Wednesday 9 November 2022

बालदिन : मुलांना त्यांच्या हक्कांचे ज्ञान देण्यासाठी सुरू केलेला दिवस

'मुले म्हणजे देवाघरची फुले' असे मानणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिवशी आपल्या देशात 'बालदिन' साजरा करण्यात येतो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर रोजी जयंती असते. संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९५४ रोजी 'बालदिवस' साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून भारतात देखील २० नोव्हेंबर याच दिवशी 'बालदिन' साजरा करण्यात येत होता. परंतु २७ मे १९६४ रोजी नेहरूंचे निधन झाले. नेहरूजींना लहान फारच प्रिय होती. त्यांचे बालकांवर खूपच प्रेम फारच प्रिय होती. त्यांचे बालकांवर खूपच प्रेम होते. मुलेही त्यांना प्रेमाने 'चाचा' म्हणत. म्हणूनच चाचा नेहरू यांच्या जन्मदिवशी (१४ नोव्हेंबर) बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १४ नोव्हेंबर याच दिवशी भारतात बालदिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. भारतात जरी बालदिन १४ नोव्हेंबर रोजी साजरा होत असला, तरी आंतरराष्ट्रीय बालदिवस हा २० नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. १९५९ साली झालेल्या संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या महासभेत बाल हक्कांची घोषणा सुद्धा करण्यात आली होती. हे बालहक्क चार वेगवेगळ्या भागांत विभागलेले असून त्यामध्ये जीवनाचा हक्‍क, संरक्षणाचा हक्‍क, सहभागाचा हक्क आणि विकासाचा  हक्‍क यांचा समावेश आहे. असे बरेच देश आहेत, जेथे वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा करण्यात येतो. काही देशांमध्ये एक जून, चीनमध्ये ४ एप्रिल, पाकिस्तान १ जुलै तर अमेरिकेत जून महिन्याच्या दुसर्‍या रविवारी बालदिन साजरा करण्यात येतो. याशिवाय ग्रेट ब्रिटन मध्ये २० ऑगस्ट, जपानमध्ये ५  मे या दिवशी बालदिन साजरा होतो. 

मुलांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे, कारण ही लहान मुलेच देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक होणार आहेत, तीच देशाचे सामर्थ्य आणि समाजाचा पाया आहेत, असे नेहरू  यांचे म्हणणे होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना छोट्या मुलांबद्दल खूप प्रेम वाटत असे. मोठेपणी त्यांच्या कोटाच्या पहिल्या बटनावर एक गुलाबाचे सुंदर फूल विराजमान झालेले दिसे. 'फूल व मूल' हीच त्यांची मोठी आवड होती. लहान मुले म्हणजे नेहरूंच्या हृदयातील अमूल्य ठेवा होता. मुले हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला होता. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात हे पालक आणि शिक्षकांनी पाहिले पाहिजे याबाबत ते सदैव आग्रही असत. 'मुले व फुले' याबद्दलचा जिव्हाळा नेहरूंच्या रोमारोमात भिनलेला होता. एकदा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी शाळकरी मुले आली आहेत हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते तडक घरी गेले आणि मुलांवर रंग उधळण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले. मुठी भरभरून त्यांनी त्या आलेल्या मुलांवर रंग उधळला. परंतु आपल्यावर रंग उधळण्यास मुले संकोच करत असल्याचे त्यांना जाणवले. म्हणून ते खाली बसले व म्हणाले, सांगा बघू. आता, कुठे आहे मी मोठा? झालो की नाही लहान आता तुमच्या एवढा छोटा ! चला आता उडवा पाहू माझ्यावर रंग!” असे होते हे चाचा नेहरू ! आपले वय, पद सर्वकाही विसरून ते लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखे लहान होऊन मिसळत व त्यांच्यात रमून जात. 

भारतातील प्रत्येक शाळेमध्ये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या  दिवशी प्रत्येक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येतून बाहेर पडून हा दिवस साजरा करतात. मुले ही भविष्यातील नागरिक आहेत. म्हणूनच शाळा या दिवशी विविध प्रश्नमंजुषा, वादविवाद, नृत्य, नाट्य व संगीत या प्रत्येकावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी विविध  प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यात मुलांच्या कला गुणांचे व विविध कौशल्यांचे दर्शन घडते. अनेक शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करून बालदिन साजरा केला जातो. काही शाळांमधील शिक्षक अनेकदा आसपासच्या अनाथाश्रमातील, आधारगृहांतील तसेच व आदिवासी पाड्यांमधील  मुलांना शाळेतील विद्यार्थ्यासह बालदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतात. अनेक स्वयंसेवी संस्था या दिवशी गरीब मुलांसाठी अनेक  कार्यक्रम करतात. अनेक मोठे दानशूर लोक या दिवशी मुलांना पुस्तके, खाऊ, चॉकलेट, बिस्किटे, खेळणी, शालोपयोगी साहित्य वगैरेंचे वाटप करतात. लहान मुलांना त्यांची कर्तव्ये व त्यांचे हक्क याबद्दल जाणीव  करून देण्याच्या हेतूने विविध शाळांमध्ये या विषयावर दृक-श्राव्य माध्यमांतून कार्यक्रम सादर करतात. बालदिन हा देशाच्या भावी पिढ्यांना त्यांच्या हक्कांचे ज्ञान देण्यासाठी सुरू केलेला विशेष दिवस आहे. 


No comments:

Post a Comment