Thursday 28 October 2021

काही वनस्पतींची पानं पाहून आश्चर्य वाटेल

वनस्पती विश्वात विविध प्रकारची झाडं,रोपं आढळून येतात. काही वनस्पती फारच छोटी असतात,तर काही झाडं विशालकाय असतात. त्यातही काही झाडांची पानं खूप छोटी असतात,काही मोठी असतात. काही झाडांची पानं लांब असतात, काही फारच अरुंद असतात. अशाच काही वनस्पतींची माहिती करून घेणार आहोत. ही माहिती वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.


व्हिक्टोरिया अॅमेझोनिका

 वॉटर लिली कुटुंबातील ही सर्वात मोठी वनस्पती आहे.  पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये हिच्या पानांचा आकार  सर्वात मोठा आहे.  प्लेटसारख्या दिसणाऱ्या हिच्या  पानाचा व्यास 3 मीटर (सुमारे 10 फूट) पर्यंत आहे.  हिची पाने खूप मजबूत असतात.  ही पाने सरोवर किंवा नदीच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात, 26 फूट लांबीपर्यंत देठांना जोडलेली असतात.  तुमच्यासारखी एक-दोन लहान मुलं हिच्या पानावर सहज बसू शकतात.  बसण्यापूर्वी पानावर पारदर्शक प्लास्टिकचा थर टाकला जातो, जेणेकरून शरीराच्या वजनामुळे पान फुटू नये.  ही वनस्पती दक्षिण अमेरिका खंडातील अॅमेझॉन बेसिनमध्ये आढळते.


रॅफिया रेगलीस

 खजूर झाडाच्या 20 प्रजातींचा  रॅफिया वंशामध्ये समावेश करण्यात आला आहे.  यापैकीच एक प्रजाती रॅफिया रेगलीस आहे.  या झाडाचे पान 25.11 मीटर म्हणजेच 82  फूट लांब असते. पानांची ही इतकी लांबी 9 मजली इमारतीच्या बरोबरीची असते. झाला ना आश्चर्यचकित!  पानाची रुंदी 3 मीटर म्हणजे सुमारे 10 फूट आहे. रॅफिया रेगलीस ही वनस्पती दक्षिण आफ्रिका खंडातील अंगोला, कॅमेरून, रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबॉन आणि नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये आढळून येते.


वुल्फिया

 वोल्फिया ही 9 ते 11 जलीय वनस्पती प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. यात पृथ्वीवर वाढणाऱ्या सर्वात लहान फुलांच्या वनस्पतींचा समावेश होतो.  त्यांना वॉटरमील किंवा डकवीड असेही म्हणतात.  वोल्फिया प्रजातीच्या वनस्पतींची पाने जगातील सर्वात लहान मानली जातात.  वोल्फिया वनस्पती तलाव, सरोवर आणि दलदलीच्या पृष्ठभागावर शेकडो हजारांच्या संख्येने तरंगताना दिसते.  मुलांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वुल्फिया वनस्पतीचा आकार पेनच्या निबपेक्षाही लहान असतो.  प्रत्येक वनस्पतीला एक सपाट अंडाकृती अशी खूप लहान पाने असतात, ज्याची लांबी एक चतुर्थांश इंच असते.

 वोल्फिया प्रजातीच्या वनस्पतीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असते.  म्हणूनच ही वनस्पती आशिया खंडातील बहुतांश भागात भाजी म्हणून खाल्ली जाते.  एका मानवी तळहातावर एका वेळी शेकडो वुल्फिया वनस्पतीची रोपे ठेवू शकतो.


गुनेरा मॅनिकटा

 मुलांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची, वनस्पतींची काळजी घेतली आहे. तुम्ही त्यांची पाने पाहिली असतील.  काही झाडांची पाने तुमच्या करंगळी एवढी तर काही पाने तळहाताएवढी मोठी असतात. मात्र वनस्पतिविश्वात गुनेरा मॅनिकटा या वनस्पतीच्या   पानांचा आकार सर्वात मोठा असतो.  गुनेरा मॅनिकटा ही  ब्राझीलमध्ये उगवणारी गनेरेसा कुटुंबातील एक वनस्पती आहे.  याला ब्राझिलियन जायंट-रुबार्ब किंवा जाइन्ट रुबार्ब म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीच्या पानांचा आकार पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याच्या पानांचा आकार एका  प्रौढ माणसाच्या आकारापेक्षाही मोठा असतो.  या वनस्पतीची पाने 2 मीटर म्हणजे 8 फूट रुंद आणि 3.4 मीटर म्हणजे 11 फूट लांब असतात.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 27 October 2021

सर्वात मोठा रॉकिंग हॉर्स


मुलांनो, घोडा असलेल्या पाळण्याला  इंग्रजीत रॉकिंग हॉर्स म्हणतात.  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक रॉकिंग हॉर्स आहे, जो सहा मजली इमारतीपेक्षा उंच आहे.  त्याला बिग रॉकिंग हॉर्स असे नाव देण्यात आले आहे.  हा दक्षिण ऑस्ट्रेलियातील गुमेराचा शहरात आहे.हा रस्त्याच्या एका बाजूलाच असल्याने प्रवाशांच्या आकर्षणाचा एक भाग बनला आहे. हा रॉकिंग हॉर्स  1981 मध्ये बांधला गेला. या मोठ्या रॉकिंग हॉर्सला पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आले  आहे.  खालच्या पाळण्याची फक्त दुमडलेली बाजू लाल रंगाची आहे.तिथल्या लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या  मोठ्या रॉकिंग हॉर्सच्या डोक्यापर्यंतची एकूण उंची 18.3 मी (60 फूट) आणि लांबी 10.5 मीटर (34 फूट) आहे.त्याच्या डोक्याची उंची 6.1 मीटर (20 फूट) आहे.  हा जगातील सर्वात मोठा रॉकिंग हॉर्स मानला जातो.  त्याची संपूर्ण रचना 25 टन वजनाच्या स्टील फ्रेमने बनलेली आहे.  बिग रॉकिंग हॉर्समध्ये तीन स्तरांचे प्लॅटफॉर्म आहेत. पहिल्यांदा जमिनीपासून 15 फूट उंच बांधलेल्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर जाता येते.  हा प्लॅटफॉर्म दुमडलेल्या लाल रंगाचा भाग घोड्याच्या पायांच्या जवळ आहे.  येथे घोड्याच्या पायांच्या आतील बाजूस पायऱ्या बांधलेल्या आहेत, ज्या पाठीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात.  हा फ्लॅटफॉर्म  जमिनीपासून 35 फूट उंच आहे.  प्लॅटफॉर्म मानेच्या हिश्श्याशी संलग्न आहे.  मानेच्या आतही पायऱ्या आहेत, ज्यामुळे वरच्या बाजूला तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाता येते.  डोक्यावर एक आयताकृती लहान व्यासपीठ आहे.  हे व्यासपीठ जमिनीपासून 60 फूट उंचीवर आहे.  त्याची उंची सुमारे सहा मजली इतकी आहे.इथे उभे राहून बिग रॉकिंग हॉर्सजवळ असलेली टॉय फॅक्टरी,कॅफे आणि प्राणी संग्रहालय पाहता येते.प्लॅटफॉर्मवरून पाहिल्यावर खालच्या वस्तू खूपच छोट्या दिसतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


छोटा गोंडस गिनी पिग


मुलांनो, तुम्हाला गिनीपिग नावाच्या एका छोट्याशा प्राण्याबद्दल माहिती आहे का?  हा छोटा प्राणी खूपच गोंडस आहे. जरी त्याचे नाव पिगी म्हणजेच डुकराशी संबंधित असले तरी, त्याचा  जैविकदृष्ट्या डुकराशी  दुरान्वयेही संबंध नाही. गिनी पिग ससा वर्गातील प्राणी आहे. याला कॅव्ही किंवा घरगुती कॅव्ही या नावानेही ओळखले जाते. गिनी पेरू, इक्वेडोर आणि कोलंबिया देशांमध्ये राहणारे इंका आदिवासी समाजातील लोक फार पूर्वीपासून गिनी पिग पाळत ​​होते.  ते गिनी पिगला एक स्वादिष्ट अन्न मानत.

विशेष म्हणजे अमेरिकेचा शोध लागल्यानंतर लगेचच खाण्याच्या उद्देशाने गिनी पिगला युरोप खंडात आणले गेले. आता फक्त पेरूमधील काही स्थानिक लोक गिनी पिग खातात. पण आज दक्षिण अमेरिका आणि इतरत्र त्यांचा  पाळीव प्राणी म्हणून सांभाळ केला जातो. तिथले लोक गिनी पिग पाळीव प्राण्यांच्या दुकानातून खरेदी करतात.  गिनी पिगच्या शरीराची लांबी सुमारे 25 सेमी आणि वजन सुमारे एक किलोग्रॅम असते.  त्यांना शेपूट नसते. त्यांचे कान लहान, पण केस नसलेले आणि गोल असतात. त्यांच्या पुढच्या पायांना चार बोटे असतात आणि मागच्या पायांची तीन बोटांसारखी रचना आहे.  त्यांच्यावर नखेही असतात. गिनी पिग हा शाकाहारी प्राणी आहे. अन्न खाताना ते मागच्या पायावर बसतात. जंगलात मात्र ते बिळात राहतात. फक्त संध्याकाळी खाण्यासाठी बिळातून बाहेर पडतात. पाळीव प्राणी म्हणून सांभाळ करताना त्यांना वेळोवेळी अन्न आणि पाणी द्यावे लागते. मेडिकल सायन्सशी संबंधित संशोधनात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गिनी पिगचे आयुष्य साधारण आठ वर्षांचे असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Wednesday 20 October 2021

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ


१) अग अग म्हशी मला कुठं नेशी - एखादी गोष्ट स्वतः इच्छा असून करता येत नसली म्हणजे दुसऱ्याच्या आडून ती करणे .

२) अती खाणे मसणात जाणे - खाणे आणि पिणे यामध्ये अतिरेक झाल्यास परिणाम घातक होतो.

३) असतील शिते तर जमतील भुते - आपल्याजवळ जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत मित्रांची वाण नसते.

४) असेल हरी तर देई खाटल्यावरी - नशिवावर हवाला ठेवणारे लोक स्वतः प्रयत्न करीत नाहीत. ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात .

५) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - भलत्याच माणसाशी गाठ पडली असता किंवा मैत्री जडली असता आपले प्राण धोक्यात पडतात .

६) अती तेथे माती - एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे त्याचा परिणाम वाईट होतो.

७) अती शहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करावयास जातो, तो अंती फसतो.

८) अति राग भीक माग - संतापी माणूस आपलेच नुकसान करून घेतो .

९) अडला नारायण गाढवाचे पाय धरी - थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते.

१०) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यात आनंद मानणाऱ्यांना संधी प्राप्त झाली की जास्त उत्साह येतो. / एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.

११) आयत्या बिळावर नागोबा - विनासायास दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा मिळणे.

१२) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार ?

१३) आपला हात जगन्नाथ - आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.

१४) आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही वाजूंनी कोंडमारा.

१५) आईजीच्या जिवावर बाईजी उदार - दुसऱ्याचा पैसा खर्च करून उदारपणा दाखविणे.

१६) आधी पोटोबा मग विठोवा - अगोदर स्वार्थ मग परमार्थ .

१७) अंथरूण पाहून पाय पसरावे - मिळकत पाहून खर्च करावा .

१८) आयत्या पिठावर रेघोट्या - स्वतः श्रम न करता दुसऱ्याच्या कष्टाचे फळ घेणे.

१९) इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे .

२०) आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते - एकाने मेहनत करावयाची व त्याचा फायदा दुसऱ्यांनी घ्यावयाचा.

२१) आंधळा मागतो एक डोळा , देव देतो दोन - थोड्या लाभाची अपेक्षा असताना जास्ती लाभ होणे.

२२) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे .

२३) उचलली जीभ लावली टाळ्याला - अविचाराने बोलणे .

२४) उथळ पाण्याला खळखळाट फार - अल्पज्ञान असलेला आपल्या ज्ञानाचा फार गाजावाजा करतो.

२५) उंदराला मांजर साक्ष - ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्याच्यावद्दल विचार न करता साक्ष देणे.

२६) उधाराचे पोते सव्वा हात रिते - माल उधार घेणाराचे वजन , माप , भाव इ .मध्ये नेहमी नुकसान होते , म्हणून उधारीचा व्यवहार करू नये. उधार देणारा वजनात मारून फायदा घेतो.

२७) उद्योगाचे घरी ऋद्धीसिद्धी पाणी भरी - उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते .

२८) एक ना धड भाराभर चिंध्या - एकावेळी अनेक गोष्टी केल्याने एकही बरोबर होत नाही.

२९) एकादशीच्या घरी शिवरात्र - अडचणीमागे अडचण येणे .

३०) एका हाताने टाळी वाजत नाही - भांडण एका पक्षाकडूनच होते असे नाही , दुसऱ्या पक्षाचाही त्यात काहीतरी दोष असतो .

३१) ऐकावे जनाचे करावे मनाचे - अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

३२) कधी तुपाशी कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते; तिच्यात बदल होत असतो . सुखदुःखमय जीवन असते.

३३) कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले , तरी कडू ते कडूच - दुर्जन कशानेही सुधारत नाहीत.

३४) कर नाही त्याला डर नाही - जो अपराधी नाही त्याला शिक्षेची भीती वाळगण्याचे कारण नाही.

३५) करावे तसे भरावे - ज्या प्रकारचे कृत्य करावे त्या प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार असावे.

३६) कसायाला गाय धार्जिणी - दुष्ट आणि कठोर माणसाशी सर्व लोक नम्रतेने वागतात.

३७) कानामागून आला आणि तिखट झाला - वयाने लहान असून मोठ्यांना शिकविणे ,वरचढपणा दाखविणे .  लहान असूनही डोईजड.

३८) कामापुरता मामा ताकापुरती मावशी - काम साधून घेण्यापुरते गोड बोलणे .

३९) काप गेले नि भोके राहिली - वैभव नष्ट झाले आणि वैभवाच्या गप्पा किंवा निरर्थक खुणा मात्र शिल्लक राहिल्या.

४०) काखेला कळसा आणि गावाला वळसा - वस्तू जवळ असून भान न राहून तिचा गावभर शोध करणे.

४१) कुन्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच जातभाई फितूर झाला म्हणजे फार घात करतो

४२) कुसंतानापेक्षा निःसंतान बरे - वाईट पुत्र असण्यापेक्षा मुळीच नसलेला वरा .

४३) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे राहत नाही - जी गोष्ट होणारच आहे , ती क्षुल्लक अडथळयास जुमानत नाही .

४४) कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र मनुष्य क्षुल्लक वस्तूच्या लाभाने आनंदतो .

४५) कोळसा किती उगाळला तरी काळाच - वाईट गोष्टीची कितीही छाननी केली तरी त्यातून वाईटच निघणार.

४६) कोरड्याबरोबर ओले जळते - वाईटांच्या संगतीने चांगलेही वाईट होतात.

४७) खऱ्याला मरण नाही- खरे कधी लपत नाही , ते केव्हा ना केव्हा तरी उघडकीस येते.

४८) खायला काळ भुईला भार - निरर्थक , आळसात फुकट आयुष्य घालविणाऱ्याला उद्देशून म्हणतात.

४९) खाई त्याला खवखवे- अपराध करणाऱ्याला आपला अपराध जाणवत असतो.

५०) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी- परिस्थितीशी जुळते न घेणारा व स्वतःच्या मताप्रमाणे वागणारा.

५१) खाण तशी माती- आई-बापांचे गुणधर्म मुलांच्या अंगी उतरतात .

५२) खोट्याच्या कपाळी गोटा - खोटे काम करणाऱ्याला शिक्षा होते.

५३) गर्वाचे घर खाली - अभिमानी माणसाचे शेवटी नुकसानच होते.

५४) गरज सरो वैद्य मरो - आपले काम संपल्यावर उपकारकर्त्याला विसरून जाणे . कृतघ्नपणा दाखवणे.

५५) गरजवंताला अक्कल नसते - गरजू मनुष्य मूर्खासारखा वागतो . / गरजू माणसाला नाईलाजाने मूर्खपणा पत्करूनही याचना करणे भाग पडते.

५६) गाव करील ते राव करणार नाही - गावचे सगळे गावकरी एकमताने वागले तर त्यांच्या हातून महत्कार्य होते , तसे प्रत्यक्ष राजाच्याही हातून होत नाही.

५७) गाढवाला गुळाची चव काय - एखाद्या वस्तूचे महत्त्व अडाणी माणसाला कसे कळणार?

५८) गाढवांचा गोंधळ , लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एके ठिकाणी जमा झाले तर ते मूर्खपणाचीच कृत्ये करणार .

५९) गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता - अरसिक मनुष्याला मौल्यवान गोष्टीची योग्यता कळत नाही.

६०) गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

६१) गोगल गाय अन् पोटांत पाय - कपटी मनुष्य.

६२) घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थितीत लहान - मोठे सर्वच उलट वागू लागतात.

६३) घरोघरी मातीच्या चुली - सर्वसाधारण स्थिती सर्वत्र एकसारखीच .

६४) चालत्या गाड्याला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात विघ्न आणणे.

६५) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाचे केव्हातरी अधिकार गाजविण्याचे दिवस येतात . | प्रत्येकाला केव्हा ना केव्हा वर्चस्वाची संधी मिळते.

६६) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे- गुन्हेगाराला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे .

६७) चोराच्या उलट्या बोंबा - आपणच गुन्हा करून आपणच ओरडा करणे.


Thursday 14 October 2021

रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य


हिंदू दिनदर्शिकेनुसार आज दसरा आहे. भगवान रामाने यादिवशी रावणाचा वध केला.आणि देवी दुर्गाने नऊ रात्री आणि दहा दिवसांनी महिषासुरावर विजय मिळवला होता.म्हणून हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून 'विजयादशमी' या नावानेही साजरा केला जातो.दहा डोके असल्याने रावणाला दशानन म्हटले जाते.पण तुम्हाला माहीत आहे का की रावणाला दहा डोकी कशी मिळाली आणि ते कशाचे प्रतिनिधित्व करतात? चला तर मग जाणून घेऊया रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य...

जेव्हा रावणास महादेव झाले प्रसन्न

 त्रिलोक विजेता रावण हा भगवान महादेवांचा परमभक्त होता. एकदा त्याने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. जेव्हा हजारो वर्षे रावणाच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत, तेव्हा निराश होऊन रावणाने भगवान शंकराला आपले मस्तक अर्पण करण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवाच्या भक्तीत लीन झालेल्या रावणाने भोलेनाथला आपले मस्तक अर्पण केले. पण तरीही रावणाचे प्राण गेले नाहीत. शीर अर्पण केल्यानंतर त्या जागी दुसरे डोके आले. असे करून रावणाने भगवान शंकराला तब्बल नऊ वेळा मस्तक अर्पण केले. जेव्हा रावणाला दहाव्या वेळेस आपले मस्तक शंकरास अर्पण करायचे होते, तेव्हा भगवान शिव स्वतः रावणावर प्रसन्न झाले आणि शिवाची कृपा मिळाल्यावर रावण तेव्हापासून दशानन बनला. या कारणामुळे रावण हा भगवान शिवचा परम भक्त मानला जातो.

वाईटाचे दहा डोके

विजयादशमीला रावणाचे पुतळे जाळण्याची परंपरा आहे. रावण हे अहंकाराचे प्रतीक आहे, रावण सत्ता आणि शक्तीचा गैरवापर करण्याचे प्रतीक आहे आणि रावण हे ईश्वरापासून विन्मुख होण्याचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, रावणाचे दहा डोके हे दहा वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत. रावणाचे दहा मस्तक काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अहंकाराचे प्रतीक मानले जाते. रावण देखील या नकारात्मक भावनांनी प्रभावित झाला आणि या कारणामुळे श्रीमंत आणि ज्ञानी असूनही त्याचा नाश झाला. वाल्मिकी रामायणानुसार रावण दहा डोके,  मोठी दाढ, तांब्यासारखे ओठ आणि वीस हात  घेऊन जन्माला आला होता. तो कोळशासारखा  काळा होता आणि त्याच्या दहा ग्रिव्हांमुळे त्याच्या वडिलांनी त्याचे नाव दशग्रीव ठेवले. या कारणामुळे रावण दशानन, दशकंधन नावाने प्रसिद्ध झाला. दहा मस्तके असल्याचा भ्रम रावण भगवान शिवाचा परमभक्त, त्याच्या दहा मायावी शक्तीसाठीदेखील ओळखला जातो.  अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे  की, रावणाचे दहा डोके होते हे फक्त भ्रम निर्माण  करण्यासाठी. कारण रावणाला दहा डोकी मुळात  दहा नव्हतीच. त्याच्या गळ्यात नऊ रत्नांचा हार होता असे म्हणतात. या पुष्पहारामुळे रावणाला दहा मस्तके असल्याचा भ्रम निर्माण होत असे. रत्नांची ही माला रावणाला त्याची आई कैकसीने दिली होती.


Wednesday 13 October 2021

कवठेमहांकाळची महांकाली देवी


एखाद्या देवीच्या नावावरुन त्या गावचे नाव रुढ होणे म्हणजे तसे दुर्मिळ. कमंडलू नदीच्या तीरावर वसलेले हे शहर म्हणून कवठे व ग्रामदेवता श्री महाकाली देवीच्या नावावरुन 'कवठेमहांकाळ' असे नाव पडल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख या मंदिरात देवीच्या दोन मुर्ती आहेत. पूर्वी कमंडलू नदीला आलेले पाणी महांकाली मंदिराच्या पायरीला लागत होते. नदीत दोन कुंड आहेत. त्यातील अंबाकुंडात एका भक्ताला मुर्ती सापडली. ती महांकाली देवीच्या डाव्या बाजूला दिसते. मंदिरापुढे असलेली दीपमाळ साधारण १४० वर्षांची आहे. संस्थान काळात पटवर्धन राजेंच्या पुढाकाराने १९०९ मध्ये मंदिराचा प्रथम जीर्णोध्दार होऊन ५० फूट लांब व ३० फूट रुंदीचे घडीव बांधकाम केले. छतावर चौपाकी पध्दतीची मंगलुरी कौले, सभा मंडपाचे सागवानी खांब बदलण्यात आले. पूर्वी नवरात्रीत सागवानी खांबाना शेतकरी ऊस, ज्वारीचे खुंट, नारळाच्या झावळ्यांनी सुशोभित करत. नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी काचेच्या हंड्यांमध्ये मेणबत्ती किंवा दिवे लावल्याने त्याचा प्रकाश सभामंडप उजळून टाकत असे. सन २००० मध्ये मंदिराचा दुसऱ्यावेळी झालेल्या जीर्णोध्दाराने मंदिराचे रुपडेच पालटले. मंदिराचा गाभारा, सभामंडप संगमरवरी असून २०१० साली कलशारोहण समारंभही झाला. मंदिरात श्री गणेश, श्री मारुती, शिवलिंगही आहे. उजवीकडे तुळस, मागच्या बाजूला श्री नागदेव आणि एक काळ्या पाषाणाची वीरगळ आहे. गर्भगृहात जय-विजय यांचे स्तंभ असून जवळच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.

नित्य पूजेवेळी अभिषेक, देवीसाठी साडी-चोळी, पुष्पसेवा स्वीकारली जाते. विशेष प्रसंगी होणारी पान-पूजा आकर्षक असते. मंदिराचा 'क' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. गुरव बंधूंच्या कित्येक पिढ्या देवीचे पुजारी आहेत.


गुड्डापूरची श्री धानम्मादेवी


कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील गुड्डापूर येथील धानम्मादेवी समस्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर लोकांची रिघ असते. लिंगायत धर्माचे संस्थापक श्री बसवेश्वर यांच्या त्या समकालीन. श्री धानम्मा म्हणजे भक्ती, ध्यान, साधना, संसार व क्रांतीचा अपूर्ण संगम आहे. आध्यात्मिक मुलगी, संसारी गृहिणी ते गणाचार दलाचे सेनाप्रमुख असा त्यांचा जीवन प्रवास अलौकिक आहे. जतपासून सुमारे बावीस किलोमीटरवरील गुड्डापूर हे गाव. या गावास मोठा ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभला आहे. लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे हे श्रद्धापीठ श्री धानम्मा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. जगन्माता, महाशरणी वरदायिनी श्री धानम्मा देवीने जन्मस्थळ जत तालुक्यातील उमराणी हे गाव. श्री बसवेश्वरांनीच त्यांचे धानम्मा हे नाव ठेवले. गुड्डापूर त्यांचे सासर. तेथे त्यांनी आपले महात्म्य प्रकट केले. ती त्यांची कर्मभूमी, तर बसवकल्याण ही धर्मभूमी. सध्या नवरात्रीत कर्नाटकसह महाराष्ट्रातून लोक येत आहेत. दरवर्षी कार्तिकी अमावास्येला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात श्री धानम्मा देवीची यात्रा भरते. गुड्डापूरचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. गेल्या काही वर्षांत लोकवर्गणीतून या मंदिराचा विकास होत आहे. सुंदर व भव्य गोपूर उभारण्यात आले आहे. मंदिरात देवीची ध्यानस्थ अवस्थेत बसलेली सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे धर्मपीठ बनले आहे. धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून या मंदिराचा पुढील काही वर्षात या परिसराचा विकास होणार आहे. या गावामुळे लिंगायत समाजाच्या भाविकांसाठी जत तालुका नकाशात आला आहे.


हातनूर-विसापूर पंचक्रोशीची होनाई देवी


तुळजापूरच्या भवानी देवीचा अवतार म्हणून तासगाव तालुक्यातील हातनूर येथील श्री होनाई देवीचा उल्लेख केला जातो. हातनूर-विसापूर पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे इथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. देवीची आख्यायिका सांगितल्या जातात. त्यात ही देवी कन्नड मुलखातून आल्याचे सांगितले जाते. प्राचीन काळी गावालगत ओढ्याकाठी परीट घाटाजवळ देवीचे मंदिर होते. घाटावर कपडे धुण्याचे अस्वच्छ पाणी देवीच्या अंगावर जात असल्यामुळे देवी अप्रकट झाली. मात्र गावापासून जवळ असणाऱ्या डोंगरावर पुन्हा देवी प्रकट झाली. देवी डोंगरावर असल्याचा दृष्टांत पुजाऱ्याला झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी खोदकाम केले असता घोड्यावर स्वार असलेली मूर्ती सापडली. गावातील लोकांनी या ठिकाणी देवीची स्थापना केली. ज्या डोंगरावर देवीची स्थापना झाली, तो होनाईचा डोंगर म्हणून आता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते, की छत्रपती शिवराय या डोंगरावर वास्तव्याला होते. या ठिकाणी किल्ला बांधण्याचा त्यांचा मानस होता. मात्र जवळच इथे असणाऱ्या नाथबाबाच्या डोंगरावरून शत्रू हल्ला करू शकतो, म्हणून त्यांनी तो बेत रद्द केला. इथे असलेले घोड्याचे नाल शिवरायांच्या घोड्याचे असल्याचे सांगतात. श्रावणात येथे मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. नवरात्रीत दररोज भाविक गडावर दर्शनासाठी येतात. दसऱ्यादिवशी पाटील वाड्यातून देवीची मिरवणूक काढण्यात येते.

यादिवशी पहाटेपासून भाविक ओढ्याकाठी असणाऱ्या मंदिरापासून होनाई मंदिरापर्यंत दंडवत घेतात. नव्या पोर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. सध्या मंदिराचे बांधकाम वेगाने करण्यात येत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या देवस्थानचा परिसर विकसित होत आहे.


शिराळ्याची आंबामाता


करवीरवासिनी अंबामाता मूळची शिराळा येथील आणि कोल्हासुराचा वध केल्यानंतर कोल्हापूर निवासिनी झाली, अशी आख्यायिका आहे. जिवंत नागपूजेसाठी शिराळा हे नाव जगप्रसिद्ध झाले आहे. गोरक्षनाथ, अंबामाता मंदिर, समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुतीपैकी एक मारुती शिराळा येथे असल्याने धार्मिक व ऐतिहासिक असे या गावाचे महत्त्व आहे. येथील अंबामाता मंदिरातील मूर्ती पाषाणावर भाताच्या कोंड्यापासून बनवलेली व कमळावर बसलेली आहे. तालुक्यातील गिरजवडे येथे गिरजासुराचा वध केल्यानंतर जोतिबा व अंबामाता यांची शिराळा येथे भेट झाली. त्याठिकाणी हे मंदिर उभे करण्यात आले आहे. या भेटीमुळे या गावचे नाव अंबामातेचे वसतिस्थान असलेले गाव म्हणून 'श्री आलय' पडले होते. याचबरोबर सर्वांचे येथे रक्षण होईल, असा वर दिल्याचेही श्री नाथ लिलामृत, करवीर माहात्म्य, श्री रामदासांच्या काव्यपंक्तीत उल्लेख आहेत. श्री गोरक्षनाथ यांचे येथे वास्तव असताना ते या मंदिर परिसरात भिक्षा घेऊन आल्यानंतर थांबत असत. ते या गावात वास्तव्यास असतानाच त्यांनी जिवंत नागाची पूजा सुरू केली. या मंदिरात गणेश, शनी मारुती, जोतिबा याचबरोबर शेष नागाची मूर्ती आहे. या मंदिराचा मुख्य गाभारा व पुढील मंडप यांचे दगडामध्ये बांधकाम करण्यात आले आहे. या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नागपंचमीला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.