Saturday 29 August 2020

जयश्री गडकर


अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१  फेब्रुवारी १९४२ मध्ये कणसगिरी कारवार जिल्ह्यात  झाला.त्या काळातील नावाजलेले दिग्दर्शक व्ही.  शांताराम यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजेच  १९५५ मध्ये ' झनक झनक पायल बाजे ' या  चित्रपटासाठी डांस मध्ये अभिनयाची संधी  दिली.त्या नंतर १९५६ मध्ये अभिनेता राजा गोसावी  सोबत एक डांस केला होता.त्या नंतर साधारण ९  चित्रपटात जयश्री गडकरनी राजा गोसावी बरोबर  चित्रपटात अभिनय केला. 'पावसात उभी जलपरी, मदन मंजिरी,मूर्त लाजरी, डोळ्यामदी ढसली, मला वसंत सेना दिसली.' ही अभिनेता अरूण सरनाईक यांनी जयश्नी गडकर यांना उद्देशून म्हटलेली  खड्या व खणखणीत पहाडी आवाजातील लावणी त्या काळी प्रचंड  गाजली. रेखीव,आकर्षक चेहरा,कपाळावरील रूळणाऱ्या बटा सौंदर्यात भर  टाकत असायच्या,कपाळावरील ठसठसीत कुंकू मग ते कधी चंद्रकोर,तर  कधी पूर्णाकती असो वा आडवी रेष असो.चेहऱ्यावरील सौज्वलता  परिपक्व अभिनय, ग्रामीण भाषेतील लाडीक, व धारदार संवाद,ग्रहीणी व तमासगिर अशा दोन्ही परस्पर विरोधी भूमिका करून चित्रपट क्षेत्रात अभिनय केला. छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांचे काही फोटो काढून स्टुडिओत लावले होते.त्यावेळी दिग्दर्शक दिनकर पाटील यांचे लक्ष त्या फोटोकडे गेले व जयश्री गडकर यांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली.सन १९७५ मध्ये त्यांचा विवाह नाट्य कलाकार बाळ धुरीशी झाला.पुढे बाळ धुरीने चित्रपटात अभिनय केला आहे.त्यांना अविनाश व विश्वजीत अशी दोन मुले आहेत.जयश्री गडकर यांनी भोजपुरी, गुजराती, हिंदी व मराठी अशा भाषेतील चित्रपटात आपला अभिनय केला आहे.त्यांच्या चित्रपटाची संख्या २५० च्या आसपास आहे.' थांब लक्ष्मी कुंकू लावते ',' बाई मी भोळी","दिसतं तसं नसतं ', 'पंचारती', 'पवनाकाठचा धोंडी ','लाखात अशी देखणी ','वैशाख वणवा' मोहित्यांची मंजुळा ' ,'एक गाव बारा भानगडी' अशी असावी सासू'', अवघाची संसार',  'बाप माझा ब्रम्हचारी', ' गाठ पडली ठका ठका' वगैरे  चित्रपटातून आपल्या कसदार,दमदार अभिनयाने प्रचंड यश मिळवले.' 'मानिनी', 'वैजयंता ', 'सवाल माझा ऐका,"साधी माणसं' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

सामाजिक विषयाचा आशय असलेला गायत्री चित्र निर्मित आणि दिग्दर्शन,कथा,पटकथा,संवाद गाणी योगेश या नावाने काही गाणी भालजी पेंढारकर यांनी लिहीली होती असा चित्रपट म्हणजे ' साधी माणसं ' त्याकाळी फारच गाजला.त्यामधील जयश्री गडकर यांनी एका गरीब लोहारणीची भूमिका उत्तम रितीने साकारली होती.या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे यातील सर्व कलावंतानी रंगभूषा न करता कामे केली. महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक साधी माणसं या चित्रपटाला मिळाले होते.तर भालजी पेंढारकर यांनी ' साधा माणूस ' या नावाने स्वतःचे आत्मचरित्र लिहीले व प्रसिध्द केले.डोक्यावर घेतलेल्या पदराला एका विशिष्ठ पध्दतीने ओढून मानेला लाडीक झटका देऊन लाजून लाल होऊन,' जावा तिकडं,आम्ही नाय बोलणार..' असा विशिष्ठ पध्दतील अभिनय लाजवाब असायचा. कितीतरी चित्रपटातील या त्यांच्या अभिनयावर रसिक घायाळ व्हायचे.त्या काळचे चंद्रकांत, सूर्यकांत,राजा गोसावी,अरूण सरनाईक वगैरे वगैरे अभिनेत्यांबरोबर त्यांची जोडी जमली होती.दूरदर्शनवर रामानंद सागर यांची ' रामायण ' ही मालीका प्रचंड गाजली.त्यातील कौसल्याच्या भूमिकेत जयश्री गडकर यांनी आपला भारदस्त अभिनय केला आहे.' अशी मी जयश्री ' या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहून सन १९८६ मध्ये प्रसिध्द केले.' अमिरी गरीबी 'लवकुश','कानून अपना अपना ',' ससुराल ','माया बाजार', 'जिओ तो ऐसे जिओ' ,'हर हर महादेव ','एक गांव की कहावी ',' नजराना ',' खूनी दरिंदा ',नागपंचमी ' ' सुलगते अरमान ' या हिंदी चित्रपटात अभिनय समारंभात जयश्री गडकर म्हणाल्या होत्या,' मी किती मोठी कलाकार आहे हे मला समजायला नको,हे माज्या रसिकांना कळायला हवे.नाहीतर माझे पाय जमिनीवर राहणार नाहीत.याची मला भिती वाटते ." एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातील अरूण सरनाईक व जयश्री गडकर यांचेवर चित्रीत केलेली ' कशी गौळण राधा बावरली ' ही गौळण ,व साधी माणसं 'मधील सूर्यकांत व जयश्री गडकर वर चित्रीत केलेले ' ऐरणीच्या देवा तुला...' हे गाणे,व 'सांगते ऐका ' मधील 'बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला...'ही लावणी जयश्री गडकर यांचा अविस्मरणीय अभिनय रसिकांना खूपच आवडला. अशा या महान अभिनेत्रीचा मुंबईत दिनांक २९ ऑगस्ट २००८ रोजी ह्ददय विकाराच्या तीव्र झटक्याने मत्यू झाला.

हॉकीचे जादूगार :मेजर ध्यानचंद (राष्ट्रीय क्रीडा दिन)


आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस. त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलींगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की,चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा. ध्यानसिंग सोमेश्वरसिंह बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र,ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे 'चंद' हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूपसिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौऱ्यात एकूण २१ सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. 


Friday 28 August 2020

हजरत निझामुद्दीनचा दर्गा


दिल्ली परिसरात भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या खुणा जागोजागी आहेत. दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या साम्राज्याची आठवण करून देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू इथे दिसतात. यातीलच एक वास्तू म्हणजे हजरत निझामुद्दीनचा दर्गा. हजरत निझामुद्दीनचा दर्गा अनेकांनी रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' या चित्रपटात पाहिला असेल. यातील 'कुन फाया कुन' हे गाणं इथे चित्रित झालं आहे. हे गाणंदेखील निझामुद्दीनलाच उद्देशून म्हटलं आहे. औलिया निझामुद्दीन हे एक सुफी संत होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांची कर्मभूमी दिल्ली होती. निझामुद्दीन यांचा दिल्लीतल्या तत्कालीन मुसलमान समाजावर मोठा प्रभाव होता. लोकांना प्रार्थना,उपासना या गोष्टींकडे तो वळवू शकत होता. दिल्लीतला निझामुद्दीनचा दर्गा साधारणपणे 1562 मध्ये बांधला गेला. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एका राजधानी एक्स्प्रेसचे नाव आहे. ऑगस्तकरांती राजधानी एक्स्प्रेस निझामुद्दीन स्टेशनपर्यंत जाते.या स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावरच हा प्रसिद्ध दर्गा आहे. सर्वधर्मीय भाविक इथे भक्तिभावाने येत असतात. याच दर्ग्याजवळ आमिर खुसरोची कबर आहे. आमिर खुसरो हा औलिया निझामुद्दीनचा पट्टशिष्य. इतका पट्टशिष्य की औलिया निझामुद्दीन यांनी म्हटलं होतं की, 'माझ्या कबरीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकानं आमिर खुसरोच्या कबरीचं दर्शन घेतलं पाहिजे. आमिर खुसरोचं भारताच्या इतिहासातलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यानं तबला आणि सतार ही वाद्ये शोधली. कव्वाली या संगीतप्रकाराचा आणि सदाबहार गझलचा जनकही तोच आहे. सुफी पंथाचा प्रसार करण्यात खुसरोचा वाटा मोठा आहे. त्यानं लिहिलेली अनेक गाणी आजही सुफी पंथाचे अनुयायी गातात. भारतात इस्लामचा प्रसार करण्यात सुफी संतांचा मोठा वाटा होता. ग्रामीण भागातल्या लोकांना जागृत करणे, त्यांच्या आयुष्याला अध्यात्मिक अधिष्ठान देणे हे कार्य सुफी संतांनी केले. परामेश्वरावरचं प्रेम हा सुफीपरंपरेतला महत्त्वाचा गाभा आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हा सुफी परंपरेचा अनुयायी आहे. 'दिल्ली 6' या चित्रपटातलं जावेद अली आणि कैलाश खेर यांनी गायलेलं 'मौला मौला मौला मेरे मौला'  हे प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यातली पहिली ओळ  आपल्याला थेट सुफीपरंपरेशी जोडते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शाहीर अमर शेख

 शाहीर अमर शेख .हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बाश्री येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कर्‍हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी 'अमर शेख' असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३0-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वार्शमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९४७). स्वत: एक र्शमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे सादर करीत. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. 

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मल्लिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बर्‍याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना 'महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की' म्हणत. 

कविता हा या लोकशाहिराचा बहिश्‍चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता. कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक.


कादंबरीकार शिवाजी सावंत


ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून प्रामुख्याने शिवाजी सावंत यांचा उल्लेख केला जातो.त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. वडील गोविंदराव शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताची असली तरी लहानपणापासूनच शिवाजी प्रचंड ध्येयवादी होता. त्यांना खेळाची, अभ्यासाची आणि व्यायामाची आवड होती. पुढे अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून गाजले. वक्तृत्व, निबंध, नाट्य स्पर्धेतही त्यांची कामगिरी उत्तम होती.

आजरा येथील व्यंकटराव प्रशालेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी नोकरी करत शिकावे, हा उद्देश ठेवून शॉर्टहँड आणि टंकलेखनचा डिप्लोमा पूर्ण केला आणि कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात नोकरी मिळवली. कोर्टात नोकरी मिळाली खरी,पण त्यात त्यांचे मन रमले नाही. शिक्षक आणि लेखक होण्याची त्यांची  इच्छा त्यांना कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत आणले. शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी पदवीचे शिक्षण सुरू ठेवले. याच काळात 'मृत्युंजय' या अजरामर कादंबरीचे बीज त्यांच्या मनात रुजले. शाळेत असल्यापासून 'कर्ण' हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. 1963 ला त्यांनी 'मृत्युंजय'च्या कादंबरी लेखनास सुरुवात केली आणि ती 1967 मध्ये प्रकाशित झाली. कादंबरी लेखनासाठी त्यांनी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर महिनाभर मुक्काम केला. कादंबरी प्रचंड गाजली. विशेष म्हणजे या कादंबरीने सर्व विक्रम मोडीत काढले. यावेळी त्यांचं वय अवघे 26 वर्षे होतं. 

1974 साली राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या 'लोकशिक्षण' मासिकाचे संपादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. मग ते पुण्याला स्थायिक झाले. 1986 साली त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छावा' कादंबरी लिहायला घेतली. 1979 साली 'छावा' प्रकाशित झाली. याच काळात 'मृत्युंजय' आणि 'छावा' कादंबरीवर आधारित नाटकेही लिहिली. या नाटकांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कर्मवीर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावरील 'लढत' ही द्विखंडात्मक कादंबरी लिहिली. तसेच भाई मनोहर कोतवाल यांच्या जीवनावरील 'संघर्ष' सारखी प्रदीर्घ चारित्रकहानी, 'अशी मने असे नमुने','मोरावळा', 'युगंधर एक चिंतन', 'शेलका साज', 'कांचनकण' (ललित), 'करांतीसिंहांची गावरान बोली'(संपादन) अशी पुस्तके लिहिली. प्रा. मिलिंद जोशी त्यांच्या लिखानाविषयी म्हणतात की, शिवाजीरावांची शब्दकळा भरजरी होती. भारदस्त होती. पल्लेदार वाक्यरचनेतून नेमका आशय ते लीलया मांडत असत. त्यांची सुडौल भाषाशैली धबधब्याच्या अविरत गर्जनेशी निगडित असावी.

शिवाजी सावंत यांचा 'मृत्युंजयकार' असा उल्लेख प्रथम आचार्य अत्रे यांनी केला. साहित्य जगतात ते 'राजे' म्हणून परिचित होते. ते आयुष्यभर राजेशाही थाटात जगले. त्यांच्या 'मृत्युंजय' कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले आणि गाजलेही. या पुस्तकामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता मिळाली.  2002 मध्ये त्यांनी श्रीकृष्णावर 'युगंधर' कादंबरी लिहिली. यासाठी तब्बल 20 वर्षे त्यांचे चिंतन सुरू होते. 'युगंधर'चा हिंदी अनुवादही आला. त्यांची व्याख्याने गाजत होती. मानसन्मान मिळत होते. 1995 मध्ये 'मृत्युंजय' ला साहित्य क्षेत्रातला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 18 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचे कोकणातील मडगाव येथे निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

चरित्रग्रंथ वाचन व्हावे


मुलांनी ,आजच्या युवक-युवतींनी थोर व्यक्तींची चरित्रे वाचली पाहिजेत. ज्यांनी शून्यातून आपल्या जीवनाला यशस्वी आकार दिला, यांच्या अनुभवाचे बोल वाचले पाहिजेत. जगातल्या अनेकविध क्षेत्रात अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आवडणाऱ्या अशा 'हिरो'चे आयुष्य वाचून काढले पाहिजे. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळत जाते. प्रसिद्ध लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी म्हणतात की, कर्तृत्वाशिवाय व्यक्तीला मोठेपण प्राप्त होत नाही. पण हे मोठेपण सहज प्राप्त होत नाही.या जगात जी माणसं स्वकर्तृत्वावर मोठी झाली,त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.नियती त्यांची सत्त्वपरीक्षा घेत होती.तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा,प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली,म्हणून त्यांचा जीवनग्रंथ समृद्ध आणि संपन्न झाला. इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरला. अशा कर्तृत्ववान लोकांचे जीवनग्रंथ मुला-मुलींनी वाचायलाच हवीत. यामुळे त्यांच्या मनात आकांक्षा निर्माण होण्यास मदत होईल आणि मुला-मुलींना स्वतः चे एक कर्तृत्वशिखर खुणावू लागेल. मुलं मोठ्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने त्या शिखरांच्या दिशेने झेपावतील. 'असाध्य ते साध्य।करिता सायास।।'या संत तुकारामांच्या तत्त्वज्ञानाची अनुभूती घेतील.आणि मग त्यांचाही जीवनग्रंथ देखणा होईल. विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचे साहित्य मुलांच्या वाचनात आले तर त्यांच्या विचारांच्या, माहितीच्या, कल्पनेच्या कक्षा रुंदावतील.यात मुलांना आपला 'हिरो' सापडून जाईल. त्यामुळे गिर्यारोहक, मानववंशशास्त्रज्ञ, उद्योगपती, बॉर्डर रोडस् किंवा धरणे बांधणारे इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, यशस्वी राजकीय नेते,प्रगतशील शेतकरी,वक्ते, संशोधक  यांनीही मुलांसाठी आपलं चरित्र उलघडून दाखवावं. अशा साहित्यामुळे मुले धाडसी, सर्जनशील बनतील. त्याला आपला मार्ग यातून सापडून जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 27 August 2020

एम.जी.के. मेनन: भौतिकशास्त्रज्ञ


मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट, इ.स. 1928 रोजी मंगळूरु (कर्नाटक) येथे झाला. मेनन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करुन मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले. विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव माबिलिकलाथिल गोविंद कुमार मेनन होय. त्यांना 1961 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण, 1985 मध्ये पद्मविभूषण हे तिने पद्म पुरस्कार प्राप्त झाले. 1960 चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला.

होमी बाबा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा वेळी ही मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोर हून मुंबई हलवली होती. 1966 मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली.

त्यावेळी ते 38 वर्षाचे होते. 1975 पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली.

दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये नऊ महिने काम केले.

1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1974 ते 1978 या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली.

1982 ते 1989 या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर 1980 ते 1989 या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिले. 1989 ते 1990 दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सरकारच्या मंत्रिमंडळात 1989 मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्री पद भूषवले. 1990 ते 1996 या कालावधीत राज्यसभेचे खासदारही होते. शिवाय मेनन हे १९७२मध्ये काही काळ इस्रोचे चेरमन होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार दिले गेले. त्यांचे 26 नोव्हेंबर2016 रोजी निधन झाले.

चिंतामणी गोविंद पेंडसे


चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे जन्म सांगली येथे २८ ऑगस्ट, १९0६मध्ये झाला. हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठय़ांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किलरेस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणार्‍या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता. शिवाय नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत. मराठी नाटकाच्या जन्मापासून नट मंडळी मिळाली ती आचारी, ताक घुसळणारा, पाणक्या यांसारखी. त्यांच्याबरोबर त्यांची व्यसनेही नाटक मंडळीत शिरली. स्वत:ला साळसूद म्हणवणार्‍या प्रतिष्ठित लोकांनी ही नटांची व्यसने पोसली व त्यांचा गवगवाही केला. जो नाटकात स्त्रीपात्र पाहील त्याला सात जन्म स्त्रीत्व प्राप्त होईल असाही एक लोकापवाद होता. त्या स्त्रीपात्राला काय शिक्षा होती देव जाणे ! अशा या प्रतिष्ठा नसलेल्या व्यवसायात सामील व्हायला वडिलांनी नाकारले नसते तरच नवल. म्हणून मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणार्‍या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच,१९३६ साली मामा पेंडसे यांनी रमेश नाटक मंडळीत प्रवेश मिळवला. त्यांच्या आग्र्याहून सुटका या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे सर्मथ नाटक मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली. एकदा रात्री नऊ वाजता महाटचे यशवंत महादेव ऊर्फ अप्पा टिपणीस यांनी लिहिलेल्या राजरंजनचा प्रयोग होता. दुपारी दोन वाजता बातमी आली की, सय्यद अल्लीची भूमिका करणारे नारायणराव फाटक यांचे एकाएकी ऑपरेशन ठरल्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. सर्वांची बोबडी वळली. आयत्या वेळी कुणाला उभे करायचं हा प्रश्न पडला. अरे तो पेंटरचा गडी पेंडसे फावल्या वेळात नाटकातले उतारे म्हणत असतो; त्याला पाहू या आज उभा करून अशी सूचना आली. मामा तयार झाले सय्यद अल्लीचा पोशाख चढवला, दाढी, मिशी चिकटवली, फेटा बांधला आणि स्टेजवर जाऊन राजाला मुजरा ठोकला. खास नेमलेल्या प्रॉम्प्टरने सांगितलेली वाक्ये मामांनी कशीबशी उरकली आणि एकदाचा विंगेत सहीसलामत सटकले. 

आग्याहून सुटका (उमरखान + जयसिंग), आंधळ्यांची शाळा (विश्‍वनाथ), आशीर्वाद (तात्या), एक होता म्हातारा (नाना -बाबा), कथा कुणाची व्यथा कुणाला (सोमण), कन्या सासुरासी जाये (दादासाहेब), करीन ती पूर्व (शिवाजी), कुलवधू (बाप्पा), कोणे एके काळी (हणमंतराव), खडाष्टक (कर्कशराव + वारोपंत + राघोपंत) चंद्रग्रहण (जगदेवराव), चंद्र नभीचा ढळला (अमात्य), झुंज (बाबासाहेब), तुझे आहे तुजपाशी (आचार्य) तोतयाचे बंड (नाना फडणीस), त्राटिका (प्रतापराव), दुरिताचे तिमिर जावो (पंत), देव नाही देव्हार्‍यात (दादासाहेब), पडछाया (नाना), पंडितराज जगन्नाथ (शहाजहान), पुण्यप्रभाव (भूपाल), बेबंदशाही (कब्जी + खंडोजी +संभाजी), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (घनश्याम), भूमिकन्या सीता (सुमंत), माझे घर (नाना), रणदुंदुभी (जिवाजी), रंभा (अण्णाप्पा), राजरंजन (सय्यदअली), राजसंन्यास (जीवाजीराव कलमदाने) राक्षसी महात्त्वाकांक्षा (कोदंड + दुर्जय), वहिनी (विष्णुपंत), विद्याहरण (युवराज + शुक्राचार्य), वैजयंती (विश्‍वपालकाका), शहा शिवाजी (रणदुल्लाखान), शारदा (श्रीमंत भद्रेश्‍वर दीक्षित), शिवसंभव (जाधवराव) संन्यस्त खड्ग (विक्रमसिह) आदी अनेक नाटकतील भूमिका त्यांनी अजरामर केल्या.

जपानी घरे


जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेला देश आहे. इथे रोज सरासरी चार भूकंप होतात. त्यामुळे परंपरेने इथली घरे एकमजली व शक्यतो वजनाला हलकी अशी आहेत. आता शहरांमध्ये बहुमजली इमारती मोठ्या प्रमाणात आहेत मात्र तरीही घरे बांधताना लाकडाचा  अधिकाधिक वापर केलेला असतो. थंड हवेचा मुकाबला करण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी इथली घरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडली गेली आहेत. इमारतीच्या भिंतीच नव्हे तर कुंपण भिंतीही लाकडाच्या असतात. बहुमजली घरे, इमारती असल्या तरी त्याची रचना भूकंप झाला तरी फारसं मनुष्यहानी व अन्य नुकसान कमी होईल, अशा पद्धतीचं असतं. भिंती लाकडाच्या असल्या तरी पिलर (खांब) मात्र मोठ्या आकाराचे असतात. घराच्या भिंतीवर वजनदार असं काही टांगलेलं आढळून येत नाही. घरातील जमीन लाकडी व वर चटई किंवा गालिचा ऐपतीप्रमाणे असतो. विशेष म्हणजे जपानी घरात सर्वत्र आधुनिक सुखसोयी येऊन चाळीस-पन्नास वर्षे झाली आहेत. इथे चौरंगासारख्या डायनिंग टेबलाभोवती जमिनीवर बसून जेवण केले जाते. आपल्यासारखे हे लोक भिंतीला टेकून किंवा आळसावल्या अवस्थेत बसत नाहीत. इथे भाड्याने मिळणारी घरे सर्व सोयीनियुक्त असतात. फर्निचरसह अनेक गोष्टी अगोदरच उपलब्ध असतात.मात्र मासिके भाडे जास्त असते. 14-15 मजल्याच्या इमारती 7  रिश्टर स्केल तिव्रतेपर्यंतच्या भूकंपात टिकून राहतील अशा बनवाव्या लागतात. हा नियम न बाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कंपनीला जबर दंड ठोठावला जातो. बहुमजली इमारतीमध्ये फर्निचर मात्र जमिनीवरच ठेवलेले असते. जपानमधील नवी बहुमजली घरे सर्व सुखसोयींनी युक्त असतात. अपंगांसाठी लिफ़्ट, पार्किंग सुविधा, तळमजल्यात सायकली पार्क ,गाडी पार्क करण्याची सुविधा इ.सोयी असाव्याच लागतात. त्याचप्रमाणे कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर तो ठेवण्यासाठी सगळ्या संकुलाला मिळून एक भलीमोठी खोली असते. कोणत्या दिवशी कचरा उचलला जातो,याचे नियोजन आणि कार्यवाही केली जाते. जपानमध्ये आगीसह सर्वचबाबतीत अधिक सुरक्षितता बाळगली जाते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 26 August 2020

महाराष्ट्राचं राज्यफूल-जारूळ


जारूळ हा  फुले देणारा वृक्ष आहे. हा वृक्ष एप्रिल ते जूनच्या दरम्यान फुलांनी फुलून येतो. महाराष्ट्र दिनी हा वृक्ष फुलांनी फुललेला असतो, म्हणून कदाचित हे फूल राज्यफूल बनले असावे. हा पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. कोकणात नदीनाल्यांच्या काठांवर जारुळाचे भरपूर वृक्ष दिसतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.हा ताम्हण, तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही ओळखला जातो. याचे शास्त्रीय नाव  Lagerstroemia speciosa आहे. हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात.  कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेतात. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली असल्याचे दिसून येते. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात.  जारुळाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला जातो. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे जारुळाचा अंदाजे शंभर फूट उंचीचा वृक्ष आहे. लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत जारूळ सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करते. जारुळाचे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, विहिरींचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगनसह विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरले जाते. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे जारुळाची वृक्ष आहेत. म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदी काठीही हे वृक्ष आढळतात. भारतीय उपखंडातले जंगली फूल म्हणून याची ओळख असली तरी त्याच्या गुणांमुळे ते फूल युरोप,अमेरिकेतही पोचले आहे. जारूळाचे औषधी गुणधर्मही आहेत. ताप आल्यावर याच्या सालीचा काढा दिला जातो. तोंड आल्यावर याचे फळ तोंडाच्या आतील बाजूने लावले जाते.पाने-फळे मधुमेहावर गुणकारी आहे. पोटदुखी आणि वजन कमी करण्यासाठीही झाडाचा उपयोग होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 24 August 2020

बहिणाबाई चौधरी

विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता, शिकलेला आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं.

बहिणाबाईचा जन्म जळगावपासून २ कि. मी. अंतरावरील असोदे गावचा. असोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात त्या जन्माला आल्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह लाभला. पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले.

घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.

बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी

अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.  (१८९३) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये झाली ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी (१९१०) बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले ,'हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता केवळ त्यांच्या नीरक्षीततेमुळे त्यांच्याबरोबरच नाहीशी झाली आणि आपल्या माय मराठीचे अतोनात नुकसान झाले .

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचल्या आहेत .त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही ओळखीची माणसे, असे आहेत. अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते उदा. ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती . ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.

बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.

दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. उत्तरा केळकर यांनी त्यामधली गाणी .ओव्या म्हटली आहेत त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती केली.

