Thursday 25 February 2021

ज्वाला गुट्टाची कामगिरी


भारतीय महिला बॅडमिंटनला ज्या काही मोजक्या बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गती दिली, प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यामध्ये ज्वाला गुट्टाचा समावेश होतो. अर्थात ज्वालाला एकेरीमध्ये सायना नेहवाल अथवा पी.व्ही.सिंधूएवढी बाजी मारता आली नसली तरी तिने दुहेरीमध्ये मात्र भरीव कामगिरी केली. अशा या ज्वालाला भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये वारंवार वर्णद्वषाला सामोरे जावे लागते, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. अलीकडेच ज्वालाच्या आजीचे चीनमध्ये निधन झाले. ज्वालाने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी देऊन शोक व्यक्त केला. त्यानंतर आपल्याला वर्णद्वेषी टोमणे खावे लागत आहेत अशी उद्विग्नता ज्वालाने व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला 'कोरोना व्हायरसला तू ‘कोव्हिड' ऐवजी 'चायनीज व्हायरस' का म्हणत नाहीस?, असे असंबंधित आणि खोचक शेरे मारले. या वर्णद्वषी टोमण्यांनी हैराण झालेल्या ज्वालाने, या देशात सहानूभूती, सांत्वन नावाचा प्रकार आहे की नाही? असा अगतिक सवाल करून जे लोक टोमण्यांचे समर्थन करतात त्यांना लाज वाटायला हवी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या एकूण घटनेची आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. ज्वालाचा जन्म वर्धा (महाराष्ट्र) येथे ७ सप्टेंबर १९८३ रोजी झाला. विशेष म्हणजे तिची आई चिनी वंशाची आणि वडील खेळीयाड तेलगू भारतीय आहेत. ज्वालाचे वडील क्रांती गुट्टा हे मूळचे आंध्र प्रदेशमधील गुंटूरचे. स्वातंत्र्यचळवळीत त्यांचे घराणे अग्रेसर होते आणि ते डाव्या विचारणीचे आहेत. ज्वालाची आई येलन यांचा जन्म चीनमध्ये झाला. येलन या चिनी गांधीवादी विचारवंत झेंग यांची नात. १९७७ मध्ये प्रथमच येलन आपल्या आजोबांबरोबर वर्धा येथील सेवाग्राम गांधी आश्रमाला भेट। देण्याच्या निमित्ताने भारतात आल्या आणि इथेच रमल्या. येलन यांनी महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचे आणि इतर लेखनाचे चिनीमध्ये भाषांतर केले. तेथेच त्यांची ओळख क्रांती गुट्टा यांच्याशी झाली आणि हे दोघे विवाहबध्द झाले. या जोडप्याला ज्वाला आणि इंसी अशा दोन मुली. दरवर्षी येलन आपल्या मुलींना घेऊन चीनमधील आपल्या गावाला जायच्या आणि आपल्या आई-वडिलांना भेटायच्या. मात्र कोरोना काळात २०२० मध्ये त्यांना चीनमध्ये जाता आले नाही. आणि त्यातच त्यांच्या आईचे चीनमध्ये निधन झाले. चीनमध्ये टेबल टेनिसनंतर बॅडमिंटनचे खूप प्रस्थ. त्यामुळे येलन कधीकाळी बॅडमिंटन खेळल्या असाव्यात. ज्वाला प्रारंभी टेनिस खेळायची. पण येलन यांनी तिला बॅडमिंटन खेळण्यास प्रवृत्त केले. बॅडमिंटन प्रशिक्षक एस.एम.अरिफ यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवलेल्या ज्वालाने अल्पावधीतच राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. ज्वालाने २००२ ते २००८ या कालावधीत श्रुती कुरियनच्या साथीने सलग सात वर्षे महिला दुहेरीचे अजिंक्यपद आपल्याकडे राखले होते. ज्वालाने ऑलिंपिक वगळता इतर सर्व बॅडमिंटन स्पर्धामध्ये दुहेरीत अजिंक्यपदे किंवा पदके मिळवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना ज्वालाने दुहेरी आणि मिश्च दुहेरीमध्ये ३१५ सामने जिंकले. हा एक विक्रम आहे. जागतिक क्रमवारीत तिने सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. बॅडमिंटनमधील चमकदार कामगिरीमुळे ज्वालाला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी तिचा विवाह झाला आणि नंतर घटस्फोटही. त्यानंतर तिचे नाव माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरूदीनशी जोडले गेले. आता एका तेलगू अभिनेत्याशी तिचा साखरपुडा झाला आहे. चीन हा भारताचा 'शत्रू नंबर वन' हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याचा राग ज्वालावर काढणे योग्य नाही. डोकलाम, गलवानच्या चकमकीनंतर ज्वाला गुट्टावर सातत्याने आक्षेपार्ह टोमण्यांची खैरात होत आहे. चीन कितीही हलकट असला आणि ज्वालाची आई चिनी असली तरी यात तिचा काय गुन्हा? ज्वाला तर भारतीय वंशाची आहे, भारतीय आहे. ही गोष्ट टोमणे मारणाऱ्यांनी लक्षात घेऊन ज्वालाला मानसिक त्रास देण्याचे प्रकार त्वरित थांबवले पाहिजेत.


No comments:

Post a Comment