Tuesday 23 August 2022

साखरेला पर्याय 'झायलीटॉल'


भारतातील गुवाहाटीतील आयआयटीतील संशोधकांनी साखरेला पर्याय शोधून काढला आहे. ऊस गाळपानंतर शिल्लक राहिलेल्या उसाच्या ‘बगॅस’पासून साखरेला ‘झायलीटॉल’ हा सुरक्षित पर्याय शोधला आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी संशोधकांनी अल्ट्रासाउंडच्या मदतीने किण्वन पद्धत विकसित केली आहे. हे संशोधन ‘बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी’ आणि ‘अल्ट्रासोनिक्स सोनाकेमिस्ट्री’ या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. यामुळे केवळ मधुमेहाच्या रुग्णांवरच नव्हे तर एकूणच आरोग्यावर होणाऱ्या साखरेच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक असलेल्या लोकांनासुद्धा याचा फायदा होईल. 

संशोधक व्ही. एस.मोहोलकर म्हणतात की, नैसर्गिक पदार्थांपासून ‘झायलीटॉल’ हा साखरेला पर्याय ठरू शकणारा पदार्थ तयार केला आहे. या पदार्थामध्ये मधुमेहविरोधी, लठ्ठपणाविरोधी जीवाणू आहेत. त्याचप्रमाणे, पदार्थांत चांगल्या जीवाणूंचेही प्रमाण आहे. तो दातांचे झीज होण्यापासून रक्षण करतो. किण्वनाच्या पारंपरिक प्रक्रियेसाठी 48 तासांचा वेळ लागतो. मात्र, पदार्थाच्या निर्मितीवेळी किण्वन प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा वापर केल्याने हा वेळ 15 तासांपर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, ‘झायलीटॉल’च्या उत्पादनातही 20 टक्के वाढ झाली आहे. संशोधकांनी किण्वन प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा वापर केवळ दीड तासच केला. या प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडचा फारसा वापर न केल्याने उसाच्या बगॅसपासून उत्पादन होणाऱ्या या पदार्थामुळे भारतातील उस उद्योगापुढे एकीकरणाची संधीही निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. मात्र, सध्या हे संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित असून या पदार्थाचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करताना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

रासायनिक प्रक्रियेद्वारे झायलीटॉल औद्योगिकरित्या तयार केले जाते. या प्रक्रियेत लाकडापासून मिळविलेले ‘डी झायलोज’ या रसायनाची उच्च तापमानाला निकेल या संप्रेरकाबरोबर उच्च तापमान व दाबाला प्रक्रिया केली. या प्रक्रियेत अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे, केवळ ८ ते १५ टक्के डी झायलोजचे रुपांतर झायलिटॉलमध्ये झाले. त्याचप्रमाणे, झायलिटॉल स्वतंत्र करण्यासाठी ही प्रक्रिया किचकट असल्याने या पदार्थाची किंमत मात्र अधिक असणार आहे.

साखरेमुळे उष्मांकाचे अधिक सेवन झाल्याने वजन वाढते. यकृताचे आरोग्य बिघडू शकते. शरीरात साखरेची पातळी वाढल्याने मेंदूला पुरेसे ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.साखरेमुळे युरिक ॲसिड वाढून संधिवाताचा त्रास उद्‌भवतो. 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत आहाराला यज्ञाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, असेही आपल्या पूर्वजांनी सांगितले होते. मात्र, सध्याच्या युगात खा, प्या, मजा करा हाच मंत्र जपला जातो. साखर शरीराला आवश्‍यक असते, परंतु त्याचे अतिरिक्त सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा उद्‌भवू शकतात. त्यामुळे, केवळ गोड खाण्यावर भर देण्यापेक्षा पौष्टिक, संतुलित आहार घ्यावा. आहारात पालेभाज्या, कोशिंबिर, डाळी आदींचा समावेश असावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment