Thursday 19 May 2022

जगातील सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात!


वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. दुर्गादेवीचे वाहन म्हणून सन्मान मिळालेला हा रुबाबदार वाघ आपल्या देशात वाघ, व्याघ्र, टायगर, बाघ, पूली, कडुवा व हुली आदी नावांनी विविध भाषांमध्ये ओळखला जातो. जगात वाघाच्या (पँथेरा टायग्रीस) सहा उपजाती अस्तित्वात आहेत. भारतीय (बंगाल), सायबेरियन, इंडो-चायनीज, मलायन, दक्षिण चिनी व सुमात्रन या जाती सध्या अस्तित्वात आहेत तर कॅस्पियन, जावन व बालिनीज जाती नष्ट झाल्या आहेत. भारतात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ,गोवा आणि केरळ राज्यांमध्ये वाघ आहेत.

 जगातील सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत.

गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे. व्याघ्र संरक्षण प्रकल्पांच्या निर्मितीमुळे चांगला अधिवास उपलब्ध  झाल्याने वाघांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मध्य प्रदेशानंतर, कर्नाटक, उत्तराखंड आणि नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे. व्याघ्र प्रकल्पानुसार ताडोबा हा आठव्या क्रमांकावर आहे. वाघांच्या मृत्यूचा विचार केल्यास सर्वांत जास्त वाघ हे नैसर्गिक कारणामुळे

मरतात. त्यानंतर अपघात आणि शिकारीमुळे वाघांचा मृत्यू होतो. देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रात बोर, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, पेंच, सह्याद्री आणि ताडोबा असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांपेक्षा ताडोबात सर्वाधिक दोनशेहून अधिक वाघ आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर व्याघ्र प्रकल्पाबाहेर जास्त वाघ आहेत. गडचिरोली येथे पूर्वी एकही वाघ नव्हता, तिथे आता. वीसच्या वर वाघ आहेत. तिथेही वाघांच्या मानवावरील हल्ल्यात वाढ होत आहे. २०१८ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात वाघांची संख्या २ हजार ९६७ आहे. सर्वाधिक ५२६ वाघ हे मध्यप्रदेशात आहेत, कर्नाटकात ५२४, उत्तराखंडात ४४२ आणि महाराष्ट्रात ३१२ वाघ आहेत. दरवर्षी वाघांची संख्या सहा टक्के दराने वाढते आहे; परंतु गेल्या दोन वर्षात ही संख्या जास्त वाढली असून, देशांत तीन हजारांहून अधिक वाघ आहेत, तर महाराष्ट्रात तीनशेहून अधिक वाघ आहेत. त्यापैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक आहेत. हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment