परिसरात पसरलेले आहे. याची निर्मिती 12 व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी केली असल्याचे म्हटले जाते.


•श्री स्वामीनारायण अक्षरधाम, न्यू जर्सी, अमेरिका : 163 एकर उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामध्ये 'श्री स्वामीनारायण अबारधाम' हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेच्या वतीने उभारण्यात आले आहे. ते 2014 मध्ये भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. हे मंदिर तब्बल 163 एकर परिसरात बांधण्यात आले आहे.


• श्री रंगनाथ स्वामी मंदिर, तामिळनाडू, 156 एकर भारतातील तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात तिरुचिरापल्ली शहरात श्री रंगनाथस्वामी मंदिर' आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास हे मंदिर भारतातील सर्वात मोठे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. तसे पाहिल्यास भगवान विष्णूवे हे मंदिर तब्बल 156 एकर परिसरात पसरले असून त्याची निर्मिती 8 ते 9 व्या शतकात झाल्याचे मानले जाते.


• छतरपूर मंदिर: नवी दिल्ली : 69 एकर भारताची राजधानी गयी दिल्लीमध्ये 1974 मध्ये संत नागपाल यांनी 'छतरपूर' मंदिराची निर्मिती केली. उल्लेखनीय म्हणजे हे मंदिर पूर्णपणे संगमरवराचे असून ते 68 एकर परिसरात पसरले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते.


• अक्षरधाम मंदिर ,नवी दिल्ली : 59 एकर भारताची राजधानी नयी दिल्लीमध्ये 'स्वामी नारायण अक्षरधाम मंदिर हे स्वामीनारायण संस्थेच्या वतीने सुमारे 59 एकर परिसरात उभारण्यात आले आहे. 2005 मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खोलण्यात आले होते. मंदिराची निर्मिती सुमारे 3 हजार स्वयंसेवक आणि सात हजार कलाकारांनी मिळून केली आहे.


• बेसाकी मंदिर, इंडोनेशिया : 49 इंडोनेशियातील बाली येथे 'बेसाकी' मंदिर आहे. ही एक मंदिरांची साखळीच आहे. ही मंदिरे सहा स्तरांत बांधण्यात आली आहेत. या मंदिरांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे म्हटले जाते, की या मंदिराची निर्मिती 13 व्या शतकात करण्यात आली आहे. हे मंदिर सुमारे 49 एकर परिसरात पसरले आहे.


• बेलूर मठ, रामकृष्ण मंदिर, हावडा :40 एकर भारताचे एक महत्त्वाचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमधील हावडा येथे बेलूर मठ रामकृष्ण मंदिर आहे. सुमारे 40 एकर परिसरात पसरलेले हे मंदिर रामकृष्ण मिशनवे मुख्यालयसुद्धा आहे. याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. हे मंदिर हुगली नदीच्या तीरावर असून याची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली आहे.


Thursday 13 May 2021

देशातील पहिली प्रमाणित महिला 'चॉकलेट टेस्टर'


चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात आणि त्याचा लाभ हृदयासह अनेक अवयवांना होतो. चॉकलेटमुळे एंडोर्फिन हार्मोनचा स्तरही वाढतो. त्यामुळे मनावरील ताण हलका होऊन ते आनंदी बनते. याच गुणामुळे चॉकलेटला 'मूड बूस्टर'ही म्हटले जाते. मात्र, हे उपयोग आहेत म्हणून चॉकलेट खाणारे क्वचितच कुणी असेल. चॉकलेटच्या गोड चवीची भुरळ पडलेली असल्यानेच अनेक आबालवृद्ध चॉकलेटचे सेवन करीत असतात. त्यामुळे चॉकलेटची चव घेऊन त्याचा दर्जा ठरवणारे काम मिळाले तर अनेकांना ते स्वप्नवतच वाटू शकेल. पूनम चोरडिया यांना भारतातील पहिल्या महिला 'चॉकलेट टेस्टर' म्हणून अधिकृतरीत्या प्रमाणित करण्यात आलेले आहे. टी-टेस्टरप्रमाणेच चॉकलेट टेस्टर हा व्यवसायही अनेकांना आवडणाराच आहे. आपल्या देशात त्याची आता कुठे सुरुवात झालेली आहे. पूनम व त्यांचे पती नितीन चोरडिया हे चॉकलेट टेस्टर म्हणून काम करतात. दोघांनी गेल्यावर्षी देशातील पहिली 'झीरो फर्स्ट वेस्ट चॉकलेट कोकोआ ट्रॅट'ची सुरुवात केली. पूनम यांना या कामाची आवड नितीन यांच्या चॉकलेटप्रेमामुळेच निर्माण झाली. नितीन आधी रिटेल कन्सल्टंट 'चॉकलेट टेस्टर' म्हणून काम करीत होते. त्यांच्या कामाचा बहुतांश भाग चॉकलेटची चव घेणे आणि त्याचा दर्जा जाणून घेणे याचाच होता. ते 2007 मध्ये एका इटालियन चॉकलेट उत्पादक कंपनीचे चॉकलेट बार टेस्ट करण्याचे काम करीत होते. ते घरी येऊन पत्नीलाही वेगवेगळ्या चॉकलेटची माहिती देत असत. नितीन यांनी 2014 मध्ये परदेश दौऱ्यानंतर देशात अशा पद्धतीचे काम सुरू करण्याचे ठरवले. 2015 मध्ये नितीन आणि पूनम या दोघांनीही चॉकलेट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. पूनम यांनी सांगितले, 'आम्ही स्वतः चॉकलेट खरेदी करणे आणि एफएसएसएआयकडून लायसेन्स मिळाल्यानंतर ते बनवण्यास सुरुवात केली.' चेन्नईमध्ये पूनम आपल्या पतीसह 'चोकोशाला'चे आयोजनही करतात. त्यामध्ये लोकांना चॉकलेट बनवण्याच्या पद्धती, डार्क चॉकलेटस्, बोनबोंस ट्रफल्स आणि त्यांच्या फायद्यांबाबत सांगतात. चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया समजून घेत असतानाच पूनम यांनी 2018 मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेट अँड कोकोआ टेस्टिंग, इंग्लंडमधून चॉकलेट टेस्टिंगची पहिली व दुसरी लेव्हल पूर्ण केली. नितीन यांनी ही लेव्हल 2016 मध्ये पूर्ण केली होती.


'या' खाद्यपदार्थांनी वाढते स्मरणशक्ती


बऱ्याच लोकांना रोजच्या जीवनातील साध्या साध्या गोष्टींचेही विस्मरण होत असते. अशा स्थितीत आहारातील काही बदलांचाही अनुकूल परिणाम दिसू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या खाद्यपदार्थांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते अशा काही पदार्थांची ही माहिती...

•भोपळ्याच्या बिया : यामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि झिंक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यामधील शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् आपले शरीर व मेंदू यांना फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवतात. तसेच मॅग्नेशियम स्मरणशक्ती तसेच नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढवते.

•कॉफी : कॉफीमध्ये कॅफिन आणि अँटिऑक्सिडंटस् असतात. मेंदूची कार्यपद्धत चांगली राहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. एकाग्रता वाढते तसेच सतर्कता अधिक तीक्ष्ण होते. नियमितपणे योग्य प्रमाणात कॉफीच्या सेवनाने न्यूरोलॉजिकल डिसीजचा म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

•पालक : या भाजीत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी होतो. पालकमध्ये 'बी ६', 'ई' जीवनसत्त्व आणि फोलेट असते. फोलेट हेअल्झायमर्स आणि विस्मरणाशी संबंधित विकारांपासन वाचवते.

•मासे : माशात 'ओमेगा-३' हे फॅटी अॅसिड असते. ते मेंदू आणि डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी असते. आठवड्यातून किमान एकदा मत्स्याहार लाभदायक ठरू शकतो. फॅटी फिशमध्ये 'ओमेगा-३' चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.

•डार्क चॉकलेट: मूड खराब झाला की चॉकलेट खावे असे म्हणतात ते खरेच आहे. डार्क चॉकलेट हे ब्रेन बुस्टरचे काम करते. तज्ज्ञांच्या मते, चॉकलेट ज्यापासून बनते त्या कोकोमध्ये फ्लॅवोनॉईडस् नावाचे अँटिऑक्सिडंट असते. ते मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच आपली मानसिक स्थितीही चांगली राहते.

•भाज्या : भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस् चांगल्या प्रमाणात असतात. त्यामध्ये कॅरोटेनॉईडस् नावाचा घटक असतो. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी व अन्य भाज्या उपयुक्त ठरतात.

•दूध : दुधाचा उपयोग केवळ हाडांसाठीच होतो असे नाही. स्मरणशक्तीसाठीही दूध उपयुक्त आहे. त्यामध्ये बी ६, बी १२ ही जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.

•ब्लॅकबेरी : एका संशोधनानुसार ब्लॅकबेरीचे सेवनही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगले ठरते. विशेषतः 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या समस्येतही ब्लॅकबेरीचे सेवन लाभदायक ठरू शकते. यामध्ये अँटिऑक्सिडंटस्मो ठ्या प्रमाणात असतात. ते मेंदूच्या पेशींचे रक्षण करतात आणि अशा पेशींच्या विकासासाठीही मदत करतात.

•सुका मेवा : यामध्येही 'ओमेगा-३'फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंटस् असतात. ते मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. अँटिऑक्सिडंट 'ई' जीवनसत्त्वामुळे फ्री रॅडिकल्सनी निर्माण केलेल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून मेंदूचे रक्षण होते. विशेषतः उतारवयात त्याचा चांगला लाभ होत असतो.

सोन्याने मढवलेले लक्झरी हॉटेल


हौसेला मोल नाही म्हणतात ते खरेच आहे. मग हौस करायला किती पैसा गेला याची काळजी कोणी करत नाही. इथे फक्त हौस मिटण्याला महत्त्व आहे. या लोकांच्या हौसेखातर  व्हिएतनामची राजधानी हनोई येथे सोन्याचे एक भव्य हॉटेल सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण हे हॉटेल सोन्याने मढवलेले आहे. त्याच्या भिंती, फाटक, फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू तसेच बाथटब आणि कमोडही सोन्याने मढवलेले आहे. या हॉटेलला 'डोल्से हनोई गोल्डन लेक' असे नाव देण्यात आले आहे. हे जगातील पहिले असे लक्झरी हॉटेल आहे जे पूर्णपणे सोन्याने मढवलेले आहे. या शाही हॉटेलमध्ये सर्व वस्तू शाही आहेत. 25 मजल्यांच्या या हॉटेलमध्ये एकूण 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतीवर सुमारे 54 हजार चौरस फुटांची गोल्ड प्लेटेड टाईल्स लावलेली आहे.

लॉबीमध्ये फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूही सोन्याची कलाकुसर असलेल्या आहेत. वॉशरूममध्ये बाथटब, सिंक व शॉवरपासून सर्व काही सोन्याने मढवलेले आहे. बेडरूममध्येही फर्निचर व सजावटीच्या वस्तू सोन्याची झळाळी मिरवणाऱ्या आहेत. खोल्यांचे छतही सोन्याने मढवले आहे. छतावर इन्फिनिटी पूल बनवण्यात आलेला आहे, जेथून हनोई शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. या हॉटेलच्या उभारणीचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते. होआ बिन ग्रुप अँड विनधम ग्रुपने ते बनवले आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये या हॉटेलचे उद्घाटन झाले. तेथील प्रेसिडेन्शियल सुईटमध्ये एक रात्र मुक्काम करायचा असेल तर 4.85 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच डबल बेडरूम सुईटमधील एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क सुमारे 75 हजार रुपये आहे. तसेच अन्य खोल्यांचे सुरुवातीचे शुल्क वीस हजार रुपये आहे.


हिमालयातील मानवासारखा दिसणारा यती


हिमालयामध्ये मानवासारखा दोन पायांवर चालणारा व धिप्पाड असा प्राणी असल्याचे म्हटले जाते. कुणी त्याला वानरासारखा प्राणी म्हणतात तर कुणी अस्वलासारखा. त्याला 'यती' हे नाव प्रसिद्ध आहे. नेपाळमधील दंतकथांमध्ये यतीचा उल्लेख त्रास देणारा हिमामानव असा आहे. हा एखाद्या मोठ्या अस्वलासारखा दिसतो. सामान्य पुरुषाच्या उंचीहून अधिक उंच असणारा हा प्राणी दोन पायांवर थोडा पोक काढून चालतो. स्वत:च्या संरक्षणासाठी यतीकडे दगडापासून बनवलेले मोठे हत्यार असते तसेच सळसळत्या पानांच्या आवाजासारखा त्याचा आवाज असतो. हा प्राणी हिमालयात, सैबेरियात आणि मध्य तसेच पूर्व आशियामध्ये अढळतो. यती पाहिल्याचे दावे अनेकांनी केलेले आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. 

मात्र, अनेक व्यक्तींच्या आत्मचरित्रांमध्ये त्याची नोंद आढळते. 'नगाधिराज' हिमालयात आजही अनेक रहस्ये दडलेली आहेत. जगातील सर्वात उंच दहा पर्वतशिखरे जिथे आहेत अशा हिमालयात जीवजंतूंपासून वनस्पतीपर्यंत अनेक अज्ञात प्रजाती आजही आहेत. एव्हरेस्टसारखे जगातील सर्वात उंच म्हणजेच 8850 मीटर उंचीचे शिखरही हिमालयातच आहे. ते पादाक्रांत करण्यासाठी जगभरातील गिर्यारोहक हिमालयात येत असतात. अनेक गिर्यारोहकांनी यतीच्या मोठ्या पाऊलखुणा पाहिल्याचे दावे केलेले आहेत. नेपाळ, तिबेट आणि भूतानच्या परिसरातून असे दावे अनेकवेळा झाले आहेत. एव्हरेस्ट शिखरावर पहिल्यांदा यशस्वी गिर्यारोहण सर एडमंड हिलरी आणि शेरपा तेनजिंग नोर्गे यांनी केले आहे.

तेनजिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात हिमालयातील या गूढ प्राण्याविषयीही लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या वडिलांनी यतीला अनेक वेळा पाहिले होते; पण त्यांनी स्वतः कधीही यती पाहिला नाही. मात्र, यतीच्या पावलांचे ठसे मात्र आपण पाहिलेले असल्याचे तेनजिंग यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. एरिक शिप्टन यांनीही यतीची पदचिन्हे पाहिल्याचे म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ही पदचिन्हे 13 इंचाची होती व त्या हिशेबाने हा यती सात फूट उंचीचा असावा. गिर्यारोहक रेनहोल्ड मेस्नर यांनीही म्हटले आहे की एकदा ते रस्त्यातून भरकटले आणि अशावेळी त्यांनी यतीला पाहिले. हा यती अतिशय भयावह दिसत होता. त्याची आकृती माणसासारखीच होती. आपण रात्रीही यतीला पाहिले; पण अंधार असल्यामुळे त्याला नीट पाहता आले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

2017 साली संशोधकांच्या एका गटाने अनेक ठिकाणांहून यतीच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून जे काही सापडले ते सर्व पुरावे गोळा केले. मात्र संशोधनाच्या शेवटी ते अस्वलाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 2008 साली अमेरिकेमधील दोन जणांनी आम्हाला अर्ध मानव आणि अर्ध माकड असणाऱ्या प्राण्याचे अवशेष मिळाले असल्याचे सांगितले. मात्र तपासाअंती तो गोरीलासारखा दिसणारा पोशाख निघाला. त्यामुळे यती असण्याला अधिकृत पृष्ठी मिळाली नाही.

असे असले तरी या यतीबाबत जगभरात उत्सुकता आहे. या व्यक्तिरेखेवर अनेक टीव्ही मालिका, चित्रपट निघाले आहेत.जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून सिरीजपैकी एक असणाऱ्या ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ टीनटीन’मध्येही यतीसंदर्भातील भाग दाखवण्यात आला होता. परदेशात 'बीगफूट', 'यती: कर्स ऑफ द स्नो डेमोन', 'रेज ऑफ द यती', 'स्मॉलफूट', 'अॅबोमिनेबल', 'योको', 'स्नो बिस्ट', 'द स्नो क्रिचर', 'द मिस्टेरियस मॉनस्टर', 'हाफ ह्युमन', 'स्नो बिस्ट, मॅन बिस्ट', 'यती: द ट्वेटियथ सेंच्युरी जायंट' असे अनेक सिनेमे या विषयावर बनवण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 12 May 2021

न उडणारा काकापो पोपट


 पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी या भूतलावर आहेत. पेंग्विन,इमूसारखे न उडणारे पक्षी माहीत असतील,पण न्यूझीलंडमध्येही एक काकापो नावाचा एक पक्षी आहे,ज्याला उडता येत नाही. काकापो हा पोपट वर्गातील पक्षी असून असून तो दिसायला घुबडासारखा दिसतो. जगातला सर्वात मोठा पोपट म्हणून यांची नोंद आहे. पिवळसर हिरवा पिसाऱ्यात हा पक्षी तसा गुबगुबीत दिसतो. याला राखाडी रंगाची चोच असते.पाय लहान असतात.त्याच्या शरीराच्या मानाने पंखदेखील लहान असतात.शेपटीही बारीक असते. काकापो पोपट निशाचर आहे. दिवसा लपून राहतो आणि रात्री भक्ष्य शोधायला बाहेर पडतो. याचे वजन दोन ते चार किलो असते तर आयुष्यमान 40 ते 80 वर्षांपर्यंत असते. ही लुप्त होत चाललेली प्रजाती असून याच्या संवर्धनासाठी न्यूझीलंड सरकारने कंबर कसली आहे. याला सरकारने दोन वेळा 'बर्ड ऑफ द इयर'चा सन्मान दिला आहे.1990 मध्ये यांची संख्या फक्त 50 होती,आता ती वाढून दोनशेच्यावर पोहचली आहे. 

काकापो पक्ष्याला 'मॉस चिकन' असेही म्हटले जाते.ही प्रजाती संपूर्ण एटोरियामध्ये आढळून येत होती,परंतु आता जिथे त्याची शिकार होत नाही, अशा मोजक्याच  बेटांवर आढळून येत आहे. हा पक्षी नेहमी सावध असतो.हा अगदी सावकाश चालतो, मात्र धावताना उड्या मारत धावतो. जमिनीवर घरटे करून राहणारा काकापो स्वतःच्या बचावासाठी झाडाझुडुपांचा आधार घेतो.


प्राण्यांसाठी अनोखे पूल, बोगदे


रस्ते किंवा मोठ्या मार्गावर अथवा रेल्वे मार्गावर नदी, ओढे येत असतील तर त्यावर पूल बांधले जातात. डोंगर पोखरून बोगदा काढण्यात येतो. डोंगर, पर्वतावर जाण्यासाठी काही ठिकाणी 'रोप वे' चा वापर करण्यात येतो.  यामुळे दळणवळण सुलभ होते. वेळेची बचत होते. हे सर्व माणसाने माणसांसाठी केले आहे. मात्र माणसांनी पशु-पक्ष्यांसाठीही असे पूल,बोगदे बांधण्यात आले असल्याचे वाचले किंवा पाहिले आहे का? बसला ना आश्चर्याचा धक्का! पण हे खरे आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

टर्टल टनेल, जपान : आपण कासवं पाहिली आहेतच. पण या कासवांसाठी बोगदा (टनेल) बांधला असल्याचे कुणाला माहीत नसेल,पण जपानमध्ये समुद्र काठावर कोबे शहरात यांच्यासाठी खास  बोगदा काढण्यात आला आहे. समुद्र काठीच शहर असल्या कारणाने नेहमी कासवं समुद्राबाहेर येतात.कित्येकदा ही कासवं रेल्वे मार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात. यावेळी ते रेल्वे मार्गावर अडकून पडत किंवा मोठे अपघात घडत. कित्येकदा रेल्वे थांबवावी लागत असे.तेव्हा कासवांना सुरक्षित रेल्वे लाईन पार करण्यासाठी एक मार्ग काढण्यात आला. रेल्वे पट्टयांच्या खालून छोटे टनेल्स बनवण्यात आले. ते वरून मोकळे आहेत. इथून नेहमी कासव रेल्वेमार्ग पार करताना दिसतात.


 रोप ब्रिज, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातल्या उत्तर-पूर्व व्हिक्टोरियाच्या ह्युम हायवेवर उभारण्यात आलेल्या रोप ब्रिजची एक वेगळीच ओळख आहे. या भागात उडणाऱ्या खारुट्यांच्या प्रजाती राहतात. या खारुट्या अन्नासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. या हायवेवर रात्रंदिवस सुरू असलेल्या राहदारीमुळे अपघात होऊन मरणाऱ्या खारुट्यांची वाढली. त्यांना वाचवण्यासाठी हायवेच्या दुतर्फा आणि मध्ये उंचच्या उंच खांब उभे करण्यात आले आणि यावर पातळ दोरींचा रस्ता बनवण्यात आला. हा रोप ब्रिज बनवल्यानंतर आता उडणाऱ्या खारूट्या आरामात हायवे पार करतात. खारुट्यांबरोबरच छोटे प्राणीही या ब्रिजचा उपयोग करतात.


टोड टनल, अमेरिका : टोड हा एक प्रकारचा बेडूक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बेडकांसाठीही एक खास बोगदा बनवण्यात आला आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या डेव्हीस शहरात पोल लाईन रस्ता मार्गाच्या खालून हा बोगदा काढण्यात आला आहे.हा बोगदा सहा इंच रुंद आहे. वास्तविक हा रस्ता बनवताना बेडकांना रस्ता पार करताना अडचणी येत होत्या.त्यामुळे बेडकांना सुरक्षित रस्ता पार करता यावा,म्हणून टोड बोगद्याची निर्मिती करण्यात आली.


इकोफ्रेंडली एनिमल ब्रिज,भारत: आपल्या भारतातदेखील प्राण्यांसाठी एक पूल बांधण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातल्या कालाढूंगी-नैनीताल राज्य मार्गावर हा प्राणी ब्रिज बांधण्यात आला आहे. वास्तविक हा मार्ग जंगलातून जातो.छोटे प्राणी अचानक वाहनांसमोर येऊन अपघात घडण्याच्या घटना होत घडत होत्या.त्यामुळे हा पूल रस्त्याच्या 40 फूट वर बांधण्यात आला आहे. हा पूल 90 फूट लांब आणि पाच फूट रुंद आहे. विशेष म्हणजे हा पूल इकोफ्रेंडली आहे.कारण हा पूल बांबू आणि गवतांपासून बनवण्यात आला आहे. प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुलावर चार कॅमेरेही लावण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली