Thursday 11 November 2021

अशी झाली 'बालदिना'ची सुरुवात


आजची मुले उद्याचे भविष्य आहेत.  आणि तेच भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्व यावे, यासाठी 'बालदिन' म्हणजेच 'चिल्ड्स- डे' साजरा करण्याचे ठरले. भारतात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी 'बाल दिन' साजरा केला जातो. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात बालदिन साजरा केला जातो. पहिल्यांदा 'आंतरराष्ट्रीय बाल दिन' साजरा करण्याची कल्पना 1857 मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील डॉक्टर चार्ल्स लिओनार्ड यांना सुचली. त्यांनी ठरवलं की जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करायचा.  त्याला त्यांनी 'रोझ-डे' असे नाव दिले. नंतर त्याचे नाव 'फ्लॉवर-डे' ठेवण्यात आलं आणि शेवटी 'बालदिन' असे नामकरण झाले.

लहान मुलांसाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणारा तुर्की प्रजासत्ताक हा पहिला देश ठरला. फार पूर्वी 1920 मध्ये त्यांनी 23 एप्रिल हा बालदिन म्हणून घोषित केला.  यानंतर 1925 मध्ये जिनेव्हा येथे पहिल्यांदाच संपूर्ण जगासाठी बालदिन निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील 'वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन चाइल्ड वेल्फेअर' या कार्यक्रमात तसा प्रस्ताव ठेवण्यात आला.  त्यानंतर 4 नोव्हेंबर 1949 रोजी रशियातील वुमन्स इंटरनॅशनल डेमोक्रॅटिक फेडरेशनने ठरवले की 1 जून हा दिवस 'मुलांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जाईल.  तेव्हापासून, बहुतेक कम्युनिस्ट देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

1954 मध्ये पहिल्यांदाच युनायटेड किंग्डमने जगातील सर्व देशांमध्ये एकाच दिवशी एकत्रितपणे 'बालदिन' साजरा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी 20 नोव्हेंबर 1959 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने  'डिक्लेरेशन ऑफ द राइट्स ऑफ द चाइल्ड'  चा स्वीकार केला आणि दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी 'जागतिक बालदिन' साजरा केला जातो. असे सर्व असूनही अजूनही बहुतेक  देश स्वतःचा बालदिन साजरा करतात, जसे की न्यूझीलंडमध्ये मार्चच्या पहिल्या रविवारी आणि जपानमध्ये 5 मे रोजी बालदिन साजरा केला जातो. आजही 50 हून अधिक देश 1 जून रोजी बालदिन साजरा करतात. यापैकी अमेरिका हे पुढारलेले राष्ट्र दरवर्षी जूनच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांवर खूप प्रेम करत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी देशभर 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment