Thursday 18 November 2021

5.जिल्हा प्रशासन (इयत्ता सहावी नागरिकशास्त्र) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर-जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.

2.जिल्हाधिकारी यांना कोणकोणती कामे करावी लागतात?

उत्तर- शेती:-शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे. कायदा व सुव्यवस्था- जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.सभाबंदी, संचारबंदी जारी करणे.निवडणूक अधिकारी- निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे.निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे. मतदार याद्या अद्ययावत करणे. आपत्ती व्यवस्थापन- आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे. आपत्ती ग्रस्तांचे पुनर्वसन करणे.

3.पोलीस अधीक्षक कोणत्या ठिकाणी असतात?

उत्तर- महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो.

4.जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना कोणती मदत करतात?

उत्तर- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना मदत करतात. 

5.जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात?

उत्तर- जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला 'जिल्हा न्यायालय' म्हणतात?

6.तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते?

उत्तर-प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.

7.न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?

उत्तर-न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते.

8.कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?

उत्तर-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

प्रश्न2- जोड्या जुळवा

अ गट-(अ) जिल्हाधिकारी (आ) जिल्हा न्यायालय (इ) तहसीलदार

ब गट- (1)तालुका दंडाधिकारी (2)कायदा व सुव्यवस्था राखणे (3) तंटे सोडवणे

उत्तर-(अ) तालुका दंडाधिकारी-तंटे सोडवणे (ब) जिल्हा न्यायालय-  तंटे सोडवणे 

(क) तहसीलदार-तालुका दंडाधिकारी

प्रश्न 3.खालील मुद्द्यांवर चर्चा करा.

1)आपत्ती व्यवस्थापन

उत्तर- आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर,आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरण फुटणे, बॉंबस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते.त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

Tuesday 16 November 2021

10.प्राचीन भारत:सांस्कृतिक (इयत्ता सहावी इतिहास) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.प्राचीन भारतातील विद्यापिठाची यादी करा.

उत्तर- प्राचीन भारतातील विद्यापीठे- तक्षशिला विद्यापीठ,वाराणसी, वलभी, नालंदा विद्यापीठ, कांची

2.कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे,त्याची यादी करा.

उत्तर- तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे.


2. नावे लिहा.

अ) प्राचीन भारतातील महाकाव्ये....

उत्तर- रामायण,महाभारत


प्रश्न 3.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(1) रामायण हे महाकाव्य .............. ऋषींनी रचले.

उत्तर-वाल्मिकी

(2) भारतीय वैद्यकाशास्त्राला ............ असे म्हटले जाते. 

उत्तर- आयुर्वेद

(3) हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय............ विद्यापीठात होती. 

उत्तर-नालंदा विद्यापीठ

प्रश्न 4.थोडक्यात उत्तरे लिहा.

(1) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा.

उत्तर-तिपिटकामध्ये तीन पिटके आहेत.पिटक म्हणजे पेटी.याठिकाणी त्याचा अर्थ 'विभाग' असा आहे. 1. सुत्तपिटक- यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. 2.विनयपीटक-यामध्ये भिक्खू आणि भिक्खूनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत.3.अभिधम्मपिटक- यात गौतम बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे.

(2) भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? 

उत्तर-'भगवद्गीता' हा हिंदुचा पवित्र ग्रंथ आहे. तो महाभारताच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा संदेश दिला आहे.

(3) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?

उत्तर- आयुर्वेदात रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे.

(4) संघम साहित्य म्हणजे काय?

उत्तर-संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य 'संघम साहित्य' म्हणून ओळखले जाते.

प्रश्न 5.चर्चा करा.

मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला.

उत्तर- मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला.सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली, असे दिसते. गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपूरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते, हे समजते.

 प्रश्न 6.एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.प्राचीन भारतात कोणकोणत्या भाषामधून साहित्यनिर्मिती झाली?

उत्तर- संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषामधून साहित्यनिर्मिती झाली. 

2.संघम साहित्यात कोणती महाकाव्ये प्रसिद्ध आहेत?

उत्तर- सिलप्पधिकरम आणि मणीमेखलाई ही संघम साहित्यातील महाकाव्ये प्रसिद्ध आहेत.

3.जैन आगमग्रंथ कोणकोणत्या भाषामध्ये लिहिला आहे? 

उत्तर-जैन आगमग्रंथ हा अर्धमागधी, शौरसेनी, माहाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिला आहे.


8.मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये (इयत्ता सहावी इतिहास) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.सांगा पाहू.

1)भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.

उत्तर- कुशाण

2)कनिष्काने काश्मीरमध्ये बसवलेले शहर.

उत्तर-कनिष्कपूर

3)वीणावादनात प्रवीण असलेला राजा.

उत्तर- समुद्रगुप्त

4)कामरूप म्हणजेच.

उत्तर- प्राग्ज्योतिष . प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर


प्रश्न 2.चर्चा करा व लिहा

1.सम्राट कनिष्क

उत्तर-कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने कनिष्कपूर हे शहर वसवले होते.कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. कनिष्काने सोन्याचे नाणे पाडले होते.

2) मेहरौली येथील लोहस्तंभ.

उत्तर- दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहून अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळातील आहे.

प्रश्न 3.चीनच्या बौद्ध भिक्खू युआन श्वांग याने महाराष्ट्रातील लोकांविषयी कोणते गौरवपूर्व उद्गार काढले आहेत?

उत्तर-"महाराष्ट्रातील लोक मानी आहेत.कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात,पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करीत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आल्यास ते अपाय करीत नाहीत."

प्रश्न 4.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.कोणत्या राजांना 'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.

उत्तर- भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती.त्या राजांना'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.

2.इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता?

उत्तर- मिनंडर राजा हा इंडो -ग्रीक राजांमध्ये प्रसिद्ध होता.

3.दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात कोणता भिक्खू चीनमधून भारतात आला होता?

उत्तर- दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात फाहियान हा भिक्खू चीनमधून भारतात आला होता.

4.हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला होता?

उत्तर- हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने 'हर्षचरित' हा हर्षावर्धनाच्या जीवनावरील  ग्रंथ लिहिला होता.


7.मौर्यकालीन भारत (इयत्ता सहावी) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या?

उत्तर- सिकंदाराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या.

2.बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले?

उत्तर-बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले.

3.मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?

उत्तर-मौर्य काळात शेती, हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

4.सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?

उत्तर-सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह,हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची शिल्पे आहेत.

5.इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य कोठून कोठपर्यंत पसरलेले होते?

उत्तर- इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य  वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते?

6.दारिक नावाचे चलन कोणी सुरू केले?

उत्तर- सम्राट दार्युश याने दारिक नावाचे चलन सुरू केले.

7. ग्रीक सम्राट सिकंदर कोठे मरण पावला?

उत्तर- ग्रीक सम्राट सिकंदर हा बॅबिलोन येथे इ.स.पू.323 मध्ये मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे.

8. 'मुद्राराक्षस' हे नाटक कोणी लिहिले?

उत्तर-विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने 'मुद्राराक्षस' हे नाटक लिहिले. यात धनानंद राजाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्य याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानकातून उलगडले आहे.

9.चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कोठे घालवले?

उत्तर-चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कर्नाटकातील श्रवणबेलगोळ येथे घालवले.

10.सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर- कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

11.सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा.

उत्तर- अशोकाने प्रजेसाठी सुखसोई निर्माण करण्यावर भर दिला. माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे, अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले.सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या.विहिरी खोदल्या.

12.मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती?

उत्तर-मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

13.भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली आहे?

उत्तर- भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या  आधारे तयार करण्यात आली आहे.

प्रश्न 2 .सांगा पाहू (म्हणजे काय?)

1.सत्रप- भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी सिकंदाराने ग्रीक अधिकाऱयांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यांना सत्रप म्हणतात.

2.सुदर्शन- गुजरात राज्यातील जुनागढजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धारण बांधले होते.

3.'देवानं पियो पियदसी'- याचा अर्थ :देवाचा प्रिय प्रियदर्शी

4.अष्टपद-पूर्वी बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते.

प्रश्न 3. आठवा आणि लिहा

1.चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती- चंद्रगुप्त मौर्य याने नंद राजा धनानंद याचा पाडाव करून मगधावर इ. स.पू.325 च्या सुमारास स्वतः ची सत्ता प्रस्थापित केली. नंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार सुरू केला. पुढे सेल्युकस निकेटर याचा पराभव करून अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार,हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडले.

2.सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती- अशोक इ. स.पूर्व 273 मध्ये मगधच्या सत्तेवर आला. त्याने कलिंगवर स्वारी करून विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत ,तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.


Monday 15 November 2021

7.खडक व खडकांचे प्रकार (इयत्ता सहावी) प्रश्नोत्तरे


अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

1) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे कवच (शिलावरण) कशाचे बनलेले आहे?

उत्तर- पृथ्वीच्या पृष्ठभागाचे कवच (शिलावरण) कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे.

2) खडकांचे प्रकार किती व कोणते?

उत्तर- खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. 1)अग्निजन्य खडक/अग्निज खडक/ मूळ खडक 2) गाळाचे खडक/स्तरित खडक ) रूपांतरित खडक

3) ज्वालामुखी कशाला म्हणतात?

उत्तर- पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते.त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्याला ज्वालामुखी म्हणतात.

4)माहिती सांगा- प्युमिस खडक

उत्तर- प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

5) महाराष्ट्र पठार व सह्याद्री कोणत्या खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे.

6) कोणत्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही? 

उत्तर- अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही.

7) गाळाचे खडक कोणते?

उत्तर- वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म (शेल) , प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत.

8) जीवाश्म (fossil) कशाला म्हणतात?

उत्तर- गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात.

9)दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम कोणत्या खडकाने केले आहे?

उत्तर- राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम केले आहे.

10) आग्रा येथील ताजमहाल कोणत्या खडकाने बांधलेला आहे?

उत्तर-आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकाराना येथील खाणीतून आणला गेला होता.

11) नर्मदा नदीचे तट कोणत्या खडकाचे आहेत?

उत्तर- मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृष्य फार मनोवेधक असते.

12)जांभा खडक कोठे आढळतो?

उत्तर-महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो.


6 महासागरांचे महत्त्व (सहावी इयत्ता) प्रश्नोत्तरे


खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.महासागरांचे क्षेत्रफळ लिहा

उत्तर-(अ) पॅसिफिक महासागर-16,62,40,977 चौकिमी (ब)अटलांटिक महासागर- 8,65,57,402 चौकिमी (क) हिंदी महासागर-7,34,26,163 चौकिमी (ड) दक्षिण महासागर- 2,03,27,000 चौकिमी (इ) आर्क्टिक महासागर-1,32,24,479 चौकिमी

2.सजीवसृष्टी जमिनीवर जास्त आहे की जलावरणात?

उत्तर- जमिनीवरील एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात (पाण्यात) राहते.

3.कोणत्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते?

उत्तर-महासागर,सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते.

4.ज्वालामुखीमुळे कोणकोणते घटक पाण्यात मिसळतात?

उत्तर-ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे,राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात.

5.जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता?

उत्तर-'मृत समुद्र' हा जगातील सर्वांत क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो.

6.खाऱ्या पाण्यापासून आपल्याला काय मिळते?

उत्तर-खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते.

7.मीठ हा पदार्थ कसा मिळवला जातो?

उत्तर- मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात 'मिठागरे' तयार करून मिळवला जातो.

8.मिठाप्रमाणेच कोणते घटक समुद्रात असतात?

उत्तर- मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात.

9.मासे आपल्याला कोठून मिळतात?

उत्तर- मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात.

10.जल जीवांचा उपयोग कशाकशांसाठी करतात?

उत्तर- जल जीवांचा उपयोग आहार, औषधनिर्मिती, खतनिर्मिती, संशोधन इत्यादींसाठी वापर होतो. 

11.भारतामध्ये कोणकोणते जीव खाल्ले जातात?

उत्तर-भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी (शार्क) रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात.

12.कोणकोणत्या देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते?

उत्तर- मालदीव,मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते.

13.किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते कारण सांगा.

उत्तर- हवेतील बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते,त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते.

14. वारे का वाहतात?

उत्तर- जमीन व पाण्याच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायूदाब पट्टे निर्माण होतात.या वायूदाबातील फरकामुळे वारे वाहतात.

15. सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे कारण सांगा.

उत्तर- सागरसानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यांमुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे.

16. महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था कोणत्या शहरात करण्यात आली आहे?

उत्तर- महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरात करण्यात आली आहे.

17. खारफुटीचे लाकूड कसे असते?

उत्तर- खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो. 

18.सागरतळातून कोणकोणते खनिज पदार्थ मिळतात?

