Saturday 10 August 2019

भारतात सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

जगभरात दरवर्षी 5.4 दशलक्ष सर्पदंशाच्या घटना घडत असून त्यातील सुमारे 2.8 दशलक्ष सर्पदंशाच्या एकट्या भारतात घडत असून त्यामुळे भारताचा उल्लेख सर्पदंशाची राजधानी असा केला जात आहे. भारतीय संस्कृतीने जरी सापांना देवता रूपात पूजलेले असले तरी सापांसंदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेले अज्ञान आणि प्रचलित अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशाने होणाऱ्या  मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. आज सापांचा नैसर्गिक अधिवास आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची व्याप्ती वाढलेली असल्याने, सापांनी आपला मोर्चा लोकवस्तीच्या त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे आणि त्यामुळेच सर्पदंशाची प्रकरणे वाढून त्यात मृत्यूमुखी पडणाऱयांचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. पावसाळी मोसमात बहुतांश साप आपल्या भक्ष्याच्या, पाण्याच्या किंवा जोडीदाराच्या शोधार्थ बाहेर पडतात. सापांना कमी अन्न लागत असले तरी पाणी मात्र भरपूर लागते.
एक भारतीय अजगर दोन वर्षे नऊ महिने इतका काळ काहीही भक्षण न करता राहिल्याची नोंद आहे.
सापांच्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. बऱयाचदा सूर्यप्रकाशातून उष्णता मिळाल्यावर साप आगेकूच करतो. आज थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष उल्लेखनीय असलेले माथेरान सापांच्या वैविध्यपूर्ण प्रजातींसाठी ख्यात होते. सापांबाबत प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुती यामुळे सापांना मोठय़ा प्रमाणात मारले जात असून, सर्पदंश झाल्यावर आजही वैद्यकीय उपचार करण्याऐवजी अशास्त्राrय उपचार पद्धतीचे अवलंबन करणाऱया वैदूकडे नेले जाते आणि त्यामुळे उद्भवणाऱया मृत्यूलाही सापांना जबाबदार धरले जात आहे. पावसाळय़ात बऱयाचदा कोरडय़ा आणि सुरक्षित दिसणाऱया जागेकडे स्थलांतर करतात आणि त्यामुळे त्यांचा संबंध मानवाशी येऊन सर्पदंशाची प्रकरणे उद्भवतात.
दरवर्षी 2.8 दशलक्ष उद्भवणाऱया सर्पदंशाच्या प्रकरणांतून सुमारे 45,900 जणांचे मृत्यू उद्भवत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जगात 5.4 दशलक्ष सर्पदंशाच्या प्रकरणातून सुमारे एक लाख लोकांचे मृत्यू झालेले आहेत. 2017 साली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते ऑक्टोबर या काळात गोळा केलेल्या माहितीनुसार 1.14 लाख सर्पदंशाची प्रकरणे उद्भवल्याचे स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यात सर्पदंशाची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात उद्भवत असल्याचे स्पष्ट झालेले असून, सर्पदंशावरती प्रति सर्प विष मात्रा अभावाने केली जात असल्याने, त्यात बऱयाच जणांचे मृत्यू करुणरित्या झालेले आहेत.
भारतात 300 सापांच्या प्रजाती असून, त्यात 62 सापांच्या प्रजाती विषारी आहेत. परंतु असे असले तरी उद्भवणाऱया सर्पदंशाच्या प्रकरणातून ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्याला नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस यांच्या दंशावर योग्यवेळी उपचार न झाल्याची पार्श्वभूमी कारण ठरलेली आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंध प्रदेशात सर्पदंशाने मृत्यूमुखी पडणाऱयांचे लक्षणीय प्रमाण असल्या कारणाने जागतिक आरोग्य संघटनेने 2017 साली सर्पदंशांना दुर्लक्षित उष्ण कटिबंध प्रदेशातल्या आजारांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस यांच्या दंशावर एखाद्या रुग्णाला शंभर मिनिटांच्या आत प्रति सर्प विषाची शंभर मिली लिटरची मात्रा दिली तर तो वाचण्याची शक्यता असते. परंतु एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यावर त्याच्यावर प्रति सर्प विषाची मात्रा देण्यास तीन तासांपेक्षा ज्यादा अवधी लागत असून त्यामुळे जहाल सापांच्या दंशाने मृत्यूची प्रकरणे उद्भवल्याचे स्पष्ट झालेले आहे. गलिच्छ परिसर, उंदरांचा सुळसुळाट झालेल्या जागांवर सापांचे वास्तव्य प्रामुख्याने आढळलेले आहे. केवळ ग्रामीण भागात नव्हे तर गलिच्छ, केरकचरा, सांडपाणी यांनी संत्रस्त जागा नागरी वस्तीत सापांचे वास्तव्य आढळलेले आहे.

No comments:

Post a Comment