Sunday 29 May 2022

अभिनयाचे मूर्तिमंत उदाहरण :नर्गिस


हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट केवळ अभिनेत्यांच्या जोरावरच चालतात हा प्रेक्षक आणि निर्माता-दिग्दर्शकांचा समज दूर केला, त्या अभिनेत्रींमध्ये नर्गिस आघाडीवर आहे, 'मदर इंडिया' चित्रपटातील अभिनयाच्या बळावर तिने सिद्ध केले की, अभिनेत्रीच्या बळावरही चित्रपट यशस्वी होऊ शकतात.  पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कनिष्ठ समजले जायचे.  पण नर्गिसने हे स्थान बदलून टाकले. 1 जून 1929 रोजी जन्मलेल्या नर्गिसचे खरे नाव फातिमा अब्दुल रशीद होते.  नर्गिसचे वडील उत्तमचंद मूलचंद हे रावळपिंडीचे समृद्ध हिंदू होते आणि आई जद्दनबाई हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या.  नर्गिसची आई भारतीय चित्रपटसृष्टीशी सक्रियपणे जोडली गेलेली होती.  ती तिच्या काळात यशस्वी गायिका, नर्तक, दिग्दर्शक, संगीतकार आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती.

नर्गिसची चित्रपटांशी ओळख तिच्या आईने करून दिली.  वयाच्या सहाव्या वर्षी नर्गिसने चित्रपटात काम करायला सुरुवात केली.  1935 मध्ये प्रदर्शित झालेला 'तलाश-ए-हक' हा तिचा पहिला चित्रपट होता.  या चित्रपटाच्या निमित्ताने तिचे नाव बेबी नर्गिस ठेवण्यात आले होते.  वयाच्या चौदाव्या वर्षी, दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या 'तकदीर' या चित्रपटात पहिल्यांदा तिची  नायिका म्हणून निवड झाली. या चित्रपटात तिचा नायक मोतीलाल होता. त्यानंतर तीन दशके तिचा चित्रपट प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला.  'मदर इंडिया', 'श्री 420', 'बरसात' इत्यादींसह तिचे अनेक चित्रपट खूप लोकप्रिय ठरले.  या चित्रपटांशिवाय अंदाज, अनहोनी, जोगन, आवरा, रात और दिन, अदालत, घर संसार, लाजवंती, परदेशी, चोरी चोरी, जागते रहो, अंगारे, आह, धुन, पापी, शकस्त, अंबर, आशियाना हे चित्रपट केले आहेत. बेवफा, शीशा, दीदार, हलचल, प्यार की बातें, सागर, आधी रात, बाबुल या चित्रपटांतूनही तिने आपली क्षमता सिद्ध केली.

साठच्या दशकात ती सतत आजारी पडू लागली, त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये फार कमी काम करता आले.  या काळातील तिचा चित्रपट 'रात और दिन' (1967), ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.  'मदर इंडिया'ला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.'मदर इंडिया'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता सुनील दत्तने तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, जो तिने सहज स्वीकारला होता.  मात्र, त्या चित्रपटात सुनील दत्तने नर्गिसच्या मुलाची भूमिका केली होती.  11 मार्च 1958 रोजी नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला अलविदा केला.  3 मे 1981 रोजी वयाच्या 51 व्या वर्षी नर्गिसचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. तिच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली

 नर्गिसने अभिनेत्रीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अधिक काम केले.  अंध आणि विशेष मुलांसाठी तिने काम केले.  ती भारतातील पहिल्या 'स्पास्टिक्स सोसायटी'ची संरक्षक बनली. तिने अजिंठा कला सांस्कृतिक दलाची स्थापना केली, ज्यामध्ये तत्कालीन प्रसिद्ध कलाकार-गायक सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना प्रोत्साहन देत, त्यांचे मनोरंजन करत.  बांगलादेशच्या निर्मितीनंतर, 1971 मध्ये त्यांच्या टीमने तेथे काम केले होते. पद्मश्री पुरस्कार मिळालेली नर्गिस ही पहिली अभिनेत्री होती.  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारीही ती पहिली अभिनेत्री होती.  मुंबईत वांद्रे येथे त्यांच्या नावावर एक मार्ग (रस्ता) आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला नर्गिस दत्त या नावाने दरवर्षी पुरस्कार  दिला जातो.  नर्गिस दत्त 1980 मध्ये राज्यसभेच्या सदस्यही होत्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment