Saturday 2 November 2019

चित्तरंजन दास


 (५ नोव्हेंबर १८७0 ते १६ जून १९२५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेपंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कोलकाता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कोलकात्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. चित्तरंजनाचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९0 मध्ये ते आयसीएस परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचार सभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुदार उद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले.
याचा परिणाम म्हणूनच आयसीएस परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात परतावे लागले (१८९३). विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राऊनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कोलकात्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले. यावेळी भुवनमोहन यांना फार कर्ज झाले होते. त्यांनी एके दिवशी आपले नाव दिवाळखोरीत नोंदविले. यामुळे प्रतिष्ठा आणि पैसा या दोहोंना त्यांना काही दिवस मुकावे लागले. चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे. त्यांचा विवाह १८९७ मध्ये वासंतीदेवी या श्रीमंत घराण्यातील युवतीशी झाला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. त्यांचा वकिलीत हळूहळू जम बसत होता. या सुमारास वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले. अलीपूर बॉम्बकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडागाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले (१९0८). त्यानंतर चित्तरंजनांची मोठय़ा वकिलांत गणना होऊ लागली. असाच ढाका कटाचा खटला (१९१0-११) त्यांनी चालविला. त्यांना प्रतिष्ठा आणि पैसाही भरपूर मिळू लागला. महिन्याला सुमारे पन्नास हजार रुपये त्यांचे उत्पन्न झाले. यावेळी त्यांनी नादार म्हणून पूर्वी नाकारलेले व कालबाहय़ झालेले सर्व कर्ज फेडले. त्यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला.

No comments:

Post a Comment