Saturday 24 November 2018

मेरी कोमला सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद


नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे. या विजेतेपदासह मेरी कोमने क्युबाचा बॉक्सर फेलिक्स सेव्हॉनच्या 6 विजेतेपदांच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत युक्रेनच्या हॅना ओखोता हिला नमवित सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावणार्या मेरी कोमवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेकांनी मेरी कोमचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत मेरी कोमचे अभिनंदन केले आहे. भारतीय खेळांसाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत चॅम्पियन बनलेल्या मेरी कोमला खूप सार्या शुभेच्छा. तिनं ज्या कठीण प्रसंगातून हा विजय मिळवला आहे. तो खरोखरच प्रेरणादायक आहे. तिचा हा विजय खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला मेरी कोमने उत्तर देत पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांसह क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही मेरी कोमचे कौतुक केले आहे. पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोटोला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसर्या फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसर्या फेरीदरम्यान ओखोटोने मेरीला खालीही पाडलं, मात्र यामधून सावरत मेरीने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. तिसर्या सत्रामध्ये ओखोटोने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरी कोमला चांगलचं जेरीस आणलं. मात्र मेरीने सामन्यावरचं आपलं नियंत्रण कायम ठेवलं.

No comments:

Post a Comment