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

अरे संसार संसार (सुमन कल्याणपूर), मन वढाय वढाय आणि अरे खोप्यामध्ये (उत्तरा केळकर),माझी माय सरोसती (उत्तरा केळकर)


Sunday 23 August 2020

शाहीर अमर शेख

शाहीर अमर शेख यांचा जन्म २0 ऑक्टोबर १९१६ रोजी बार्शी येथे एका गरीब मुसलमान कुटुंबात झाला.  ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कर्‍हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी 'अमर शेख' असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३0—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वार्शमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९४७). स्वत: एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे सादर करीत. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला.
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बर्‍याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहीराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना 'महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की' म्हणत.
कविता हा या लोकशाहीराचा बहिश्‍चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता. कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक लिहिले आहे.२९ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म ५एप्रिल १९२७ रोजी सांगली जिल्हय़ातील माडगूळ (ता. आटपाडी) येथे झाला.हे मराठी ग्रामीण लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. त्यांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाड्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्‍चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५0 च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, र्जमन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५0), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), या त्यांच्या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. 'पुढचं पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखविली आहे. त्यांनी नाटकेही लिहिली, तू वेडा कुंभार, सती, पति गेले गं काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. कुनाचा कुनाला मेळ न्हाई आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यात गावाकडील गोष्टी, काळी आई यासारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो. १९८३ साली अंबेजोगाई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'सत्तांतर' या पुस्तकासाठी त्यांना १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जनस्थान पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले.२७ ऑगस्ट २००१ मध्ये त्यांचे निधन झाले.

अवयवदान श्रेष्ठ दान

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णाला देणे म्हणजे अवयवदान होय. त्यानुसार एक व्यक्ती आठ जणांना अवयवदान करू शकतो. मात्र भारतात अवयवदानाचे प्रमाण हे प्रति दहा लाखाच्या मागे 0.८ टक्के एवढे अल्प आहे. जे अमेरिका आणि स्पेनसारख्या विकसित देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे आपल्या देशात मृत्यू पूर्व आणि मृत्यू पच्छात अवयवदान करण्यास प्रेरित करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.  एक मेंदू मृत व्यक्तीच्या साह्याने किमान पन्नास रुग्णाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. मृत्यूनंतर त्याचे डोळे, हाड, त्वचा दान करता येते. एखाद्या आजारामुळे किंवा अपघातामुळे मेंदू निकामी झालेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, आतडे या अवयवासह डोळ्यांच्या कॉर्निया, त्वचा, बोन मॅरो, हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्यांचेही दान करता येते. असे अनेक अवयव गरजू रुग्णाला दान केले तर जीवन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक गरजवंत रुग्णांचे प्राण वाचविण्यास नवसंजीवनी ठरू शकते. म्हणून अवयवदान हे जगातील सर्वश्रेठ दान आहे असे म्हटले जाते. पण आजही समाजात अवयवदानाचा निर्णय घेण्यास कमालीची उदासीनता दिसून येते. खुळ्या चालीरीती, स्वर्ग-नरकाची खुळचट कल्पना, स्वर्गोत्तर मोक्ष न मिळण्याची भीती, जुन्या चालीरीतींना न सोडण्याचा मोह इत्यादी कारणे अवयवदान न करण्यास आजही अडसर येत आहे. खरं तर मरोत्तर मोक्ष मिळो न मिळो पण आपल्या हयातीत मोक्ष मिळाल्याचे समाधान जर मिळवायचे असेल तर या खुळचट विचारातून बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे पीडित गरजवंतांना आपल्या देशात पुरेशे अवयव पुरवू शकतं नाही; त्यामुळे कित्येकांचे नाहक बळी जातात. अवयवदानाच्या संकल्पपूर्तीतून आपण फक्त जीवनदानच देवू शकत नाही तर त्याहीपलीकडे जातीधर्माच्या बंधनातून मुक्त होत बंधुभावाची संकल्पना आकारास आणू शकतो. ज्याप्रमाणे रक्तदान करतांना त्या व्यक्तीचे रक्त हे कोणत्या धर्माचे, जातीचे आहे, हे पाहिल्या जात नाही त्याप्रमाणे गरजवंतांना अवयवदान देताना एकच धर्म पाळला जातो, तो म्हणजे मानवतेचा धर्म ! आपले अवयव हे कुणाच्या जीवनाला अभय देवू शकते, तर वेळप्रसंगी आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबीयांवर अशी वेळ आली तर त्या गरजेची पूर्ती सुद्धा होणे महत्वाचे असते. 

त्यामुळे अवयवदान हे एकमेकांना पूरक असे घटक आहे. अवयवदान आपण कुठल्याही वयात करू शकतो. याला वयाचं बंधन नसते. पण आपल्या जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना याची माहिती आपण देणे गरजेचे असते. आज अवयवदान काळाची गरज असून अवयवदानाचा निर्णय प्रत्येकांनी घ्यायला हवा !

भारतात दरवर्षी पाच लाख लोकांचा अवयव न मिळाल्यामुळे नाहक बळी जातो. यातील दोन लाख यकृताच्या आजारमुळे दगावतात तर पन्नास हजार रुग्ण हृदयाच्या आजाराने दगावतात. दरवर्षी सुमारे दीड लाख जणांना किडनीची गरज असते, परंतु फक्त पाच हजार किडनी लागणार्‍या रुग्णाची गरज पूर्ण करू शकतो. आपल्या देशात दहा लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहे. यावरून आपल्या देशात अवयवदानाची गरज किती मोठया प्रमाणात आहे, हे लक्षात येते. आज जगातिक पातळीवर अवयवदानाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. आता आपण मागे राहून चालणार नाही.

उदयगिरी, खंडागिरी गुफा

ओरिसा राज्यातील भुवनेश्‍वरच्या विमानतळापासून केवळ नऊ ते दहा किलोमीटरवर उदयगिरीच्या खंडागिरी या प्राचीन गुंफा असून कल्लिंग चक्रवर्ती राजा खारवेल यांनी या गुफांची निर्मिती केली आहे. 

मौर्य साम्राज्याचे पतन झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली असलेली काही राज्ये परत एकदा स्वतंत्र झालीत व त्यात कल्लिंग हे राज्य होते. राजा खारवेल हा चेदी वंशातला तिसरा शासक नरेश होता.  केवळ चोवीसाव्या वर्षी तो कल्लिंगच्या सिंहासनावर आरुढ झाला होता. त्यानंतर त्याने दिग्विजयाला सुरुवात केली व अनेक राज्ये जिंकले. यात सातकर्णी प्रथम, विद्याधर तीर्थ मुक्ती, गौरवगिरी दुर्ग, राजगृह , गंगाघाटी, मगध यांचा पराभव करून विजय मालिका सुरू ठेवली व कधी मागे वळून बघितले नाही. त्या नंतर खारवेलने राजसूय यज्ञ केला व राजा खारवेल हा राजा चक्रवर्ती झाला. प्रजेच्या हिताकरिता त्याने कधी खर्चाची चिंता केली नाही. दुसर्‍या धर्माचा कधी द्वेष केला नाही. मंदिर, नहर, भवन यांची निर्मिती करून कल्लिंगच्या कष्टाळू जनतेला करमुक्त केले. संगीत, नाटक, सामूहिक पक्वान्न व नृत्याचे आयोजन जनतेकरिता करून महाविलय-प्रासाद हे भव्य दिव्य राजभवन बांधले. आणि याच मालिकेत राजा खारवेल ने खंडागिरी व उदयगिरी या समोरासमोर असणार्‍या उंच पहाडांवर तपस्वी, मुनी, साधु यांच्या तपश्‍चर्ये करिता व निवासाकरिता अनेक लहान मोठय़ा गुंफाची निर्मिती केली व भूमी दान केले. दोन्ही उंच पहाडांवर असलेल्या या गुंफा आज पर्यटकांचे प्रचंड आकर्षण झालेल्या आहेत. या गुंफा प्राकृतिक अवस्थेत आहेत व गुफांच्या निर्मितीमुळे काहीशी कृत्रिमता जरी आलेली असली तरी नैसर्गिक सौंदर्याला कुठलीही बाधा पोहोचलेली नाही असे प्रकर्षाने जाणवते. उदयगिरी पहाडाच्या पायथ्यापासून तर शिखरापर्यंत लहान लहान आकाराच्या विविध गुंफा म्हणजे बिना दरवाज्याच्या लहान ठेंगण्या खोल्या असेच वर्णन करता येईल. या गुंफेत उभे राहता येत नाही इतक्या ठेंगण्या या गुंफा आहेत. या पसरलेल्या पहाडात एक मनुष्य बसू शकेल इतक्याच जागेवर या गुंफा तयार केल्या आहेत. विशाल दगड व प्रचंड मोठय़ा शिला असलेल्या पहाडांवर रम्य वनश्री, माकडांच्या टोळ्या, असंख्य पशुपक्षी यांचा सतत विहार असतो. उदयगिरीमधे अशा एकूण प्रमुख अठरा गुंफा आहेत तर खंडागिरीमध्ये एकूण पंधरा गुंफा आहेत. उदयगिरीची ऊंची १३५ फुट असून खंडागिरी ११८ फुट उंच आहे. याच ठिकाणी राजा खारवेल निर्मित सहा दगडी हत्ती असलेल्या तीन हाथी गुंफा आहेत व मगध भाषेतला अद्भुत अभिलेख आहे. या अभिलेखात चौदा पंक्तिमध्ये खारवेल साम्राज्याचा तेरा वर्षांचा संपूर्ण इतिहास कथन केला आहे पण साम्राज्य अस्ताचा उल्लेख नाही. हा अभिलेख कुणी लिहिला हे अज्ञात आहे. इतिहास, वास्तू व स्थापत्य कला, धर्म, यांच्या दृष्टीने या शिलालेखाला प्रचंड महत्व आहे. राजा खारवेलच्या संपूर्ण शासन काळाच्या जवळपास प्रत्येक वर्षाचा इतिहास या शिलालेखात कोरून ठेवलेला आहे. महत्वाचे म्हणजे आजही हे शिलालेख व दगडी शिला कापून तयार केलेल्या लहान मोठय़ा गुंफा अत्यंत सुस्थितीत आहेत. हाथिगुंफानंतर पहाड उतरून खालच्या बाजूला विशाल परिसरात गुंफाचा समूह बघायला मिळतो. कलात्मक्तेने सजलेल्या दुमजली राणी गुंफा आहेत. येथे तीन प्रवेशद्वार भव्य परिसरात असून सारे कक्ष एकमेकांना लागून आहेत. मंत्रोच्चाराचे ध्वनि संतुलन नाट्याचे लोकरंजनाचे प्रयोग येथे होत असत अशी माहिती मिळाली. येथल्या भिंतींवर वास्तूकला, नर्तकी, सूर्यरथ, सुंदर चित्रे, तोरण, जीवजंतु, धार्मिक व राजेशाहीची भित्तिकला चित्रित केली आहे. खारवेल नरेशचे विजय अभियान, त्यांची यात्रा ,सजवलेल्या हत्तींच्या मूर्ती व शकुंतला व राजा दुष्यंत यांची पहिली भेट, कलात्मक स्तंभ,अशी अनेक दृश्ये व नृत्यकला दगडी शिल्पात चित्रित केलेली आहेत. हाथिगुंफा येथील शिलालेखात या उदयगिरी पर्वताचे वर्णन कुमारी पर्वत असे केले आहे. दरवाजा सारखे मुख असलेल्या या गुंफांना लेणा म्हटलेले आहे. ई.स.पूर्व दुसर्‍या शतकातल्या या गुंफा असून कल्लिंगमधल्या जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव येथे प्रामुख्याने दिसून येतो.
ई.स.पूर्व २0९-१७0 या काळात कल्लिंग नरेश खारवेल यांनी गुंफाची निर्मिती केली असे मानण्यात येते. या व्यतिरिक्त अनेक छोटे छोटे गुंफाकक्ष निर्माण केलेत. येथील प्रत्येक गुंफा विशिष्ट नावाने ओळखल्या जाते. यात अलकापुरी,जयविजय, पन्नासा, ठाकुरानी, पातालपुरी, मंचापुरी, स्वर्गपुरी, गणेशगुंफा, जंबेश्‍वर, व्याघ्र गुंफा, सर्प गुंफा, धनागर, हरीदास, जगम्मठ गुंफा व रोसाई गुंफा या नावाने प्रसिद्ध आहेत. तर काही गुंफा जैन साधू यांनी निर्माण केल्या असेही मानण्यात येते.


नळदुर्गचा किल्ला

126 एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल 114 बुरुजांची दुहेरी तटबंदी यावरूनच नळदुर्ग किल्ल्याची (जि. उस्मानाबाद) भव्यता स्पष्ट होते. या सगळ्याभोवती नदीच्या पात्राचा भलामोठा खंदक आहे. या सगळ्या आक्रमण-संरक्षणाला भेदत पश्चिम दरवाजातून या गडात प्रवेश करता येतो. वळणाकर रचनेत एका पाठोपाठ एक तीन दरवाजे आहेत. यातून जाताना भोवतालचे तट-बुरुज,पहाऱ्याच्या चौक्या पाहत असतानाच आपल्याला भल्यामोठ्या तोफा नजरेस पडतात. ढालकाठीच्या बुरुजावर चढलं की, संपूर्ण गड नजरेत येतो.

नळदुर्ग चालुक्यांनी उभा केला. राजा नल आणि दमयंती यांचाही संदर्भ इथले लोक सांगतात. चालुक्यानंतर बहामनी राजवट आली. नंतर बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर इथे विजापूरची आदिलशाही आली. सुलतान अबूल मुजफ्फर अली आदिलशहा पहिला याने इसवी सन1560 मध्ये ख्वाजा नियमतुल्लाह याच्या देखरेखीखाली गडाला आजचे हे आक्रमक रूप आले. यावेळीच गडाला 'शहादुर्ग' नाव देण्यात आले. पण इतिहासाला हे नवे नाव फारसे रुचले नाही. पुढे हा नळदुर्ग किल्ला आदिलशहानंतर मोगल आणि पुढे हैद्राबादच्या निजामाकडे आला. याच काळात 2 जानेवारी 1758 मध्ये मराठयांचा झेंडा फडकला. पण काही काळच. पुन्हा निजामशाहकडे गेलेला किल्ला शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस कारवाईमध्ये मुक्त झाला आणि एक राष्ट्रीय स्मारक बनला.

पाच- सहाशे वर्ष जुना असलेला किल्ला भलामोठा आडवा-तिडवा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची गर्दी असलेला आहे. सुरुवातीलाच हत्तीखान्याची भलीमोठी इमारत आणि त्याच्या दारातील हत्तीशिल्पे पाहण्यात येतात. त्यानंतर मग मुंसिफ कोर्ट आणि जामे मशीद लागते. यातील मुंसिफ कोर्ट हा मूळचा किल्लेदाराचा वाडा. पुढे निजामाच्या राजवटीत याचे कोर्ट झाले. आता इथे पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. इमारतीच्या मधोमध एका मोकळ्या चौकात एक महत्त्वाचे फारसी शिलालेख, काही कोरीव दगडशिल्प, नगाऱ्याची लोखंडी पात्रे ,पंचधातूची तोफ आणि असंख्य तोफगोळे पाहायला मिळतात. गडाच्या पूर्व दिशेला धान्य,दारूची काही कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध आणि त्यामागचा नऊ पाकळ्यांचा नवबुरुज आहे. गडाच्या मध्यावर आल्यावर रंगमहाल, बारादरी, राजवाडा,राणीमहाल या वास्तू पाहता येतात. राजवाड्याच्या एका दिंडी दरवाजातून जाताना नळदुर्गचा आत्मा असलेल्या पाणीमहालाचे दर्शन घडते. पाणीमहालात आणि या गूढ, अद्भुत अशा चिरेबंदी वास्तूचे सारे सौंदर्य ते त्याच्या अंगावरून धावणाऱ्या पाण्यात आहे. नळदुर्गच्या उत्तरेकडून बोरी नदी वाहत येते. ती उत्तर-पूर्व दिशेने गडाला वेढा घालत दक्षिणेकडे पुढे निघून जाते. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 22 August 2020

विंदा करंदीकर (ज्येष्ठ कवी)

विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी र%ागिरी जिल्यातील घालवली या गावी झाला.विंदा हे कोकणातील पोम्बुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्‍विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्‍विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्‍वर कॉलेज, र%ागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. मा.विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. मा.विंदांनी स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता असे कवितासंग्रह तर राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला यासारखे बालकवितासंग्रह दिले. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या स्वेदगंगापासून सुरू मा.विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम तडम, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वत:च्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण मा. विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दजेर्दार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही मा.वसंत बापट, मा.मंगेश पाडगावकर आणि मा.विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. मा. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून कबीर पुरस्कार आणि कालिदास पुरस्कार हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय मा. विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्‍स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणार्‍या मा.विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन देणार्‍याने देत जावेचा अनुभव रसिकांना दिला. मा.विंदा मानवाचे अंती गोत्र एक हे जसे लिहिले तसेच सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी अशी भावगीतेही त्यांनी लिहिली. मा.विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. विं.दा. करंदीकर यांचे १४ मार्च २0१0 रोजी निधन झाले.

Friday 21 August 2020

कुर्डूवाडी जंक्शनचा इतिहास

आज रेल्वेमुळे सर्वांना परिचित असणाऱ्या  कुर्डूवाडी गावाचा इतिहास फार मनोरंजक असून शंभर वर्षाचा इतिहास उलगडून पहिलातर केवळ रेल्वेमुळे निर्माण झालेले गाव म्हणूनसुद्धा याच्याकडे पाहता येईल. मुंबई- बेंगलोर, कोल्हापूर- नागपूर अशा मोठ्या रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे जंक्शन म्हणून कुर्डूवाडीला महत्वाचे स्थान असलेतरी गावाचा इतिहास शंभर वर्षापलीकडे जात नाही. मुळातच या गावाची आणि नावाची निर्मिती ही केवळ रेल्वेमुळे झालेली असल्याने रेल्वेचा इतिहासही मोठा मनोरंजक असल्याचे दिसून येतो. 

कधीकाळी देवाची गाडी म्हणून ओळखल्या जाणार्याो बार्सी लाईट रेल्वेच्या इतिहासावर संशोधन करत असताना अनेक नवीन बाबी पुढे आल्या आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार सुरू झाला. त्यानुसार मुंबईवरुन सोलापूरकडे जाणार्याह रेल्वेचा प्रवास सुरू झाला. त्यातूनच 23 आक्टोंबर 1859 साली पुणे ते ‘बार्सी रोड’ ही रेल्वे सुरू झाली. याच बार्सी रोड नावात कुर्डूवाडीचा इतिहास दडलेला आहे. सोलापूरकडे रेल्वे नेताना इंग्रचांचे लक्ष बार्शी या गावावर होते. कारण त्याकाळी बार्शी हे मोठे व्यापारी केंद्र असून तेथे कपडा आणि ऑइल मिलही होत्या. त्यामुळे बार्शीकरिता इंग्रजांनी कुर्डू गावाजवळ एक स्वतंत्र थांबा देऊन त्याला ‘बार्शी रोड’ हे नाव दिले. त्याच्या बाजूला काही गोसाव्याची घरे असल्याने त्याला ‘गोसाव्याची वाडी’ म्हटले जायचे. रेल्वेच्या कागदोपत्री मात्र याला ‘बार्शी रोड’ हेच नाव होते. ( फार मेहनतीने लेख लिहिलेला असतो लेखकाचे नाव टाळून कॉपीपेस्ट करू नये) 

पुढे 1860 ला ही रेल्वे सोलापूरपर्यन्त गेली. इकडे बार्शीचा व्यापार वाढल्याने बार्शी रोडची गर्दी वाढायला लागली. त्यामुळे एव्हरार्ड काल्थरॉप नावाच्या इंजिनीअरने भारतीय रेल्वेचा राजीनामा देऊन बार्शी रोड ते बार्शी हा 34 किमीचा नवीन रेल्वेमार्ग काढण्यासाठी ‘ बार्सी लाइट रेल्वे’ नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन करून 1 मार्च 1897 ला ती रेल्वे सुरू केली.तिचा विस्तार पुढे लातूरपर्यंत झाला तर 1927 ला तिकडे मिरजपर्यन्त बार्सी लाइट रेल्वे वाढली. बार्सी लाईट रेल्वे ही एक स्वतंत्र कंपनी असून मुंबई किंवा बेंगलोरकडे सहज जाते यावे म्हणून इंग्रजांनी कंपनीचे मुख्यालय हे बार्सी रोड याठिकाणी ठेवले. बार्शीच्या व्यापारामुळे हळूहळू करून या बार्सी रोडला महत्व यायला लागले. थोड्या अंतरावर असणार्याय गोसाव्याच्या वस्तीमुळे तेथे हळूहळू वस्तीही वाढायला लागली. 

वाढलेल्या वस्तीला लोक कुर्डूवाडी म्हणायला लागले, तरीपण इंग्रजांच्या कागदोपत्री याचे नाव बार्सी रोड हेच होते. याचवेळी बार्शीचे स्पेलिंग barsee असे लिहिले जायचे.  त्यात बदल करून 1870 साली ते barsi याप्रमाणे लिहिण्याचे आदेश काढण्यात आले. इंग्रजांनी बार्शी हा शब्द शेवटपर्यन्त बारसी ( barsi ) असाच लिहिला. तर पुढे बार्सी रोडला वाढलेली गर्दी पाहून रेल्वे विभागाने 23 आक्टोंबर 1914 ला नोटिफिकेशन काढून बार्सी लाईट रेल्वे अंतर्गत येणार्याढ बार्सी रोडचे नामांतर कुर्डूवाडी असे केले. पुढे 1930 ला कुर्डूवाडी येथे बार्सी लाईट रेल्वेचा वर्कशॉप निघाला. तर 1920 इंग्रजांनी शाळा सुरू केल्या. 1922 पासून इंग्रज अधिकार्यांेना राहण्यासाठी मोठ्या वसाहती बांधल्या जाऊ लागल्या. तर चिंक ( माकड) हिल याठिकाणी रेल्वे पोलिसांचे ट्रेनिंग सेंटर सुरू झाले. अशारितीने कुर्डूवाडीची स्थापना आणि विस्तार ही रेल्वेची देन आहे असे म्हटल्यावर वावगे ठरू नये. तर कदम यांनी  अस्सल कागदपत्राच्या आधारे केलेल्या संशोधनामुळे कुर्डूवाडीच्या इतिहासाला उजळा मिळाला आहे. ( डॉ. सतीश कदम  )

1. बार्सी लाईट रेल्वे ही स्वतंत्र कंपनी असून तिचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नव्हता. 1897 ला एव्हरार्ड काल्थरॉप नावाच्या इंग्रजाने सुरू केलेली ही कंपनी पुढे 1953 पर्यन्त चालली. मीरज ते लातूर असा 325 किमीवर धावणार्यान बार्सी लाईट रेल्वेचे मुख्यालय हे बार्शी रोड म्हणजे आजच्या कुर्डूवाडीत ता. माढा, जिल्हा सोलापूर याचठिकाणी  होते. 

2. इंग्रजांच्या कागदोपत्री कुर्डूवाडीचे नाव हे बार्सी रोड हेच होते. केवळ रेल्वे जंक्शनमुळेच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झालेली आहे. 23 आक्टोंबर 1914 ला इंग्रजांनी स्वतंत्र परिपत्रक काढून बार्शी रोडचे नामांतर कुर्डूवाडी केले आहे. 

3. बार्सी लाईट रेल्वेसाठी प्रवासाचे दर प्रथम वर्ग – 24 पैसे प्रती मैल, द्वितीय – 12 पैसे, तृतीय – 8 पैसे आणि चतुर्थ वर्ग- 3 पैशाला प्रती मैल म्हणजे मीरज ते पंढपूरचे तिकीट होते फक्त 1 रुपया 12 पैसे 3 आणे एवढे होते. मालाला 4 पैशाला मन होता. तर घोड्याला 24 पैसे तर कुत्र्याला 8 आणे प्रती मैल वाहतुकीचा दर होता. 


Thursday 20 August 2020

नरेंद्र दाभोलकर

नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. 

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. प्रस्तावनेत डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चतु:सूत्री दिली आहे. ती अशी,

१) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे,

२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्याआधारे विविध घटना तपासणे,

३) धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबाबत काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणे,

४) व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे, सजग करणे,’

ही चतु:सूत्री मनात ठेवून या पुस्तकातील सर्व लेखांकडे वाचकांनी पहावे, असे या प्रस्तावनेत नमूद केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत.

पैशाच्या पावसाच्या लोभापायी नांदोस येथे घडलेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात डॉ. दाभोलकर लिहितात, ‘शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे व ओपीनियन लीडर यांनी कणखर कृतिशील भूमिका घेण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर आणखी काही बाबींचे अवधान राखावयास हवे. संयम शिकवणारा धर्म आज आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला आहे. एका बाजूला कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्‌घोषिलेली नीतितत्त्वे मात्र सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली. असे का घडत आहे, का घडवले जात आहे, याचाही विचार करावयास हवा. हे चित्र बदलण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. उघडपणे शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेने ज्या समाजाचा पाया रचला आहे, त्या समाजातील माणसाच्या मनाचे उन्नयन करणे, हे चर्चेने घडणारे काम राहत नाही. त्यासाठी शोषण संपवून व सृजनशील जीवन शक्य होईल, अशा समाज-व्यवस्था निर्मितीचे आव्हानही पेलावे लागेल, याचे भानही आवश्यक आहे’[४] हे विवेचन फार महत्त्वाचे आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, ओपीनियन लीडर, सुशिक्षित असणारा मध्यमवर्ग, वेगवेगळ्या पदांवरील उच्चशिक्षित, इंजिनिअर, डॉक्टर, वकील वगैरे व्यक्तींनी सभोवतीच्या अंधश्रद्धेच्या दूषित पर्यावरणाची सखोल चिकित्सा केली पाहिजे. आपण अंधश्रद्धा शोषणाच्या व्यवस्थांना खतपाणी घालत आहोत का? या व्यवस्थेचा आपण घटक आहोत का, हे समजून घेतले पाहिजे, हे भान या पुस्तकातील या लेखासह इतरही लेख वाचताना येते.

‘बाळू मामाची नवसाची मेंढरं’ या लेखात अंधश्रद्धांच्या संदर्भातील मानसिक गुलामगिरीची बेडी माणसांच्या मनात किती घट्ट बसली आहे, त्याचे प्रत्यंतर येते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव, चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, हे नाते प्रकाश अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजे अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे.. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात. व्यक्ती परतंत्र बनते. परिवर्तनाची लढाई मग अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळींसाठी तयार करावयास हवे’ हे मनापासून समजून घेणे हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असेल, तेव्हा प्रत्येकाने आपण स्वत:वरचा विश्वास गमावला आहे का, ते प्रामाणिकपणे तपासून पाहण्याची गरज आहे. ‘मानसिक गुलामगिरीचे गडेकोट’ हा लेख या संदर्भात लक्षणीय आहे. अघोरी अंधश्रद्धांबाबत कायदा करण्याची गरज आहे, पण ‘पुरोगामी’ म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रास असा कायदा करणे कसे अवघड आहे, त्याची हकीकत तीन लेखांमध्ये सांगितली आणि धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करण्यासंदर्भात महाराष्ट्रात कसे मौन बाळगले गेले आहे, त्याची मीमांसा काही लेखांमधून केली आहे. सुशिक्षित आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी हे लेख आवर्जून वाचावेत.

‘विरोध धर्माला नसून धर्मवादाला’ आणि ‘माझी धर्मनिरपेक्षता’ हे दोन लेख वेगळे आहे. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबाबतची भूमिका आणि डॉ. दाभोलकरांची धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातली भूमिका या दोन लेखांमधून कळते.

‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’, ‘सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी’, या लेखांमधून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या आकांडतांडवाची चिकित्सा आणि पंढरपूरच्या वारीने सामाजिक समतेचे मन्वंतर कसे घडू शकते, याचीही चिकित्सा केली आहे, तर एका लेखात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या यशापयशाची चिकित्सा केली आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन हे तीन घटक विवेकवादाचे सामाजिक आधार कसे ठरू शकतात, ते विशद केले आहे. ‘विवेकवादी चळवळ: उद्याची आव्हाने’ या लेखात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, सामाजिक सुधारणा व मानवतावाद याचा पाठपुरावा हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे भारतीय घटनेत सांगितले आहे. शिक्षण, प्रसारमाध्यमे, प्रशासन या तीनही स्रोतांसह वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष अंगीकारणाऱ्या प्रत्येक माणसाने घटनेतील या कर्तव्यपालनाबाबत आग्रही असण्याचे आवाहन पुस्तकात केले आहे.

कवी ना.घ.देशपांडे


कवी ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९0९ रोजी झाला. त्यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात.

ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वतुर्ळात घेतली गेली. नाघंच्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणार्‍या खेडयामध्ये होते. पण नाघंनी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणार्‍या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. १९२९ मध्ये लिहिलेला शीळ या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली शीळ या नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली अभिसार. नंतर खूणगाठी, गुंफण, कंचनीचा महाल. खूणगाठीला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते.

ना. घ. देशपांडे यांची नदीकिनारी, नदीकिनारी गं व फार नको वाकू उंच जरी बांधा ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा नाघंनी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. नाघंनी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्‍वेतिहासात दिले. नेहरूंना उदयाचा यात्रिक म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १0 मे २000 रोजी झाले.

भारतीय खगोलशास्त्रज्ञ:सुब्रह्मण्यन चंद्रशेखर

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत. पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.

डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु २१ ऑगस्ट १९९५ रोजी झाला.
पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

माजी पंतप्रधान राजीव गांधी

राजीव गांधी यांचा जन्म २0 ऑगस्ट १९४४ ला मुंबईत झाला. ते भारताचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पयर्ंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. 

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८0 मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतर% पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोडिर्ंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स. १९६५ च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या अँन्टोनीया माईनो ( सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स. १९७0 मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली.इ.स. १९८0 मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले.३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७00 शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

Monday 17 August 2020

दिग्दर्शक निशिकांत कामत

हिंदी सिनेसृष्टीसाठी २0२0 हे वर्ष फारच कठीण आहे. एकीकडे कोरोना व्हायरस सारख्या महामारीने आर्थिक संकट आणले आहे तर दुसरीकडे अनेक नावाजलेले आणि हरहुन्नरी कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही प्रदीर्घ आजाराने निधन झाले. क्रोनिकल लीवर डिसीस आजाराने त्रस्त होते. प्रत्येक तरूणाप्रमाणे निशिकांत यांचेही सिनेमावर अतीव प्रेम होते. निशिकांत यांनीही सुरुवातीच्या काळात अभिनेता व्हायचे स्वप्न उराशी बाळगले होते. भविष्यात त्यांचे हे स्वप्न पूर्णही झाले. २00४ मध्ये आलेल्या 'हवा आने दे' सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केले.

यानंतर निशिकांत यांनी काही मराठी सिनेमात अभिनेता म्हणून काम केले. यातला गाजलेला सिनेमा होता 'सातच्या आत घरात'. या सिनेमाचे लेखनही निशिकांत यांनीच केले होते. पण यानंतर अभिनयात त्यांना फारसे यश मिळाले नाही. पण सिनेमाच्या प्रेमाखातर त्यांनी अभिनयातून आपले लक्ष दिग्दर्शनाकडे वळवले. अगदी थोड्याच काळात त्यांनी स्वतंत्रपणे सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली.

२00५ मध्ये त्यांनी पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. तो म्हणजे सुपरहिट 'डोंबिवली फास्ट'. या सिनेमामुळे निशिकांत कामत हे नाव घराघरात पोहोचले. पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आणि त्याला मिळालेले घवघवीत यश यामुळे दिग्दर्शन वतुर्ळात निशिकांत यांचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले. या सिनेमानंतर निशिकांत यांच्यातला दिग्दर्शक पुर्णपणे स्वतंत्र झाला आणि त्यांनी इतर भाषिक सिनेमांचंही दिग्दर्शन करायला सुरुवात केली. २00७ मध्ये त्यांनी एक तमिळ सिनेमाही दिग्दर्शित केला.

२00८ मध्ये ते पुन्हा एकदा हिंदी सिनेमांकडे वळले आणि 'मुंबई मेरी जान' हा सिनेमा दिग्दर्शित केला. या सिनेमामुळेही निशिकांत यांच्या नावाची चर्चा झाली.

'सातच्या आत घरात' या चित्रपटात निशिकांत कामतची भूमिका होती. 'डोंबिवली फास्ट' हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. यातल्या माधव आपटेची कथा यात मांडली होती. एक सामान्य माणूस व्यवस्थेविरोधात जातो तेव्हा काय होते याचे चित्रण सिनेमात होते. त्यानंतर आला 'मुंबई मेरी जान' हा सिनेमा. मुंबईतल्या लोकलमध्ये झालेल्या स्फोटांवर हा सिनेमा आधारीत होता.. अत्यंत वेगळा आणि संवेदनशील सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला आहे. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला 'लय भारी' हा सिनेमा मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. 'लय भारी' या सिनेमादरम्यान निशिकांत कामत आणि रितेश देशमुख यांची चांगली दोस्ती झाली. 'फोर्स' हा सिनेमाही निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. 'रॉकी हँडसम' हा जॉन अब्राहमचा हा सिनेमाही निशिकांत कामतने दिग्दर्शित केला होता. अजय देवगणचा 'दृश्यम' हा सिनेमाही सुंदर सिनेमा होता.. हा सिनेमाही निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता . इरफानचा 'मदारी' हा सिनेमाही चांगलाच गाजला याही सिनेमाचे दिग्दर्शक होते निशिाकांत कामत. मराठीतला गाजलेला सिनेमा 'फुगे'. या सिनेमात सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांच्या भूमिका होत्या हा सिनेमाही निशिकांत कामत यांनीच दिग्दर्शित केला होता. भावेश जोशी या सिनेमात त्यांनी भूमिका साकारली होती. तर 'डॅडी' सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हा अविस्मरणीय ठरला. 

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस (२३ जानेवारी १८९७ ते १८ ऑगस्ट १९४५) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. 'नेताजी' ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओडिशा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. सुभाषबाबूंवर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता. कॉलेजमधील पहिले वर्ष संपल्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुटीत सतराव्या वर्षी ते आणि त्यांच्यासारखे त्यांचे चार-पाच मित्र गुरूच्या शोधार्थ निघाले. गुरू तर मिळाला नाहीच उलट तीर्थक्षेत्री जातिपातीचे प्रस्थ, शिवाशीव पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. अशुतोष मुखर्जींच्या मदतीने त्यांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला (१९१७). ते तत्त्वज्ञान विषय घेऊन पहिल्या वर्गात बी. ए. झाले (१९१९). त्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार ते 'आयसीएस'साठी इंग्लंडला गेले. त्यावेळी असहकार आंदोलन सुरू झाले नव्हते. जालियनवाला बाग येथे काय घडले, त्याची पूर्ण कल्पना पंजाब बाहेरच्या लोकांना आली नव्हती. परीक्षेत यश मिळाल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उजेडात आल्या. आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी पहिली सक्तीची एक वर्षाची उमेदवारी न करता सरळ नोकरीचा राजीनामा देऊन स्वदेशाची वाट धरली (१९२१). यावेळी महात्मा गांधींच्या असहकार चळवळ जोरात होती. त्यांची भेट घेऊन पुढील दिशा समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा गांधीनीच त्यांना कोलकात्याला चित्तरंजन दासांकडे (१९२१) पाठविले. मृत्यूपर्यंत चार वर्षे सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजनच होते. या सुमारास इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कोलकात्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली. त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला (१९२१). त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. तुरुंगात दासांच्या पुरोगामी विचारांचा सुभाषबाबूंवर फार मोठा परिणाम झाला. कारावासानंतर ते काही दिवस बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते.

Sunday 16 August 2020

अजिंक्यवीर रायबा तानाजी मालुसरे आणि पारगड किल्ला

आपल्या पराक्रमाच्या जोरावर इतिहासात अजरामर झालेलं एक नाव म्हणजे शिवरायांचे बाल सवंगडी ते मरणोत्तर छत्रपतींची राजेशाही कवड्याची माळ मिळवणारे कोंढण्याचा सिंहगड करणारे 'नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे' हे नाव लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणाला माहीत नसेल तर नवलच!

अशा या शूरविराचा मुलगा म्हणजे रायबा मालुसरे! स्वतःच्या मुलाचे लग्न पुढे ढकलून कोंढाणा घेण्यासाठी गेलेले सुभेदार स्वराज्याच्या कामी आले त्यानंतर शिवरायांनी स्वतः उमरठ येथे येऊन रायबांचे लग्न लावले.  इथपर्यंतचा इतिहास सर्वाना माहीत आहे, परंतु इथून पुढे इतिहासात रायबा मालुसरे हे नाव अंधारातच राहिले. लग्नाला स्वतः शिवराय माँसाहेब जिजाऊ यांच्या सोबत लग्नाला हजर होते. त्यांनी रायबाला सोन्याचे कडे दिले व रायबाची पत्नी जनाई यांनादेखील सोन्यामोत्याचा हार दिला.  व दोघांना आशीर्वाद दिले.  रायबा हे वाढत्या वयानुसार तलवारबाजी व युद्धकौशल्य यामध्ये तरबेज झाले. ते शूर व धाडसी होते. त्यांचे हे शौर्य पाहून छत्रपतींनी त्यांना पायदळाच्या सरनौबत पदाची जबाबदारी दिली. राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण मोहिमेत रायबा हे शिवरायांच्या सोबत होते. मोहीम उरकून माघारी येताना सध्याचा 'पारगड'चा डोंगर शिवरायांना दिसला. त्यांनी तिथे किल्ला बांधला व वास्तुशांती करून त्याचे नाव 'पारगड' असे ठेवले.

स्वराज्यतला पार टोकाचा शेवटचा किल्ला म्हणजे पारगड, घनदाट जंगल, हजारो दुर्मिळ वनस्पती, वन्यप्राणी आणि अजून हि अस्पर्शित असलेले कित्येक जीव अशा ह्या निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा नमुना असलेला भागात म्हणजे पश्चिम घाटातील चंदगड (जि. कोल्हापूर) परिसरात पारगड हा किल्ला वसलेला आहे. पारगड हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगांमधील असून समुद्रसपाटी पासून २४२० फूट उंचीवर आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७४ दरम्यान बांधला, पारगड ह्या किल्ल्याला रोमांचक असा शिकलीन इतिहास आहे. या किल्ल्याची वास्तुशांती झाल्यावर शिवरायांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांची 'पारगड' किल्याचा किल्लेदार म्हणून नेमणूक केली. पारगडाची किल्लेदारी मिळाल्यावर मालुसरे घराणे उमरठवरून पारडगला वास्तव्यास आले. आज त्याचे वंशज व्यवसानिमित्त बेळगाव येथे जरी राहत असले तरी त्याचे गडावरील घर अजूनही अस्तित्वात आहे. पारगडची उंची समुद्रसपाटीपासून 3000 फूट आहे. त्या काळातील म्हणजे रायबा मालुसरे यांची काही पत्रे अजूनही उपलब्ध आहेत. मालुसरे घराण्याचे वंशज बाळकृष्ण मालुसरे याच्या संग्रही ती पत्रे आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना 'पारगड'ची किल्लेदारी सोपविताना 'चंद्रसूर्य असे तो गड जागवावा' असा मजकूर असलेला ताम्रपट दिला. हा ताम्रपट आप्पाजी बिन येसाजी मालुसरे यांच्याकडून ब्रिटिशांनी जप्त करून एनिकेशन ऑफिसमध्ये ठेवल्याचे काही कागदपत्रावरून समजते.  रायबा मालुसरे यांचा ताम्रपट कुठे आहे याचा शोध इतिहासकारांनी घ्यायला हवा. 

जेव्हा महाराजांनी किल्लेदार रायबा आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. किल्ले पारगड हा तेथील मावळ्यांनी १८१ वर्ष अजिंक्यच ठेवला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करून आहेत.

पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताना कुमक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करली. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. 

रायबांनी 60 वर्षे पारगड अजिंक्य ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून त्यांचा गौरव झालाच त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या हातून देखील रायबांचा गौरव झाला. यावरून समजते की अजिंक्यवीर रायबा हे आपल्या पित्याप्रमाणे शूरवीर होते. रायबांच्या मृत्यूनंतर त्यांना मुलगा मुंबाजी यांनी त्यांची समाधी बांधली ही समाधी आजही आपल्याला पारगडावर पाहायला मिळते .धन्य ते रायबा धन्य त्याची स्वराज्य निष्ठा!

वाराणसी: धार्मिक, अध्यात्मिक शहर

वाराणसी हिंदूंचं एक पवित्र,धार्मिक शहर आहे. गंगानदीकाठची ही अत्यंत प्राचीन वसाहत आहे. तसेच 'वरुणा' व 'अस्सी' नदीच्या मधला भूभाग म्हणजेच वाराणसी. या शहराला 'काशी'सुद्धा म्हटलं जातं. 'काशी' हा शब्द संस्कृत 'कास' शब्दावरून आला असावा, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणामुळे आयुष्य प्रकाशमान होतं. म्हणूनच धर्म व अध्यात्माचं शैक्षणिक केंद्र असलेल्या या शहराला 'काशी' हे नाव सार्थ वाटतं. भगवान शिवानं हे स्थळ स्वतः शोधून काढलं, असं म्हटलं जातं. वाराणसीत जवळपास शंभराहून अधिक घाट आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात या घाटांचं जादुई रूप फार मोहक असतं. यावेळी या प्राचीन शहराच्या विशिष्ट संस्कृतीचं दर्शन घडतं. गंगा महोत्सव व देव- दीपावलीच्या दिवसांत तर या घाटांचं रूप अद्वितीय असतं. पणत्या, विजेचे दिवे, झेंडूची फुले, गुलाबाच्या पाकळ्यांनी या घाटांना सजवलं जातं.मंत्रपठण आणि ऋचांच्या आवाजाने सारं वातावरण भारलेलं असतं.अस्सी, दशाश्वमेध, पंचगंगा यांसारखे घाट फुलांची सजावट, विजेची रोषणाई व दिव्यांनी सणासुदीचा साज लेवून सजलेले असतात. काशी  विश्वनाथाचे येथे मंदिर आहे. इ.स. 1669 ला औरंगजेबाने या मंदिराला उद्ध्वस्त करून तिथं ज्ञानवाणी मशीद बांधली ,परंतु मंदिराच्या पुजाऱ्याने मूळ शिवलिंग मंदिरातून नेऊन विहिरीत लपवून ठेवलं. आताचं काशी विश्वनाथाचं मंदिर राणी अहिल्याबाई यांनी 1776 ला बांधलं. 

काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळच शनिचर (शनी) व अन्नपूर्णेचं मंदिर आहे. रामाचं तुलसीमानस हे संपूर्ण संगमरवरातील मंदिर, संकटमोचन ,कालभैरव, नवीन विश्वनाथ मंदिर अशी अनेक मंदिरे इथे आहेत. भारतमातेचं देखणं मंदिर फक्त वाराणसीत आहे. काशीत अनेक बुद्ध मंदिरेही आहेत. बुद्धानं जिथं आपली पहिली दीक्षा दिली ते सारनाथ वाराणसीपासून  अवघ्या 10 कि. मी. अंतरावर आहे. सम्राट अशोकानं इथं अनेक स्तूप व इमारती बांधल्या. अशोक स्तंभ, मूळ गंधाकुटीविहार, धर्मजाचक स्तूप अशा अनेक वास्तू त्यांनी बांधल्या. तिबेट, चिनी, थाई, बर्मी किंवा जपानी शैलीत बांधलेली अनेक आधुनिक मंदिरे आणि स्तूप इथे आहेत, जे प्रेक्षणीय आहेत.

या शहराला 'बनारस' हे नाव इंग्रजांनी दिलं होतं. इथे 2000 हजार एकर जमिनीवर बनारस हिंदू विश्वविद्यालय पसरलं आहे.बनारसच्या महाराजांनी ही जमीन दान केली आणि विश्वविद्यालयाचा पाया पंडित मदनमोहन मालवियांनी घातला. इथे संस्कृत व हिंदी भाषाव्यतिरिक्त आधुनिक शिक्षण पद्धतीची सुरुवात करण्यात आली. संस्कृत भाषा, भारतीय कला, संस्कृती व संगीत यांसाठी हे विश्वविद्यालय भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.  इथलं तोंडात विरघळणारं आणि आपली वेगळी चव जिभेवर व मनात रेंगाळत ठेवणारं बनारस पान आणि बनारस साडी प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे बनारस साडी विणण्याचं काम मुस्लिम कलाकार करतात. वाराणसीतील हिंदू-मुस्लिम संस्कृती अगदी दृष्ट लागण्यासारखी आहे. वाराणसी ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. तसेच साहित्यिकांचीही भूमी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली