Saturday 19 June 2021

छोटे संशोधक

मुलांनो, तुम्ही शाळेत मोठ्या शास्त्रज्ञांनी विविध शोध लावल्याचे वाचलं असालच. वाफेच्या इंजिनाचा शोध, बल्बचा शोध, गुरुत्वाकर्षणचा शोध अशा अनेक शोध लावणाऱ्या संशोधकांविषयी म्हणजेच शास्त्रज्ञांविषयी तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेलच. पण तुमच्या वयाच्या मुलांनीही काही शोध लावलेत बरं का. अशाच छोट्या संशोधकांविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे बालसंशोधक भारतातलेच आहेत बरं का!


रिफथ शारूक

तामिळनाडू राज्यातील करूर गावात राहणाऱ्या रिफथ शारुकला इंटरनेटच्या माध्यमातून समजलं की, जगातील सर्वात छोटे सॅटेलाईट बनवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मग काय, रिफथनेदेखील या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले. त्याने त्याच्या शाळेतील शिक्षक आणि मित्रांच्या मदतीने जगातील सर्वात छोटे सॅटेलाईट बनवले.त्याने जे सॅटेलाईट बनवले त्याला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले. हे सॅटेलाईट 3.8 सेंटीमीटर लांब आणि 64 ग्रॅम वजनाचे होते. हे जगातील सर्वात छोटे 3 डी प्रेटेड टेक्नोलॉजिक डेमोंस्ट्रेटिव सॅटेलाइट आहे. याला 'नासा'ने साउडिंग रॉकेटद्वारा अवकाशात पाठवले आहे. रिफथ शारुकच्या टीममध्ये तनिष्क द्विवेदी, यग्नासाई, अब्दुल कासिफ, गोबिनाथ या छोट्या मित्रांचाही समावेश होता.


अनंग तादर

अरुणाचल प्रदेशातल्या अनंग तादर याने एक असा चष्मा बनवला आहे की,ज्यामुळे दृष्टिहीन लोक रस्त्याने जाताना विनाअडथळा चालू शकतात. अनंग तादर पाहत होता  की, दृष्टिहीन माणसं चालताना कशाला ना कशाला तरी धडकत असत. त्यामुळे ते पडायचे, जखमी व्हायचे. एकट्याने चालणे  धोकादायक असते. दृष्टिहीन म्हणजेच अंध लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी त्याने चष्म्यामध्ये इकोलोकेशन टेक्नोलॉजीचा वापर केला. वटवाघळेदेखील इकोलोकेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. वटवाघळे तोंडाने मोठ्याने आवाजात काढतात, ते ध्वनी समोर असलेल्या एकाद्या वस्तूवर धडकून माघारी येतात व ते त्यांना ऐकायला येतात. वटवाघळे उडताना समोरच्या वस्तूला धडकण्यापूर्वी सावध होतात. असेच तंत्रज्ञान चष्म्यात वापरण्यात आले आहे. चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीला कळतं की, समोर काहीतरी आहे. हा चष्मा अंध व्यक्तींना फारच उपयोगाचा ठरला आहे.


श्रेयस किशोर-प्रांशु मलिक

दिल्लीत राहणाऱ्या श्रेयस किशोर आणि प्रांशु मलिक यांनी काही वर्षांपूर्वी एक असे डिव्हाइस बनवले होते की, त्यामुळे वायूप्रदूषण कमी केले जाऊ शकते. राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे. या दोघा मुलांनी ट्रॅफिक एंड एमिशन कंट्रोल सिस्टम नावाचे गॅझेट बनवले. ट्रेसी एक एमिशन सेंसिंग, लोकेशन ट्रॅकिंग आणि नेविगेटिंग डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस बनवण्याचा उद्देश असा की, शहरातील प्रदूषणाच्या स्तराचे विश्लेषण करून ते प्रदूषण कमी करायला मदत करतात. श्रेयस आणि प्रांशू यांनी बारावीत शिकत असताना हे डिव्हाइस बनवले होते. त्यांच्या टीममध्ये आदित्य सेनगुप्ता, दानिश बंसल आणि तन्मय बंसल हे त्यांचे मित्रदेखील सामील होते. मुलांनो, या मुलांप्रमाणेच तुमच्याही डोक्यात एखाद्या आविष्काराची आयडिया असेल तर त्यावर मन लावून काम करा. काय माहीत! तुमच्याकडूनही एकादा आविष्कार घडून जाईल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday 18 June 2021

अशी झाली 'फादर्स-डे' ची सुरुवात


मुलांनो, दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. तुम्हाला माहीत आहे का की, फादर्स डेची सुरुवात कशी झाली? मुलांनो, फादर्स-डे सर्वात पहिल्यांदा 19 जून 1910 रोजी अमेरिकेतल्या वाशिंग्टनमध्ये साजरा करण्यात आला होता. या साजरा करण्यामागे सोनोरा स्मार्ट डोड या महिलेची एक मोठी गोड कहाणी आहे. सोनोरा जेव्हा खूप छोटी होती,तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी सोनोराला कधीच आईची उणीव भासू दिली नाही. त्यांनी सोनोराचा मोठ्या लाडा-प्रेमानं सांभाळ केला. मोठी झाल्यावर एक दिवस सोनोराच्या मनात एक विचार आला की, ज्या प्रकारे बाकी दिवस साजरे केले जातात, त्याच प्रकारे वडिलांच्या नावेही एक दिवस असावा. अशा प्रकारे सोनोरा स्मार्ट डोड यांच्या माध्यमातून19 जून 1910 रोजी पहिल्यांदा 'फादर्स-डे' साजरा करण्यात आला. मुलांनो, 1924 मध्ये अमेरिकी राष्ट्रपती  कॅल्विन कोली यांनी फादर्स-डे साजरा करण्याला मान्यता दिली. 1966 मध्ये राष्ट्रपती जॉन्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स-डे साजरा करण्याला अधिकृत घोषणा केली. 1972 मध्ये फादर्स-डेला सुट्टी जाहीर करण्यात आली. आता संपूर्ण विश्वभरात जून च्या तिसऱ्या रविवारी फादर्स-डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलांनो, 20 जून 2021 रोजी साजरा होणाऱ्या फादर्स-डेला  111 वर्ष पूर्ण होत आहेत.या दिवशी जगभरात आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी त्यांच्यासाठी कार्ड तयार करतात, गिफ्ट देतात. वडिल प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक थॅंक्स तर बनतचं. तुम्हीदेखील या दिवशी तुमच्या वडिलांसोबत फादर्स-डे साजरा करायला विसरू नका. त्यांना एकादे छान गिफ्ट, यामुळे तुमच्या वडिलांना खूप आनंद मिळेल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

Sunday 13 June 2021

जगातील सर्वात छोटे प्राणी


या जगात असंख्य लहान-मोठे जीव-जंतू आहेत. अद्याप काहींचा शोध लागला आहे, काहींचा नाही, पण शोध-संशोधन सुरूच आहेत. या जगातले डायनोसॉरसारखे अनेक भलेमोठे आणि भयंकर जीव लुप्त झाले आहेत. हत्ती,जिराफ, उंट असे प्राणी पाहायला मिळतातच,तसेच सामान्य आकारात असलेला ससा, माकड,कासव, हमिंगबर्ड,वटवाघूळ, चिचुंद्री, साप,मासा आणि बेडूक इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. परंतु या जगात सर्वात छोटेही प्राणी आहेत. जे मुलांच्या किंवा मोठयांच्याही पाहण्यात आढळून आले नाहीत. अशाच प्राण्यांविषयी जाणून घेऊया.

पिग्मी रॅबिटः पिग्मी रॅबिट ही जगातील सर्वात लहान अशा सश्याची प्रजाती आहे. याच्या शरीराची लांबी 23.5 ते 29.5 सेंमी दरम्यान असते तर वजन 375 ते 500 ग्रॅम असते. हा ससा उत्तर अमेरिका महाद्वीपच्या ग्रेट बेसिन आणि मोटाना क्षेत्रात आढळून येतो. पिग्मी रॅबिट हा मोठ्या माणसाच्या दोन्ही ओंजळीत आरामात सामावू शकतो. 

पिग्मी मार्मोसेट: ही माकडाची सर्वात छोटी प्रजाती आहे. याच्या शरीराची लांबी 4.75 ते 6 इंच आणि वजन 3.53 ते 4 औंस (अडीच तोळा) दरम्यान असते.पिग्मी मार्मोसेट हवेत पंधरा फुटापर्यंत उडी मारू शकतो. तो डोके 180 डिग्रीपर्यंत फिरवू शकतो. ब्राझील, पेरू,कोलंबिया आणि इक्वाडोर देशांमध्ये आढळून येणारी ही माकडाची प्रजाती आपले  बहुतांश आयुष्य झाडावरच घालवते.

एट्रस्कॅन श्रूः श्रूला मराठीत चिचुंद्री म्हणतात. याला एट्रस्कॅन पिग्मी श्रू आणि पांढऱ्या दातांचा पिग्मी श्रू असेही म्हणतात. याच्या शरीराचे वजन 1.2 ते 2.7 ग्रॅम असते. वजनाच्या हिशोबानुसार हा जगातला सर्वात छोटा सस्तनप्राणी आहे. याच्या मेंदूचे वजन शरीराच्या तुलनेने अधिक असते. 

 स्पेकल्ड पॅडलोपर टोर्टोइज: ही कासवाची सर्वात लहान प्रजाती आहे. या प्रजातीच्या शरीराची लांबी 6 ते 8 सेंटीमीटर असते. याची मादी नराच्या तुलनेत थोडी मोठी असते.स्पेकल्ड पॅडलोपर टोर्टोइज जगात केवळ दक्षिण अमेरिका खंडामध्ये सापडते.

बी हमिंग बर्डः याला जुंगँसिटो किंवा हेलेना हमिंग बर्ड या नावानेदेखील ओळखले जाते.  हमिंग बर्डची ही सर्वात लहान प्रजाती आहे. शिवाय हा जगातील सर्वात छोटा पक्षी आहे. याच्या शरीराची लांबी 5.7 सेंटीमीटर तर वजन अंदाजे 1.8 ग्रॅम असते.

किट्टीज हॉग-नोज बॅटः याला बंबल-बी (भुंगा) बॅट नावानेही ओळखले जाते,कारण याचे शरीर भुंग्याएवढेच असते. हे वटवाघूळ जगातील छोटे आहे.याच्या शरीराची लांबी 1.1 ते 1.6 इंच आणि वजन दीड ते दोन ग्रॅमदरम्यान असते. हे वटवाघूळ थायलंड आणि म्यानमार देशांमध्ये आढळते.

स्लेंडर ब्लाइंड स्नेक : याचे दुसरे नाव थ्रेड स्नेक असेही आहे. असे नाव पडण्याचे कारण म्हणजे हा दिसायला एखाद्या दोऱ्यासारखा दिसतो. आता हे सांगायची गरज नाही की, हा जगातला सर्वात छोट्या प्रजातीतला साप आहे. स्लेंडर ब्लाइंड स्नेकच्या शरीराची लांबी 11 सेंटीमीटर असते. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये  87 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.

पीडोसायप्रिस: हा छोट्या सायप्रिनिड माशांचा समूह आहे,जो इंडोनेशियाच्या सुमात्रा आणि बिंटन बेटांवर दलदली भागात आणि नद्यांमध्ये आढळतो. ही जगातील सर्वात छोट्या माशांची प्रजाती आहे. आतापर्यंत आकारामध्ये सर्वात छोट्या वयाच्या मादीची लांबी 7.9 मिमी आणि सर्वात मोठ्या वयाच्या माशाची लांबी 10.3मिमी इतकी आढळते.

एडोफ्रिन एमसिस: हा जगातील सर्वात छोट्या प्रजातीचा बेडूक आहे. याचा शोध 2009 साली न्यूगिनीमध्ये लावण्यात आला. याच्या शरीराचा आकार 7.7 मिमी आहे. हा सर्वात छोटा कशेरुक प्राणी (पाठीचा कणा वर्गातील) आहे. एका वयस्क माणसाच्या नखावर बसवल्यावरही हा खूप छोटा दिसतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Thursday 3 June 2021

आदिवासी सीमा कुमारीला मिळाला हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश


रांचीपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओरमांझी तालुक्यातल्या दाहो गावच्या सीमा कुमारी या आदिवासी मुलीने इतिहास रचला आहे. प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध असलेल्या हार्वर्ड यूनिवर्सिटीत तिला वेतनासह प्रवेश मिळाला आहे. ती तिथे चार वर्षे राहून पदवीचा अभ्यास करणार आहे. ती नॅशनल स्कूल ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) मध्ये शिक्षण घेत होती. आता बारावी उत्तीर्ण झाली आहे.

सीमाच्या वडिलांचे म्हणजेच सिकंदर महातो (44) यांचे फक्त दुसरीपर्यंत तर आई सरस्वतीदेवी (40) यांचे पाहिलीपर्यंत शिक्षण झाले आहे. सीमा गावातल्या सरकारी प्राथमिक शिकली आहे. नंतर ती एका स्वयंसेवी संस्थेशी जोडली गेली. याच संस्थेने तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली. 'युवा' नावाच्या या संस्थेमध्ये एनआयओएसच्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाते. सीमाच्या म्हणण्यानुसार तिने हार्वर्ड विद्यापीठाच्या वेतन आणि प्रवेशासाठी गेल्या वर्षीच अर्ज केला होता. यानंतर तिची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत काम, शिक्षण, संस्थेतील भूमिका ,येणाऱ्या काळात तिला काय करायचं आहे, यासारखे काही प्रश्न विचारण्यात आले. काही निबंध लिहून घेण्यात आले. तसेच तिला कौटुंबिक पार्श्वभूमीविषयही प्रश्न विचारण्यात आले.

सीमाने हार्वर्डशिवाय यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया, कोलंबिया आणि प्रिंस्टनसाठीदेखील आवेदन फार्म भरले होते. तिच्या घरच्यांना मात्र एवढंच कळलं आहे की, आपल्या सीमाला अमेरिकेतल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. घरच्यांना याचा खास काही आनंद झालेला नाही,कारण त्यांना हार्वर्डबाबत काहीच माहिती नाही. तिचे आईवडील चांगले शिकले असते तर त्यांना त्याचे महत्त्व कळाले असते.

सीमाच्या कुटुंबात तिचे आई-वडील, मोठा भाऊ, सहा बहिणी आणि आजी, चुलते-चुलती,त्यांची मुले इत्यादी आहेत. वडील पूर्वी धागे बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते. टाळेबंदीमुळे त्यांचे काम सुटले. आता ते एका बेकरीत काम करतात. महिन्याला सात हजार रुपये कमावतात. थोडी शेती आहे,ज्यात भात, भाजीपाला पिकतो. 

सीमाने एकदा गावात मुलींना फुटबॉल खेळताना पाहिले. आईने तिलाही फुटबॉल खेळायला परवानगी दिली. युवा नावाची स्वयंसेवी संघटना फुटबॉल शिबिर चालवत होती. ती त्या संस्थेशी जोडली गेली.  त्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. इंग्रजीवर जास्त मेहनत घेतली गेली.सीमा स्पेनला जाऊन फुटबॉलदेखील खेळून आली. सीमाच्या म्हणण्यानुसार, तिच्या गावात तिच्यासह अन्य आदिवासी घरांमध्ये हंडीया (भातापासून बनवलेली गावठी दारू)बनवून ती विकली जाते.त्यामुळे थोडे अधिक पैसे मिळतात.

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विट करून मुलीला शिकवा, ती जग बदलू शकते. ही एक मोठी प्रेरणा देणारी घटना आहे,असं म्हटलं आहे. सीमा म्हणते, मी इन्स्टाग्राम, ट्विटरवर प्रियांकाची पोस्ट वाचली. पहिल्यांदा तर मला विश्वासच बसत नव्हता. मी त्यांच्या व अन्य लोकांच्या आशेचा आदर करते आणि पूर्ण मेहनत घेते. तिला शिक्षण झाल्यावर भारतात परत यायचं आहे. महिलांच्या सशक्तीकरण, विकासाबरोबरच मुलांसाठी,स्त्रियांसाठी काम करायचं आहे. त्यांच्यासाठी खास पुस्तकं लिहायची आहेत. सीमाला बायोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षा किरण मुजुमदार यांनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 2 June 2021

भारतातील जैवविविधता


निसर्गातील सजीव सृष्टीत असणारे वैविध्य म्हणजे जैवविविधता. जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर प्रचंड जैवविविधता आहे, मात्र यातील फक्त २० टक्केच जैवविविधता आजअखेर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलेली आहे. ८० टक्के जैवविविधता अद्याप मानवास अपरिचित आहे. आतापर्यंतच्या सजीवांच्या १८ लाख प्रजाती अभ्यासल्या गेल्या. त्यांपैकी ११ लाख प्राण्यांच्या, चार लाख वनस्पतींच्या, तर उर्वरित प्रजाती सूक्ष्म जिवांच्या आहेत. जागतिक स्तरावर भारत हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेत सहावा, पक्ष्यांच्या विविधतेत सातवा, उभयचर व सस्तन प्राण्यांच्या संख्येत आठवा असून, सपुष्प वनस्पतींच्या विविधतेत बाराव्या स्थानावर आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.भारतात हवामान व भौगोलिक रचनेत मोठी विविधता आहे, येथे प्राण्यांच्या ८१ हजार, तर वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती नोंदविल्या आहेत. सस्तन प्राण्यांच्या ३७२ प्रजाती, पक्ष्यांच्या १२२८, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४२८, उभयचर प्राण्यांच्या २१०, तर माशांच्या २५४६ प्रजाती आढळतात. किटकांच्या ५० हजार, तर इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुमारे २६ हजार प्रजाती आहेत. भारतात सर्वात जास्त जैवविविधता हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसरातील वनक्षेत्रात आढळते. 

भारतात अस्तित्वात असणाऱ्या एकूण प्रजातींपैकी ६३ टक्के प्रजाती हिमालयात आढळतात. दख्खनचे पठार व पश्चिम किनारपट्टीत पसरलेली पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट. एकूण सहा राज्यांत पश्चिम घाट पसरलेला असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. जंगलवनांत व सभोवताली असणारी जैवविविधता मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मानली जाते. 

जैवविविधता व वन्यजिवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी शासनाकडून अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच संरक्षित राखीव वनांची निर्मिती केली आहे. वाघ, सिंह, हत्ती, बिबटे, पक्षी यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी संरक्षित केंद्रे तयार केली आहेत; पण दुसऱ्या बाजूस शेती व रस्ते विकास, शहरीकरण व औद्योगिकीकरणासारखे विकास प्रकल्प अनियंत्रितपणे राबविले जात असल्याने वनांच्या ऱ्हासाचा वेग प्रचंड वाढलाय.  वाघ, सिंह, हत्ती हे वन्यप्राणी अतिसंकटग्रस्त बनले आहेत. भारतात दरवर्षी ३० हत्ती व ५० वाघांची चोरटी शिकार होते. २०१८ मध्ये भारतात १०२ वाघ, ५७ हत्ती व ४७३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज भारतात सपुष्प वनस्पतींच्या १५०० प्रजाती व १२० वनौषधी संकटग्रस्त म्हणून जाहीर केल्या आहेत. चिता नामशेष झाला आहे.भारतातील सस्तन प्राण्यांच्या ९० प्रजाती, पक्ष्यांंच्या ७५, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २५, उभयचरांच्या २५ व माशांच्या ३९ प्रजाती संकटग्रस्त असून, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. देशी वाणंही नष्ट होत आहेत. जंगलवनांवरील मानवी हस्तक्षेप असाच सुरू राहिल्यास पुढील ३० वर्षांत भारतातील ४८ ते ५० टक्के जैवविविधता नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.वाढते प्रदूषण व वनांचा विनाश यामुळे जागतिक तापमानवाढ व बदलते हवामान यांचे गंभीर संकट उभे आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ विचारसरणी स्वीकारली पाहिजे.

जगातील सर्वात उंच पुतळे

मुलांनो,जगात पाहण्यासारखं खूप काही आहे. त्यात सर्वात उंच,भव्यदिव्य अशा पुतळ्यांचाही समावेश आहे. हे पुतळे पाहून तुम्ही दंग होऊन जाल. आता आपण जगातल्या सर्वात उंच अशा पाच पुतळ्यांची माहिती करून घेणार आहोत. 


स्टेच्यू ऑफ यूनिटी, भारत: जगातला सर्वात उंच पुतळा आपल्या भारतात आहे. हा भव्यदिव्य पुतळा गुजरात राज्यात नर्मदा नदीच्या किनारी आणि सरदार सरोवराच्या बांधाजवळच्या साधू बेटावर उभारण्यात आला आहे. हा पुतळा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. याची उंची 597 फूट (182 मीटर) आहे. तर चबुतऱ्यासह एकूण उंची 787 फूट आहे. ब्राँझपासून बनवण्यात आलेला हा पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी सरकारला असून जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद झाली आहे.


स्प्रिंग टेंपल बुद्धा, चीन: जगातला दुसरा सर्वात उंच पुतळा चीनमधील हेनान प्रांतातल्या लुशान कौंटी डोंगरावर साकारण्यात आला आहे. या भगवान बुद्ध्यांच्या पुतळ्याखाली बौद्ध मठ आहे. याची उंची 502 फूट (153 मीटर) असून 63 फूट उंच अशा कमळ फुलाच्या चबुतऱ्यावर हा पुतळा उभा आहे. पुतळ्याची निर्मिती 1 सप्टेंबर 2008 रोजी पूर्ण झाली. पुतळ्याजवळ जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून पुतळ्याचे वजन एक हजार टन आहे.


लॅक्युन सेक्या, म्यानमारः जगातला तिसरा सर्वात उंच पुतळा आपल्या शेजारील मान्यमार देशात आहे. भगवान बुद्धांचा हा पुतळा 31 मजल्यांचा असून याची उंची 380 फूट (129 मीटर) आहे. पुतळ्यावर बौद्ध साहित्याप्रमाणे 31 जीवनशैलीच्या 31 रेषाकृती साकारण्यात आल्या आहेत. हा पुतळादेखील 44 फुटाच्या कमळ फुलावर उभा आहे. याची निर्मिती 21फेब्रुवारी 2008  रोजी पूर्ण झाली. अनेक मजल्यांचा हा पुतळा पाहण्यासाठी लिफ़्टची सोय करण्यात आली आहे. 


उशिकु दाइबुत्सु, जपान : जगातील चौथा सर्वात उंच पुतळा भगवान बुद्धांचा आहे.  जपानमधल्या इबाराकी प्रांतातल्या उशिकू येथे हा पुतळा साकारण्यात आला असून याची उंची 330 फूट (116 मीटर) आहे. 33 फूट कमळ फुलाच्या आकाराच्या चबुतऱ्यावर हा पुतळा उभा आहे. ब्रांधपासून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची 1993 ते 2008 पर्यंत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून नोंद होती. 280 फुटांवर जाऊन हा पुतळा पर्यटकांना पाहता येतो. 


सेंडाई डिकेनन, जपान: जगताला पाचवा सर्वात उंच पुतळा सेंडाई येथे उभारण्यात आला आहे. हा पुतळा 1 सप्टेंबर 1991 रोजी पूर्ण करण्यात आला. जपानमधील पूजनीय देवी न्योयरिन कन्नॉनचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची 330 फूट (100 मीटर) असून पर्यटकांना पुतळ्याच्या आत असलेल्या लिफ़्टच्या मदतीने 12 व्या मजल्यापर्यंत जाता येते. हा पुतळा पूर्ण पांढऱ्या रंगाचा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली