Monday 6 February 2023

भाजीपाला विक्रेता बनला मराठी चित्रपटाचा 'नायक'


सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर छोटंसं गाव आहे शिंदेवाडी. साधारण दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावातला एक तरुण आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मराठीचा रुपेरी पडदा गाजवतोय. त्याचं नाव आहे प्रशांत यशवंत बोदगिरे. उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत त्याने आपली अभिनय कला जोपासली आहे. आज तो 'रगील' या चित्रपटाद्वारे अभिनेत्याची प्रमुख भूमिका साकारतोय. 'रगील' 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

आवड असली की सवड मिळतेच. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही प्रशांत बोदगिरेने अभिनयाची आवड जोपासली. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला लहानपणापासूनच कला क्षेत्राची आवड आहे. कवठेमहांकाळ येथील महांकाली हायस्कूलमध्ये त्याचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी आणि बारावी पूर्ण केल्यानंतरही आता तो पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 'माझा छकुला' हा चित्रपट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला. तेव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळा, महाविद्यालयात त्याने नाटक, स्नेहसंमेलन या माध्यमातून आपली ही कला जोपासली आहे. त्याच्या जिद्द आणि चिकाटीमुळेच तो मोठ्या पडद्यावरच्या नायकाच्या भूमिकेपर्यंत पोहचला आहे. रगील व्हावं, असा विचार मांडणाऱ्या ‘रगील’ या चित्रपटाचा टीजर अलिकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. देवा प्रॉडक्शननिर्मित दीपक आहेर यांनी  ‘रगील’ . या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात ग्रामीण भागातील एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. प्रशांतसह शिवानी कथले, प्रणव रावराणे, अर्णव आहेर, दीपक आहेर, प्रेमा किरण भट, अक्षय गवस, सुदर्शन बोडके आदींच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. 

No comments:

Post a Comment