Saturday 19 June 2021

छोटे संशोधक

मुलांनो, तुम्ही शाळेत मोठ्या शास्त्रज्ञांनी विविध शोध लावल्याचे वाचलं असालच. वाफेच्या इंजिनाचा शोध, बल्बचा शोध, गुरुत्वाकर्षणचा शोध अशा अनेक शोध लावणाऱ्या संशोधकांविषयी म्हणजेच शास्त्रज्ञांविषयी तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेलच. पण तुमच्या वयाच्या मुलांनीही काही शोध लावलेत बरं का. अशाच छोट्या संशोधकांविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे बालसंशोधक भारतातलेच आहेत बरं का!


रिफथ शारूक

तामिळनाडू राज्यातील करूर गावात राहणाऱ्या रिफथ शारुकला इंटरनेटच्या माध्यमातून समजलं की, जगातील सर्वात छोटे सॅटेलाईट बनवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मग काय, रिफथनेदेखील या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले. त्याने त्याच्या शाळेतील शिक्षक आणि मित्रांच्या मदतीने जगातील सर्वात छोटे सॅटेलाईट बनवले.त्याने जे सॅटेलाईट बनवले त्याला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले. हे सॅटेलाईट 3.8 सेंटीमीटर लांब आणि 64 ग्रॅम वजनाचे होते. हे जगातील सर्वात छोटे 3 डी प्रेटेड टेक्नोलॉजिक डेमोंस्ट्रेटिव सॅटेलाइट आहे. याला 'नासा'ने साउडिंग रॉकेटद्वारा अवकाशात पाठवले आहे. रिफथ शारुकच्या टीममध्ये तनिष्क द्विवेदी, यग्नासाई, अब्दुल कासिफ, गोबिनाथ या छोट्या मित्रांचाही समावेश होता.


अनंग तादर

अरुणाचल प्रदेशातल्या अनंग तादर याने एक असा चष्मा बनवला आहे की,ज्यामुळे दृष्टिहीन लोक रस्त्याने जाताना विनाअडथळा चालू शकतात. अनंग तादर पाहत होता  की, दृष्टिहीन माणसं चालताना कशाला ना कशाला तरी धडकत असत. त्यामुळे ते पडायचे, जखमी व्हायचे. एकट्याने चालणे  धोकादायक असते. दृष्टिहीन म्हणजेच अंध लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी त्याने चष्म्यामध्ये इकोलोकेशन टेक्नोलॉजीचा वापर केला. वटवाघळेदेखील इकोलोकेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. वटवाघळे तोंडाने मोठ्याने आवाजात काढतात, ते ध्वनी समोर असलेल्या एकाद्या वस्तूवर धडकून माघारी येतात व ते त्यांना ऐकायला येतात. वटवाघळे उडताना समोरच्या वस्तूला धडकण्यापूर्वी सावध होतात. असेच तंत्रज्ञान चष्म्यात वापरण्यात आले आहे. चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीला कळतं की, समोर काहीतरी आहे. हा चष्मा अंध व्यक्तींना फारच उपयोगाचा ठरला आहे.


श्रेयस किशोर-प्रांशु मलिक

दिल्लीत राहणाऱ्या श्रेयस किशोर आणि प्रांशु मलिक यांनी काही वर्षांपूर्वी एक असे डिव्हाइस बनवले होते की, त्यामुळे वायूप्रदूषण कमी केले जाऊ शकते. राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आहे. या दोघा मुलांनी ट्रॅफिक एंड एमिशन कंट्रोल सिस्टम नावाचे गॅझेट बनवले. ट्रेसी एक एमिशन सेंसिंग, लोकेशन ट्रॅकिंग आणि नेविगेटिंग डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस बनवण्याचा उद्देश असा की, शहरातील प्रदूषणाच्या स्तराचे विश्लेषण करून ते प्रदूषण कमी करायला मदत करतात. श्रेयस आणि प्रांशू यांनी बारावीत शिकत असताना हे डिव्हाइस बनवले होते. त्यांच्या टीममध्ये आदित्य सेनगुप्ता, दानिश बंसल आणि तन्मय बंसल हे त्यांचे मित्रदेखील सामील होते. मुलांनो, या मुलांप्रमाणेच तुमच्याही डोक्यात एखाद्या आविष्काराची आयडिया असेल तर त्यावर मन लावून काम करा. काय माहीत! तुमच्याकडूनही एकादा आविष्कार घडून जाईल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment