Monday 27 December 2021

नाशिकचा फ्लॉवर पार्क


मोगल साम्राज्याच्या काळात इ.स. 1487 मध्ये नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून गुलशनाबाद नावाने जगप्रसिद्ध होते. येथे गुलाबाची मोठ्या प्रमाणावर शेती व्हायची. येथील वातावरणही फुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या फुलण्यासाठी पोषक होते. इंग्रजही याचमुळे या शहराच्या प्रेमात पडले होते. त्याचमुळे इथे मुंबई, ठाण्यानंतर देवळाली कॅम्पपर्यंत रेल्वेची सुविधा त्यांनी उभारली होती. नाशिकमध्ये फुलणारी फुले ब्रिटिश स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमध्ये परतताना ते सोबत घेऊन गेले. पण आपल्याकडून ती जवळजवळ नामशेष झाली. दुसरीकडे दुबईसारख्या वाळवंटात मिरॅकल गार्डनसारखे अप्रतिम फुलांचे गार्डन बहरवले जाऊ शकते तर आपल्या नाशिकमध्ये का नाही? याच विचारातून नाशिक फ्लॉवर पार्कची उभारणी  करण्यात आली. 

नाशिक येथील उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरीजवळ आठ एकर क्षेत्रावर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. येथील अनुकूल हवामान या फुलांसाठी फायदेशीर ठरले आहे.  जागतिक स्तरावर दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. कल्पकता, संशोधन व स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून हे उद्यान साकारले आहे.  सामूहिक कल्पकतेतून टाकाऊ घटकांचा अधिक वापर करून येथे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली आहे. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश आहे. या फुलांचा व विविध वेलींचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या पार्कमध्ये 128 प्रकारची विविध फुले आहेत. फ्लॉवर पार्कमध्ये लाल माती, कोकोपीट व खतांच्या मिश्रणाचा वापर करून विशिष्ट आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात संपूर्णपणे सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. सलग सहा महिने 40 ते 50 लाख फुलांचा बहर पाहायला मिळतो. 

विविध जातींच्या, रंगांच्या शोभिवंत फुलझाडांची या पार्कमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पिटोनियाची 20 रंगांची रोपे, झेनियाची ९ रंगांची तर डायनथसच्या 80 रंगांच्या रोपांचा समावेश आहे. या झाडांचे जीवनमान 5 महिन्यांचे असल्याने फ्लॉवर पार्कमध्ये ही फुलझाडे मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे.विस्तीर्ण पार्कमध्ये सहकुटुंब भ्रमंतीचा आनंद घेता यावा  म्हणून 'किड्स एरिना' ची निर्मिती करण्यात आली आहे. येथे मुलांसाठी 20 ते 25 खेळांची व्यवस्था केली गेली आहे.

गोड्या पाण्यातील देशविदेशातील माशांचा 'अॅक्वेरियम' तयार करण्यात आला आहे.60 मोठ्या टॅकमध्ये माशांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रजातीचा मासा काय खातो, कसा जगतो आदी रोचक माहिती मिळते. पार्कमध्ये छोटेखानी 'बर्ड पार्क'देखील आहे. मोठ्या संख्येने लव्ह बर्ड, अमेरिकन कबुतर, चीनच्या कोंबड्या असे अनेक पक्षी येथे भेटतात. मुख्य आकर्षण ठरते तो ब्राझिलचा 'इग्वाना' म्हणजे सरड्यासारखा दिसणारा प्राणी. साडेपाच फुटाचा इग्वाना केवळ साडेचार वर्षाचा आहे. धष्टपुष्ट इग्वाना 100 टक्के शाकाहारी असून तो भाजीपाला खातो. अॅडव्हेंचर पार्क', 'रोप वे'चा आनंद घेता येतो. निसर्गरम्य वातावरणात नाशिक फ्लॉवर पार्कमध्ये सुखद वास्तव्याची सुविधाही उपलब्ध आहे. लेह, लडाखच्या धर्तीवर पार्कमध्ये 25 वातानुकूलित तंबू (टेन्ट) उभारण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment