Monday 23 January 2023

हरियाणा: महिला कुस्तीपटूंची खाण

ज्या हरियाणात देशातल्या सर्वाधिक भ्रूणहत्त्या नोंदल्या जातात, त्याच हरियानामध्ये आज देशातल्या ‘टॉप टेन’मधील आठ महिला कुस्तीपटू आहेत. पुरुषप्रधान खाप पंचायतीचे वर्चस्व असलेल्या हरियाणातून इतक्या मोठ्या संख्येने महिला कुस्तीपटू पुढे येणे आणि थेट राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारणे ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही. जिथे मुली आणि महिलांना तोंडावर पदर घेऊनच घरी-दारी वावरावे लागते, स्त्रियांच्या आयुष्याचे निर्णय पुरुषच घेतात, त्या प्रांतात स्त्रियांना कुस्ती खेळण्याची परंपरा रुजवणे ही बाब सोपी नव्हती. भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरताना अनेक अडचणी, संकटांचा सामना करावा लागतो. कुस्तीचे मैदान मुलांनीच का मारायचे मुलींनी का नाही? असा प्रश्न भिवानी येथील महावीर सिंह फोगट या मल्लाच्या डोक्यात येतो. माझ्या मुलींनी कुस्तीत नाव कमवावे म्हणून ते स्वत:च प्रशिक्षक बनतात. प्रतिस्पर्धी तुल्यबळ असावा म्हणून हरियानाच्या रुढी परंपरा झुगारत ते मुलींना कुस्तीगीर मुलांसोबत लढवतात. त्यांच्यासोबत सराव करवतात, कुस्तीचे डावपेचही शिकवतात. यात मुली यशस्वी होतात. फोगट कन्यांचे नाव आसमंतात दुमदुमते. महावीर फोगट यांच्या कमालीच्या जिद्दीला सुपरस्टार अमीर खानही सलाम ठोकतो. त्यातूनच २०१६मध्ये ‘दंगल’ चित्रपटाची निर्मिती होते. फोगट कन्यांच्या यशाप्रमाणे मुलींना कुस्तीक्षेत्रात नाव काढण्यासाठी हा चित्रपट वेड लावतो.  या सगळ्या मुलींचा एकच मंत्र असतो तो म्हणजे जिद करों, दुनिया बदलों!

साक्षी मलिक ही महिला कुस्तीपटू, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवून शब्दश: भारताची इभ्रत राखते. वयाच्या बाराव्या वर्षापासून ती कुस्तीचे धडे गिरवते. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. गीता फोगट ही महान कुस्तीपटुंपैकी एक. ज्या वेळी मुलींनी कुस्ती खेळण्याची मानसिकता नव्हती अशावेळी गीताने अनेक अडचणींवर मात करून २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. विनेश फोगट ही भारतातील सर्वात आश्वासक महिला कुस्तीपटुंपैकी एक. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले. अंशू मलिकने वयाच्या एकविसाव्या वर्षी जगभरात नाव कमावले.

तिने २०२१च्या ओस्लो जागतिक कुस्ती स्पर्धेत रजत पदक पटकावले. फोगट कुटुंबातील बबिता कुमारीने २०१४च्या ग्लासगो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नवोदित कुस्तीपटू निशा दहिया हिने २०२१मध्ये जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले. गीतिका जाखड़ हिने २००६मध्ये दोहा आशियाई आणि २०१४ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रजत पदक जिंकले. या सर्वच कुस्तीगीर महिला हरियानातील आहेत. याशिवाय देशातील अन्य राज्यातील काही महिला कुस्तीपटुंनीही जागतिक पातळीवर पदके पटकावली आहेत. परंतु हरियानातील विशेषत: रोहतक, भिवाणी, हिसार, सोनीपत, जिंद, कर्नाल भागातील तरुणींमध्ये ‘विनींग इज द ओन्ली ऑप्शन’ची अनुभूती दिसते. मैदानात कसब दाखविण्याची प्रत्येकीची स्पर्धा स्वत:शीच लागली आहे. काही वर्षांपूर्वी या शहरातील शाळांच्या मैदानांवर, क्रीडा संकुलात सकाळी, सायंकाळी पुरुषच दिसायचे, अपवादानेच मुली! आता मुलींची गर्दी वाढली. कोणी कुस्ती, कोणी कबड्डी, कोणी कराटे तर कोणी मुष्टीयुद्धाचा सराव करताना दिसताहेत.रोहतक जिल्ह्यातले मोखरा हे १८ हजार लोकवस्तीचे गाव जगात पोहचले आहे. त्याने आतापर्यंत पन्नासवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महिला-पुरूष कुस्तीगीर दिले आहेत. गावातील शेकडो कुस्तीगीर सीमेवर देशरक्षणार्थ ठाकले आहेत. येथील अनेक कुस्तीपटू हरियाणा पोलिसांत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बजावत आहेत. लष्करातून निवृत्त झालेले निस्वार्थभाव ठेवत गावातील मैदानांवर मुलींना-मुलांना कुस्ती, कबड्डी, कराटे, मुष्टीयुद्धाचे डावपेच शिकवतात. त्यांची जिद्द हीच की, या गावाचे नाव देश-परदेशात कायम राहावे. साक्षी मलिक याच गावातील. तिचा जन्म इथेच झाला. साक्षीच्या गावाप्रमाणेच हरियानातील प्रत्येक जिल्हा, तालुक्याचे चित्र आहे. फोगट भगिनी, साक्षी, अंशु मलिक यांचे यश पाहता हरियानातील प्रत्येक मैदानावर कुस्तीच्या आखाड्यात मुलांपेक्षा मुलींच अधिक दिसतात. गेल्या पंधरा वर्षांतली हरियानातील कुस्तीपटू मुलींची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे.

No comments:

Post a Comment