Sunday 1 September 2019

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३0 ऑगस्ट २0१९ रोजी संपला. त्यांनी ३0 ऑगस्ट २0१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. २00१ ते २00२ मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच २00२ पासून २00७ पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २00८ ते २0१४पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. १९७७ मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.

No comments:

Post a Comment