उत्तर- सागरतळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायूदेखील मिळतो.

19. जलमार्गातून कशांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते?

उत्तर- जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते.

20.सागर किनारा लाभलेल्या कोणत्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे?

उत्तर-सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नार्वे, जपान यांसारख्या  देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे.

21.पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?

उत्तर-पृथ्वीचा सुमारे 70.80 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.

22. महासागरांचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांमुळे होत आहे?

उत्तर- मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. यांत(1) शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा सागरजलात टाकणे.(2)तेलगळती (3)जहाजांतून टाकले जाणारे साहित्य (4) मासेमारीचा अतिरेक (5) किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड (6)पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस (7) उद्योग व शहरे यांतून सोडले जाणारे सांडपाणी (8) समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण

23.कोणकोणते जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत?

उत्तर- निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

24. कोणत्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात?

उत्तर- 60 अंश दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात.

अ) गटात न बसणारा घटक ओळखा आणि सांगा

1) शंख, मासे, खेकडा, जहाज उत्तर- जहाज

2) अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र उत्तर- मृत समुद्र

3)श्रीलंका, भारत, नार्वे, पेरू उत्तर-भारत

4) दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर उत्तर- बंगालचा उपसागर 

5)नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मँगनीज उत्तर- नैसर्गिक वायू

Thursday 11 November 2021

अशी झाली 'बालदिना'ची सुरुवात


आजची मुले उद्याचे भविष्य आहेत.  आणि तेच भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्व यावे, यासाठी 'बालदिन' म्हणजेच 'चिल्ड्स- डे' साजरा करण्याचे ठरले. भारतात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी 'बाल दिन' साजरा केला जातो. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात बालदिन साजरा केला जातो. पहिल्यांदा 'आंतरराष्ट्रीय बाल दिन' साजरा करण्याची कल्पना 1857 मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील डॉक्टर चार्ल्स लिओनार्ड यांना सुचली. त्यांनी ठरवलं की जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करायचा.  त्याला त्यांनी 'रोझ-डे' असे नाव दिले. नंतर त्याचे नाव 'फ्लॉवर-डे' ठेवण्यात आलं आणि शेवटी 'बालदिन' असे नामकरण झाले.

लहान मुलांसाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणारा तुर्की प्रजासत्ताक हा पहिला देश ठरला. फार पूर्वी 1920 मध्ये त्यांनी 23 एप्रिल हा बालदिन म्हणून घोषित केला.  यानंतर 1925 मध्ये जिनेव्हा येथे पहिल्यांदाच संपूर्ण जगासाठी बालदिन निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील 'वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन चाइल्ड वेल्फेअर' या कार्यक्रमात तसा प्रस्ताव ठेवण्यात आला.  त्यानंतर 4 नोव्हेंबर 1949 रोजी रशियातील वुमन्स इंटरनॅशनल डेमोक्रॅटिक फेडरेशनने ठरवले की 1 जून हा दिवस 'मुलांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जाईल.  तेव्हापासून, बहुतेक कम्युनिस्ट देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

1954 मध्ये पहिल्यांदाच युनायटेड किंग्डमने जगातील सर्व देशांमध्ये एकाच दिवशी एकत्रितपणे 'बालदिन' साजरा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी 20 नोव्हेंबर 1959 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने  'डिक्लेरेशन ऑफ द राइट्स ऑफ द चाइल्ड'  चा स्वीकार केला आणि दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी 'जागतिक बालदिन' साजरा केला जातो. असे सर्व असूनही अजूनही बहुतेक  देश स्वतःचा बालदिन साजरा करतात, जसे की न्यूझीलंडमध्ये मार्चच्या पहिल्या रविवारी आणि जपानमध्ये 5 मे रोजी बालदिन साजरा केला जातो. आजही 50 हून अधिक देश 1 जून रोजी बालदिन साजरा करतात. यापैकी अमेरिका हे पुढारलेले राष्ट्र दरवर्षी जूनच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांवर खूप प्रेम करत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी देशभर 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday 8 November 2021

प्राजक्ता अदमाने:आधुनिक तंत्राचा वापर करून मध संकलन करणारी उद्योजिका


गडचिरोलीच्या प्राजक्ता अदमाने-कारू हिचा उल्लेख "मधकन्या'असा केला जातो. ती आता उद्योजक म्हणून पुढे आली आहे. 'कस्तुरी' या नावाने ती मध विकते.  आधुनिक तंत्राचा वापर करून मध गोळा केला जातो. यामुळे मधमाशांना इजा पोहचत नाही. निसर्गाचे नुकसानही होत नाही. याचे प्रशिक्षणही प्राजक्ता इतरांना देते. तिने निसर्गप्रेम व उद्योग या दोन्हींचा संगम साधत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मधमाश्यांचं पोळं जाळून किंवा तोडून मध मिळवण्याऐवजी आधुनिक तंत्राने मधमाश्या पाळून, त्यांच्या माध्यमातून मध व इतर उत्पादन घेण्याची पद्धत त्यांनी स्थानिकांसमोर खुली केली. अदमाने म्हणाल्या, “गडचिरोलीच्या वैविध्यसंपन्न वनांमध्ये वावरत मी लहानाची मोठी झाले. नक्षलग्रस्त मागास भाग असल्याने अजूनही येथे उच्च शिक्षणाच्या सोयी नाहीत. त्यासाठी लोक बारावीनंतर नागपूर किंवा पुण्याला जातात. मी नागपुरात राहून फार्मसीचं शिक्षण घेतलं. काही काळ नोकरी केली. मग एमबीए करून पुण्यात पाच वर्षे नोकरी केली; पण निसर्गाशी जोडून घेऊन आपला स्वतःचा एखादा उद्योग-व्यवसाय असावा, हे प्रकर्षाने वाटत होतं. मधमाशीपालनाचं आधुनिक तंत्र तोपर्यंत माहीत झालं होतं. त्या संदर्भात मी वडिलांशी चर्चा केली. उत्तम पगाराची नोकरी सोडून मधमाशी पालनासंबंधी प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केलं. या घटनेआधी मी जंगलात फिरताना जागोजागी झाडांवर मधमाश्यांची पोळी पहायचे. ती जाळून किंवा पाडून स्थानिक आदिवासी मध मिळवायचे, हेही माहीत होतं, पण याने निसर्गाची हानी होते, हे ज्ञान मला नव्या अभ्यासातून कळलं होतं. मधमाश्या वनस्पतींच्या परागीभवनात फार मोठी भूमिका बजावतात, त्या नष्ट झाल्या तर जंगलं जगणार नाहीत. मधमाश्यापालन विशिष्ट पेट्यांमधून करण्याच्या पद्धतीमुळे मधमाश्यांना हानी पोहचत नाही. मध व मेण तसंच पराग आदी इतर उत्पादनही मिळवता येतात. या नव्या पद्धतीने मी मधमाश्या पालन करायचं ठरवलं." अदमाने यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रात अशा त-हेने मधमाशीपालन अजून बाल्यावस्थेत आहे. हरियाना व राजस्थान या राज्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर असल्याने मी तेथे वरचेवर जाऊन, अनुभवींकडून शिकून घेतलं. वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलोऱ्यांवर मधमाश्या कशा प्रकारे काम करतात, फुलोरा संपल्यावर दुसऱ्या जागच्या फुलोरा शोधत कशा स्थलांतर करतात वगैरे लक्षात घेऊन मधुमक्षिका पालकांसाठी एक वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यात येते. यासंबंधी राष्ट्रीय पातळीवरील मंडळामार्फत असे मार्गदर्शक प्रयत्न केले जातात. संबंधित यंत्रणांकडून मला मिळालेल्या अनुदानातून मी दीडशे पेट्या घेतल्या. सुरुवातीला बाहेरच्या राज्यांतील मजूर आणले. हळूहळू स्थानिकांना सर्व माहिती करून दिली. खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे मधमाशी पालनासंदर्भात चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी मी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करते. खादी ग्रामोद्योग महामंडळासाठी अकरा जिल्ह्यांमध्ये मी पुरवठादार आहे. पोळ्यांमधून मिळणाऱ्या मधाबरोबरच मेण व पराग आदी उत्पादनही आम्ही विकतो. या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात माझी कुचेष्टा करणारे कित्येकजण आता मार्गदर्शन घ्यायला येतात. सन्मानपूर्वक आता माझा उल्लेख 'मधकन्या' म्हणून केला जातो. गडचिरोलीतलं माहेर आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावी सासर, या दोन्ही ठिकाणी मधमाश्यांच्या कृपेने माझी ये-जा सतत चाललेली असते.