Sunday 21 February 2021

थंड हवेचे ठिकाण:चिखलदरा

 


महाराष्ट्रातील विदर्भाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे विपुल वरदान लाभलेले आहे. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुड्याच्या एकूण सात पर्वतरांगा आहेत. त्यापैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आहे. अमरावतीपासून चिखलदरा 94 किलोमीटर अंतरावर आहे.विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण अशी चिखलदराची ओळख आहे. येथील दऱ्या हजारो फूट खोल आहेत. एका दरीच्या वरील भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केल्याने त्याला भीमकुंड' असे नाव पडले, असे म्हणतात. येथे मोर, अस्वले, रानकोंबड्या, हरिण हे

प्राणीही मुक्तपणे बागडत असतात. चिखलदऱ्याचा परिसर शुष्क पानझडी वनाच्या प्रकारात येतो. त्यामुळे, उन्हाळ्यात येथे पानझड सुरू होते. येथील शक्कर तलाव, मछली तलाव, देवी तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) ही चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यानंतर पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा पॉइंटही प्रसिद्ध आहे. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर अंतरावर डोंगरावर विराट देवीचे मंदिर आहे. चिखलदऱ्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. आपण हा किल्लाही पाहू शकतो. तो पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. या किल्ल्यात जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आहेत. किल्ल्याची दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. उन्हाळ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून तर चिखलदरा लोकप्रिय आहेच. याशिवाय, पावसाळ्यातील सुंदर धबधबे, ढगांमध्ये गेलेल्या पर्वतरांगांमुळे चिखलदरा अतिशय विलोभनीय दिसते.मेळघाटचा परिसर व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment