Tuesday 28 December 2021

अद्भुत धातू कलाकृतींचा किमयागार


माणसं कशानं झपाटून जातील काही सांगता येत नाही. आर्ट कलेकडे वळलेली माणसं चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रात आपलं नाव कमावतात. मात्र यातही ते वेगळेपण जोपासतात. मुंबई- भायखळा येथील मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्नील शिवाजी गोडसे याने धातूंपासून विविध कलाकृती साकारून कला क्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.  नुकतंच जहांगीर कलादालनात त्याचं 'दगड' हे अनोखे प्रदर्शन पार पडलं. या प्रदर्शनातून स्वप्नीलने धातूची अदभुत किमया कलाप्रेमींना दाखवली. घरात कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या गिरणी कामगाराच्या मुलाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.

स्वप्नील गोडसे याने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून 2010 मध्ये पदवी प्राप्त केली आहे. धातूचे हे कलेचे माध्यम निवडताना त्याने स्टील, लोखंड, तांबे, पितळ अशा धातूचा वापर करून  विभिन्न कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच साकारलेले 'दगड' हे त्याचे पहिले सोलो प्रदर्शन होते. या संकल्पनेविषयी स्वप्नील बोलताना तो म्हणतो की,, मी मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. तिथे धरण बांधत असताना डोंगर पोखरताना बघितले आहे. त्या वेळी आतील दगड काढताना मला दिसत होते. ते दगड कायमस्वरूपी माझ्या मनावर कोरले गेले. तीच संकल्पना घेऊन मी पहिले सोलो प्रदर्शन करायचे ठरवले.

स्वप्नीलने अनेक उत्तमोत्तम धातूचे काम केले आहे. एम. एस. धोनी यांच्या रांची येथील बंगल्यात स्वप्नीलने तयार केलेले धातूचे शिल्प आहे. याआधी त्याने कॉपर शर्ट बनवला होता. कॉपरची गोण ही वेगळी कलाकृती त्याने साकारली होती. रे रोड येथे स्वप्नीलने स्टुडिओ उभारला आहे. या अभिव्यक्तीच्या क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक काळ त्याने परिश्रमपूर्वक काम केले आहे आणि त्याला प्रचंड यशही मिळाले आहे.  स्वप्नीलचा प्रेमळ आणि प्रभावी संवाद यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्याला सुलभता येते. याचमुळे त्याने व्यवसायातही चांगला जम बसवला आहे. अजूनही नवनवीन कलाकृती साकारण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

 जहागीर कलादालनात स्वप्नील गोडसे याचे 'दगड' प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात धातूंच्या मदतीने भूगर्भीय बदलांवर प्रकाश टाकण्यात आला. दगड आणि मानवी जीवनातील परिवर्तन, मानवी स्वभाव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केला. स्वप्नील सांगतो, दगड म्हणजे डोंगर, डोंगर म्हणजे माती आणि माती म्हणजे जीवन. प्रत्येक जण मातीशी कनेक्ट असतो. दगडातून फुटलेली नवी पालवी, खास रिक्षा, दुचाकी किंवा मालवाहू वाहनांतून होणारा दगडांचा प्रवास, विकासाच्या नावाखाली झाडे तोडल्याने ओकंबोकं झालेली डोंगरे अशा त्याच्या कलाकृतींनी लक्ष वेधून घेततात.


No comments:

Post a Comment