Monday 8 November 2021

प्राजक्ता अदमाने:आधुनिक तंत्राचा वापर करून मध संकलन करणारी उद्योजिका


गडचिरोलीच्या प्राजक्ता अदमाने-कारू हिचा उल्लेख "मधकन्या'असा केला जातो. ती आता उद्योजक म्हणून पुढे आली आहे. 'कस्तुरी' या नावाने ती मध विकते.  आधुनिक तंत्राचा वापर करून मध गोळा केला जातो. यामुळे मधमाशांना इजा पोहचत नाही. निसर्गाचे नुकसानही होत नाही. याचे प्रशिक्षणही प्राजक्ता इतरांना देते. तिने निसर्गप्रेम व उद्योग या दोन्हींचा संगम साधत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मधमाश्यांचं पोळं जाळून किंवा तोडून मध मिळवण्याऐवजी आधुनिक तंत्राने मधमाश्या पाळून, त्यांच्या माध्यमातून मध व इतर उत्पादन घेण्याची पद्धत त्यांनी स्थानिकांसमोर खुली केली. अदमाने म्हणाल्या, “गडचिरोलीच्या वैविध्यसंपन्न वनांमध्ये वावरत मी लहानाची मोठी झाले. नक्षलग्रस्त मागास भाग असल्याने अजूनही येथे उच्च शिक्षणाच्या सोयी नाहीत. त्यासाठी लोक बारावीनंतर नागपूर किंवा पुण्याला जातात. मी नागपुरात राहून फार्मसीचं शिक्षण घेतलं. काही काळ नोकरी केली. मग एमबीए करून पुण्यात पाच वर्षे नोकरी केली; पण निसर्गाशी जोडून घेऊन आपला स्वतःचा एखादा उद्योग-व्यवसाय असावा, हे प्रकर्षाने वाटत होतं. मधमाशीपालनाचं आधुनिक तंत्र तोपर्यंत माहीत झालं होतं. त्या संदर्भात मी वडिलांशी चर्चा केली. उत्तम पगाराची नोकरी सोडून मधमाशी पालनासंबंधी प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केलं. या घटनेआधी मी जंगलात फिरताना जागोजागी झाडांवर मधमाश्यांची पोळी पहायचे. ती जाळून किंवा पाडून स्थानिक आदिवासी मध मिळवायचे, हेही माहीत होतं, पण याने निसर्गाची हानी होते, हे ज्ञान मला नव्या अभ्यासातून कळलं होतं. मधमाश्या वनस्पतींच्या परागीभवनात फार मोठी भूमिका बजावतात, त्या नष्ट झाल्या तर जंगलं जगणार नाहीत. मधमाश्यापालन विशिष्ट पेट्यांमधून करण्याच्या पद्धतीमुळे मधमाश्यांना हानी पोहचत नाही. मध व मेण तसंच पराग आदी इतर उत्पादनही मिळवता येतात. या नव्या पद्धतीने मी मधमाश्या पालन करायचं ठरवलं." अदमाने यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रात अशा त-हेने मधमाशीपालन अजून बाल्यावस्थेत आहे. हरियाना व राजस्थान या राज्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर असल्याने मी तेथे वरचेवर जाऊन, अनुभवींकडून शिकून घेतलं. वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलोऱ्यांवर मधमाश्या कशा प्रकारे काम करतात, फुलोरा संपल्यावर दुसऱ्या जागच्या फुलोरा शोधत कशा स्थलांतर करतात वगैरे लक्षात घेऊन मधुमक्षिका पालकांसाठी एक वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यात येते. यासंबंधी राष्ट्रीय पातळीवरील मंडळामार्फत असे मार्गदर्शक प्रयत्न केले जातात. संबंधित यंत्रणांकडून मला मिळालेल्या अनुदानातून मी दीडशे पेट्या घेतल्या. सुरुवातीला बाहेरच्या राज्यांतील मजूर आणले. हळूहळू स्थानिकांना सर्व माहिती करून दिली. खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे मधमाशी पालनासंदर्भात चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी मी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करते. खादी ग्रामोद्योग महामंडळासाठी अकरा जिल्ह्यांमध्ये मी पुरवठादार आहे. पोळ्यांमधून मिळणाऱ्या मधाबरोबरच मेण व पराग आदी उत्पादनही आम्ही विकतो. या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात माझी कुचेष्टा करणारे कित्येकजण आता मार्गदर्शन घ्यायला येतात. सन्मानपूर्वक आता माझा उल्लेख 'मधकन्या' म्हणून केला जातो. गडचिरोलीतलं माहेर आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावी सासर, या दोन्ही ठिकाणी मधमाश्यांच्या कृपेने माझी ये-जा सतत चाललेली असते.


No comments:

Post a Comment