Sunday 12 September 2021

मलाबार नौदल युद्ध सराव


मलाबार हा खऱ्या अर्थाने एक बहुपक्षीय नौदल युद्धसराव आहे. याची सुरुवात १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९५ आणि १९९६ या दोन वर्षांत आणखी दोन वेळा भारत आणि अमेरिकी नौदलांकडून संयुक्तपणे मलाबार नौदल युद्धसराव करण्यात आला. पण त्यानंतर मात्र २००२ पर्यंत त्यात मोठा खंड पडला होता. पुढे २००७ मध्ये पहिल्यांदा या सरावामध्ये भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीदेखील भाग घेतला. गेल्या आठ वर्षांपासून म्हणजेच २०१४ सालापासून भारत, अमेरिका आणि जपान हे तीन देश दरवर्षी या युद्धसरावात सहभागी होत आहेत. सुरुवातीच्या काळात हा युद्धसराव फक्त द्विपक्षीय होता. यामध्ये भारत आणि अमेरिका ही दोनच राष्ट्रे सहभागी होत होती. मात्र आता तो चार देशांच्या संयुक्त युद्ध कार्यक्षमतेचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला आहे. भारताचे संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीच सांगितल्याप्रमाणे क्वाडचा मुख्य हेतू सर्व सहभागी राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य निश्चित करणे, त्यासाठी प्रयत्न करणे हाच आहे.

२०१५मध्ये पहिल्यांदा जपान कायमस्वरूपी सदस्य म्हणून या सरावात सहभागी झाला. तेव्हा मलाबार सराव द्विसदस्यीयवरून त्रिसदस्यीय झाला. पण गेल्या वर्षीची घटना ही या सराव प्रक्रियेतला मैलाचा दगड ठरली! १० वर्षांत पहिल्यांदाच गतवर्षी क्वाड गटातले सर्वच्या सर्व देश या सरावात सहभागी झाले होते. २०२०च्या मलाबार युद्ध सरावामध्ये ऑस्ट्रेलियादेखील सहभागी झाला होता.

भारताने सांगितले आहे की, शांतता, स्थैर्य आणि या भागातील सर्वच देशांसाठी समृद्धीविषयी बांधिल आहोत. आमचे यावरदेखील एकमत झाले आहे की या भागामध्ये नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था, कायद्याचा आदर करणं, आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये मुक्त संचाराचं स्वातंत्र्य असणं आणि संबंधित देशांची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राहणं नितांत आवश्यक आहे. आमचं सामरिक सहकार्य याच ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बांधील आहे!’

मलाबार युद्धसरावात प्रामुख्याने प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थितीतील वातावरण गृहीत धरून त्या अनुषंगाने निर्णय आणि त्यावर कृती यांचा सराव केला जातो. गेल्या वर्षी याच प्रकारातील ‘दुहेरी वाहक’ पद्धतीचा सराव करण्यात आला. त्यामध्ये भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य आणि अमेरिकन नौदलाची निमित्झ ही युद्धनौका सहभागी झाली होती. या दोन प्रमुख युद्धनौकांबरोबरच दोन्ही देशांकडून इतर जहाजे, अजस्र पाणबुडय़ा आणि लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.

यावर्षी, हवेत आणि पाण्यात अशा तीनही पातळ्यांवर मारा करण्याच्या क्षमतांची चाचणी घेतली गेली. तसेच, युद्धसदृश परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या कल्पक निर्णयांचीदेखील अंमलबजावणी केली गेली. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या सरावांमधून चारही देशांच्या नौदलांमध्ये एखादी संयुक्त नौदल कारवाई करण्यासाठीचा समन्वय आणि परस्पर सामंजस्य वाढण्यास मदत होते. तसेच, क्वाडमधल्या चारही देशांमध्ये असलेली धोरणात्मक एकात्मता होण्यासदेखील मदत होते.

यंदाच्या ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या मलाबार नौदल युद्ध सरावामध्ये भारताकडून आयएनएस शिवालिक ही बहुउद्देशीय स्टेल्थ युद्धनौका, आयएनएस कदमत ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि पी८आय हे दीर्घ पल्ल्याची गस्तक्षमता असणारं विमान या युद्ध सरावामध्ये सहभागी झालं. अमरिकेकडून या सरावात यूएसएस बॅरी, यूएसएनएस रॅप्पाहॅनॉक, दी यूएसएनएस बिग हॉर्न आणि पी८ए हे गस्ती विमान सहभागी झाले. जेएस कागा, जेएस मुरासमी आणि जेएस शिरानुई या अजस्र युद्धनौका जपानकडून सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत पी१ हे गस्ती विमान आणि एक पाणबुडीदेखील जपानी नौदलाच्या ताफ्यात होती. क्वाड गटातला चौथा देश असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नौदलाकडून या सरावामध्ये एचएमएएस वारामुंगा ही युद्धनौका उतरवण्यात आली होती.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment