Friday 19 February 2021

सनई वाद्य


सार्वजनिक समारंभ, मिरवणुका, विवाहादी शुभप्रसंगी वाजविले जाणारे सनई हे तोंडाने फुंकून वाजविण्याचे  एक मंगलवादय आहे. पूर्वी महराष्ट्रात राजे-महाराजांचे प्रासाद व देवळांतून सनई-चौघडा वाजविण्याची प्रथा होती. त्याकरिता राजप्रासाद व मंदिरांसमोर नगारखाना ही वास्तू बांधलेली अनेक मोठया मंदिरांतून आढळते,

मोठ्या मोठ्या मंदिरातून सनईवादकांकडून पहाटेच्या वेळी सनईवर संगीत वाजवून घेत. 'मंगलध्वनी' च्या निर्मितीवरून एक प्रकारचं भक्तिमय वातावरण तयार होत असे. आता ही प्रथा काहीशी कालबाह्य झाली आहे. मात्र सनईवादकाचं स्थान लग्न-मुंजीच्या समारंभात आजही टिकून आहे. सनईचे थेट वादन शक्य नसले तरी ध्वनिमुद्रित सनई मात्र मंगल प्रसंगात अपरिहार्य झाली आहे. सनईसदृश वादयेही भारतात अनेक ठिकाणी प्रचलित आहेत. उत्तर भारतात ‘शहनाई ’ म्हणून हे वादय ओळखले जाते. दाक्षिणात्य संगीतातील ‘ नादस्वरम् ’ हे वादय सनईसारखेच असते. सनई भारतात मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांतून विशेषत: इराणमधून आली. इराणी ‘ सुर्ना ’ हे वादय भारतात येऊन त्याचे रूपांतर सनईत झाले, असे म्हटले जाते. कालांतराने शहनाई व सनई ही दोन्ही नावे महाराष्ट्रात प्रचलित झाली. मराठी भाषेत सनई व हिंदीत शहनाई असं या वाद्याचं नाव आहे. ओठ व जीभ यांच्या सुयोग्य वापराने, तसेच बोटांच्या कौशल्यपूर्ण उपयोगाने या वादयातून स्वरविलासाच्या अनेक नादमधुर छटा निर्माण करता येतात. त्यामुळे सनईवादन अत्यंत श्रवणीय होते. लग्न समारंभात तर ही सनई असतेच. सनईवादकाला तालाची साथ करायला चौघडा  असतो. आणखी एक वाद्य कुणाला फारसं माहीत नसलेलं पण अगदी समान दिसणारं म्हणजे सुंदरी किंवा सुंद्री. सोलापूरला सिद्रामप्पा जाधव नावाचे सुंदरीवादक खूप लोकप्रिय होते. भारतरत्न बिस्मिल्ला खांसाहेबांनी सनई  या वाद्याला देशात आणि परदेशात मोठी लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.  त्यांचं वादन म्हणजे आनंदोत्सवच असे. त्यांची सनई कमालीची सुरेल आणि ललित मधुर असे. रागविस्तार खूपच कलात्मक आणि परमोच्च आनंद देणारा असे. चौघडा वादकाबरोबर ( किंवा तबला) ते फार डौलदार रीतीने तालक्रीडा करत. पं. व्ही. जी. जोग (व्हायोलिन) यांच्यासोबत त्याचप्रमाणे उस्ताद विलायत खां (सतार) यांच्याबरोबर जुगलबंदीचे अत्यंत श्रवणीय अफलातून कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. सनईबरोबर तालासाठी दोन लहान नगारे, चौघडा वा खारदक हे वादय घेतात. ते दोन्ही हातांत घेतलेल्या छडयांनी वाजवितात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment