Wednesday 2 June 2021

जगातील सर्वात उंच पुतळे

मुलांनो,जगात पाहण्यासारखं खूप काही आहे. त्यात सर्वात उंच,भव्यदिव्य अशा पुतळ्यांचाही समावेश आहे. हे पुतळे पाहून तुम्ही दंग होऊन जाल. आता आपण जगातल्या सर्वात उंच अशा पाच पुतळ्यांची माहिती करून घेणार आहोत. 


स्टेच्यू ऑफ यूनिटी, भारत: जगातला सर्वात उंच पुतळा आपल्या भारतात आहे. हा भव्यदिव्य पुतळा गुजरात राज्यात नर्मदा नदीच्या किनारी आणि सरदार सरोवराच्या बांधाजवळच्या साधू बेटावर उभारण्यात आला आहे. हा पुतळा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. याची उंची 597 फूट (182 मीटर) आहे. तर चबुतऱ्यासह एकूण उंची 787 फूट आहे. ब्राँझपासून बनवण्यात आलेला हा पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी सरकारला असून जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद झाली आहे.


स्प्रिंग टेंपल बुद्धा, चीन: जगातला दुसरा सर्वात उंच पुतळा चीनमधील हेनान प्रांतातल्या लुशान कौंटी डोंगरावर साकारण्यात आला आहे. या भगवान बुद्ध्यांच्या पुतळ्याखाली बौद्ध मठ आहे. याची उंची 502 फूट (153 मीटर) असून 63 फूट उंच अशा कमळ फुलाच्या चबुतऱ्यावर हा पुतळा उभा आहे. पुतळ्याची निर्मिती 1 सप्टेंबर 2008 रोजी पूर्ण झाली. पुतळ्याजवळ जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून पुतळ्याचे वजन एक हजार टन आहे.


लॅक्युन सेक्या, म्यानमारः जगातला तिसरा सर्वात उंच पुतळा आपल्या शेजारील मान्यमार देशात आहे. भगवान बुद्धांचा हा पुतळा 31 मजल्यांचा असून याची उंची 380 फूट (129 मीटर) आहे. पुतळ्यावर बौद्ध साहित्याप्रमाणे 31 जीवनशैलीच्या 31 रेषाकृती साकारण्यात आल्या आहेत. हा पुतळादेखील 44 फुटाच्या कमळ फुलावर उभा आहे. याची निर्मिती 21फेब्रुवारी 2008  रोजी पूर्ण झाली. अनेक मजल्यांचा हा पुतळा पाहण्यासाठी लिफ़्टची सोय करण्यात आली आहे. 


उशिकु दाइबुत्सु, जपान : जगातील चौथा सर्वात उंच पुतळा भगवान बुद्धांचा आहे.  जपानमधल्या इबाराकी प्रांतातल्या उशिकू येथे हा पुतळा साकारण्यात आला असून याची उंची 330 फूट (116 मीटर) आहे. 33 फूट कमळ फुलाच्या आकाराच्या चबुतऱ्यावर हा पुतळा उभा आहे. ब्रांधपासून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची 1993 ते 2008 पर्यंत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून नोंद होती. 280 फुटांवर जाऊन हा पुतळा पर्यटकांना पाहता येतो. 


सेंडाई डिकेनन, जपान: जगताला पाचवा सर्वात उंच पुतळा सेंडाई येथे उभारण्यात आला आहे. हा पुतळा 1 सप्टेंबर 1991 रोजी पूर्ण करण्यात आला. जपानमधील पूजनीय देवी न्योयरिन कन्नॉनचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची 330 फूट (100 मीटर) असून पर्यटकांना पुतळ्याच्या आत असलेल्या लिफ़्टच्या मदतीने 12 व्या मजल्यापर्यंत जाता येते. हा पुतळा पूर्ण पांढऱ्या रंगाचा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment