Wednesday 21 November 2018

जलजन्य आजाराने राज्यात 49 जणांचा बळी

२०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीदेखील या आजारांवर नियंत्रण आणल्याचा दावा आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आला आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांमुळे राज्यात ४९ बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाकडे विचारणा केली होती. २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांची किती जणांना लागण झाली, या आजारांमुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला, आजारांवर नियंत्रणासाठी किती औषधांची खरेदी झाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार साडेतीन वर्षांच्या कालावधीत राज्यात २१ हजार १४० नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली. यातील ४९ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये लागण झालेल्यांची संख्या ५ हजार १७५ इतकी होती. २०१६ मध्ये हा आकडा ६ हजार १२ वर पोहोचला तर तर २०१७ मध्ये ८ हजार ५४९ जणांना लागण झाली. २०१८ मध्ये जुलै महिन्यापर्यंत १ हजार ४०४ जणांना हे आजार झाले आहेत.
२०१५ पासून दरवर्षी सातत्याने संख्या वाढल्याचे दिसून आले. तर २०१८ मधील पावसाळ््यातील आकडेवारी देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत सर्वच आजारांवर नियंत्रण आल्याचा आरोग्य सेवा संचालनालयाचा दावा विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.

‘गॅस्ट्रो’चा ज्वर ठरतोय धोकादायक
२०१५ सालापासून ‘कॉलरा’, अतिसार, विषमज्वर यांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ‘गॅस्ट्रो’ हा सर्वाधिक धोकादायक ठरतो आहे. साडेतीन वर्षांत ९ हजार ८२२ नागरिकांना याची लागण झाली व २६ नागरिकांचा बळी गेला. ९ हजार ४० नागरिकांना अतिसाराची लागण झाली व १० जणांचा जीव गेला.

No comments:

Post a Comment