Thursday 3 June 2021

आदिवासी सीमा कुमारीला मिळाला हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश


रांचीपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओरमांझी तालुक्यातल्या दाहो गावच्या सीमा कुमारी या आदिवासी मुलीने इतिहास रचला आहे. प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध असलेल्या हार्वर्ड यूनिवर्सिटीत तिला वेतनासह प्रवेश मिळाला आहे. ती तिथे चार वर्षे राहून पदवीचा अभ्यास करणार आहे. ती नॅशनल स्कूल ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) मध्ये शिक्षण घेत होती. आता बारावी उत्तीर्ण झाली आहे.

सीमाच्या वडिलांचे म्हणजेच सिकंदर महातो (44) यांचे फक्त दुसरीपर्यंत तर आई सरस्वतीदेवी (40) यांचे पाहिलीपर्यंत शिक्षण झाले आहे. सीमा गावातल्या सरकारी प्राथमिक शिकली आहे. नंतर ती एका स्वयंसेवी संस्थेशी जोडली गेली. याच संस्थेने तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली. 'युवा' नावाच्या या संस्थेमध्ये एनआयओएसच्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाते. सीमाच्या म्हणण्यानुसार तिने हार्वर्ड विद्यापीठाच्या वेतन आणि प्रवेशासाठी गेल्या वर्षीच अर्ज केला होता. यानंतर तिची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत काम, शिक्षण, संस्थेतील भूमिका ,येणाऱ्या काळात तिला काय करायचं आहे, यासारखे काही प्रश्न विचारण्यात आले. काही निबंध लिहून घेण्यात आले. तसेच तिला कौटुंबिक पार्श्वभूमीविषयही प्रश्न विचारण्यात आले.

सीमाने हार्वर्डशिवाय यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया, कोलंबिया आणि प्रिंस्टनसाठीदेखील आवेदन फार्म भरले होते. तिच्या घरच्यांना मात्र एवढंच कळलं आहे की, आपल्या सीमाला अमेरिकेतल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. घरच्यांना याचा खास काही आनंद झालेला नाही,कारण त्यांना हार्वर्डबाबत काहीच माहिती नाही. तिचे आईवडील चांगले शिकले असते तर त्यांना त्याचे महत्त्व कळाले असते.

सीमाच्या कुटुंबात तिचे आई-वडील, मोठा भाऊ, सहा बहिणी आणि आजी, चुलते-चुलती,त्यांची मुले इत्यादी आहेत. वडील पूर्वी धागे बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते. टाळेबंदीमुळे त्यांचे काम सुटले. आता ते एका बेकरीत काम करतात. महिन्याला सात हजार रुपये कमावतात. थोडी शेती आहे,ज्यात भात, भाजीपाला पिकतो. 

सीमाने एकदा गावात मुलींना फुटबॉल खेळताना पाहिले. आईने तिलाही फुटबॉल खेळायला परवानगी दिली. युवा नावाची स्वयंसेवी संघटना फुटबॉल शिबिर चालवत होती. ती त्या संस्थेशी जोडली गेली.  त्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. इंग्रजीवर जास्त मेहनत घेतली गेली.सीमा स्पेनला जाऊन फुटबॉलदेखील खेळून आली. सीमाच्या म्हणण्यानुसार, तिच्या गावात तिच्यासह अन्य आदिवासी घरांमध्ये हंडीया (भातापासून बनवलेली गावठी दारू)बनवून ती विकली जाते.त्यामुळे थोडे अधिक पैसे मिळतात.

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विट करून मुलीला शिकवा, ती जग बदलू शकते. ही एक मोठी प्रेरणा देणारी घटना आहे,असं म्हटलं आहे. सीमा म्हणते, मी इन्स्टाग्राम, ट्विटरवर प्रियांकाची पोस्ट वाचली. पहिल्यांदा तर मला विश्वासच बसत नव्हता. मी त्यांच्या व अन्य लोकांच्या आशेचा आदर करते आणि पूर्ण मेहनत घेते. तिला शिक्षण झाल्यावर भारतात परत यायचं आहे. महिलांच्या सशक्तीकरण, विकासाबरोबरच मुलांसाठी,स्त्रियांसाठी काम करायचं आहे. त्यांच्यासाठी खास पुस्तकं लिहायची आहेत. सीमाला बायोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षा किरण मुजुमदार यांनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment