Tuesday 28 December 2021

मानवतावादी शांतिदूत डेस्मंड टुटू


त्वचेच्या रंगावरून उच्च-नीच ठरविण्याची पद्धत केवळ दक्षिण आफ्रिकेच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातील लज्जास्पद प्रकरण आहे. श्वेतांच्या अहंगंडातून आलेला हा वर्णद्वेष इतरांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारत होता. मानवतेला काळिमा फासणारी ही पद्धत नष्ट होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जनतेला दीर्घ लढा द्यावा लागला.नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे वादातीत प्रणेते मानले जाते. परंतु अशा नेत्यांच्या संघर्षांचे आणि कष्टोत्तर यशाचे गमक समर्थ अशा दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये दडलेले असते. आर्चबिशप डेस्मंड टुटू हे मंडेला यांच्या मागील दुसऱ्या फळीमध्ये अग्रणी होते. या डेस्मंड टुटू यांचे रविवारी नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर त्यांच्याशी शत्रुत्व घेण्याची काही गरजच उरत नाही,’ अशी भूमिका महात्मा गांधी यांनी स्वातंर्त्यलढय़ाच्या उत्तरार्धात घेतली होती. याच सूडबुद्धीविरोधी तत्त्वाचा अंगीकार टुटू यांनी केला. दक्षिण आफ्रिकेतील मूठभर गोऱ्या सत्ताधीशांच्या वर्णद्वेष्टय़ा धोरणांच्या विरोधात त्यांनी प्रखर लढा दिला. पण आपला संघर्ष हा वर्णद्वेषी वृत्तीविरोधात आहे, मूठभर गोऱ्यांविरोधात नाही याचे भान त्यांनी राखलेच, शिवाय विविध व्यासपीठांवर तशी भूमिकाही घेतली. वांशिक, वर्णीय संघर्षांमध्ये अशी नेमस्त भूमिका घेणारे चटकन लोकप्रिय होत नाहीत. काही वेळा त्यांच्या हेतूंविषयीदेखील शंका घेतल्या जातात. डेस्मंड टुटू हे धर्मोपदेशक होते. ते ‘गोऱ्या मिशनऱ्यांची’ भाषा तर बोलत नाहीत ना अशी शंका दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य गौरेतर समाजातील काहींनी व्यक्त केलीच. परंतु महात्मा गांधींप्रमाणेच डेस्मंड टुटू यांनीही तळागाळापर्यंत लढा झिरपवण्यासाठी धर्मातील मानवतावादी तत्त्वांचा आधार घेतला. दक्षिण आफ्रिकेतील चर्च परिषदेचे अध्यक्ष आणि नंतर केपटाऊन अँग्लिकन चर्चचे आर्चबिशप या भूमिकेतून त्यांनी वर्णद्वेषी लढय़ाला चर्चचे पाठबळ दिले. पापक्षालनाची संधी आणि न्यायदानात सूडबुद्धी आणू न देणे ही तत्त्वे डेस्मंड टुटू यांनी कटाक्षाने पाळली.    दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय आर्चबिशप ठरलेले टुटू यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये 7 ऑक्टोबर 1931 रोजी क्लेरकसोर्प येथे झाला. धर्माच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आधी ते काही काळ शिक्षक होते. प्रेमळ वृत्ती आणि धार्मिक तत्त्वचिंतनाचा अभ्यास यांतून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. नैतिकतेची आणि सत्याची कास त्यांनी सोडली नाही. वर्णद्वेषाच्या विरोधातील लढ्याला त्यांनी अहिंसक स्वरूप दिले. या भूमिकेमुळे १९८४मध्ये त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. नव्वदच्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी संघर्षाला यश आले; परंतु अन्यायाच्या विरोधातील टुटू यांचा लढा कायम राहिला. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर आणि अन्यायावर प्रहार करण्याचे काम त्यांनी कधीही सोडले नाही. प्रदीर्घ लढ्यानंतर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षस्थानी आले, तरी टुटू यांचे काम थांबले नाही. मंडेला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही, त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर टीका करताना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. गरिबीच्या विरोधात आणि एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यात पुरेशी पावले उचलत नसल्याबद्दल टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष थाबो एम्बिकी यांच्या विरोधात भूमिका घेतली. झिम्बाब्वेमधील अत्याचारांच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेने आवाज उठवावा, अशी भूमिकाही त्यांनी कायम घेतली. एम्बिकी यांच्यानंतर अध्यक्ष बनलेले जेकब झुमा यांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधी लढ्यातील अग्रणी असलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे 26 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment