Sunday 13 June 2021

जगातील सर्वात छोटे प्राणी


या जगात असंख्य लहान-मोठे जीव-जंतू आहेत. अद्याप काहींचा शोध लागला आहे, काहींचा नाही, पण शोध-संशोधन सुरूच आहेत. या जगातले डायनोसॉरसारखे अनेक भलेमोठे आणि भयंकर जीव लुप्त झाले आहेत. हत्ती,जिराफ, उंट असे प्राणी पाहायला मिळतातच,तसेच सामान्य आकारात असलेला ससा, माकड,कासव, हमिंगबर्ड,वटवाघूळ, चिचुंद्री, साप,मासा आणि बेडूक इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. परंतु या जगात सर्वात छोटेही प्राणी आहेत. जे मुलांच्या किंवा मोठयांच्याही पाहण्यात आढळून आले नाहीत. अशाच प्राण्यांविषयी जाणून घेऊया.

पिग्मी रॅबिटः पिग्मी रॅबिट ही जगातील सर्वात लहान अशा सश्याची प्रजाती आहे. याच्या शरीराची लांबी 23.5 ते 29.5 सेंमी दरम्यान असते तर वजन 375 ते 500 ग्रॅम असते. हा ससा उत्तर अमेरिका महाद्वीपच्या ग्रेट बेसिन आणि मोटाना क्षेत्रात आढळून येतो. पिग्मी रॅबिट हा मोठ्या माणसाच्या दोन्ही ओंजळीत आरामात सामावू शकतो. 

पिग्मी मार्मोसेट: ही माकडाची सर्वात छोटी प्रजाती आहे. याच्या शरीराची लांबी 4.75 ते 6 इंच आणि वजन 3.53 ते 4 औंस (अडीच तोळा) दरम्यान असते.पिग्मी मार्मोसेट हवेत पंधरा फुटापर्यंत उडी मारू शकतो. तो डोके 180 डिग्रीपर्यंत फिरवू शकतो. ब्राझील, पेरू,कोलंबिया आणि इक्वाडोर देशांमध्ये आढळून येणारी ही माकडाची प्रजाती आपले  बहुतांश आयुष्य झाडावरच घालवते.

एट्रस्कॅन श्रूः श्रूला मराठीत चिचुंद्री म्हणतात. याला एट्रस्कॅन पिग्मी श्रू आणि पांढऱ्या दातांचा पिग्मी श्रू असेही म्हणतात. याच्या शरीराचे वजन 1.2 ते 2.7 ग्रॅम असते. वजनाच्या हिशोबानुसार हा जगातला सर्वात छोटा सस्तनप्राणी आहे. याच्या मेंदूचे वजन शरीराच्या तुलनेने अधिक असते. 

 स्पेकल्ड पॅडलोपर टोर्टोइज: ही कासवाची सर्वात लहान प्रजाती आहे. या प्रजातीच्या शरीराची लांबी 6 ते 8 सेंटीमीटर असते. याची मादी नराच्या तुलनेत थोडी मोठी असते.स्पेकल्ड पॅडलोपर टोर्टोइज जगात केवळ दक्षिण अमेरिका खंडामध्ये सापडते.

बी हमिंग बर्डः याला जुंगँसिटो किंवा हेलेना हमिंग बर्ड या नावानेदेखील ओळखले जाते.  हमिंग बर्डची ही सर्वात लहान प्रजाती आहे. शिवाय हा जगातील सर्वात छोटा पक्षी आहे. याच्या शरीराची लांबी 5.7 सेंटीमीटर तर वजन अंदाजे 1.8 ग्रॅम असते.

किट्टीज हॉग-नोज बॅटः याला बंबल-बी (भुंगा) बॅट नावानेही ओळखले जाते,कारण याचे शरीर भुंग्याएवढेच असते. हे वटवाघूळ जगातील छोटे आहे.याच्या शरीराची लांबी 1.1 ते 1.6 इंच आणि वजन दीड ते दोन ग्रॅमदरम्यान असते. हे वटवाघूळ थायलंड आणि म्यानमार देशांमध्ये आढळते.

स्लेंडर ब्लाइंड स्नेक : याचे दुसरे नाव थ्रेड स्नेक असेही आहे. असे नाव पडण्याचे कारण म्हणजे हा दिसायला एखाद्या दोऱ्यासारखा दिसतो. आता हे सांगायची गरज नाही की, हा जगातला सर्वात छोट्या प्रजातीतला साप आहे. स्लेंडर ब्लाइंड स्नेकच्या शरीराची लांबी 11 सेंटीमीटर असते. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये  87 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.

पीडोसायप्रिस: हा छोट्या सायप्रिनिड माशांचा समूह आहे,जो इंडोनेशियाच्या सुमात्रा आणि बिंटन बेटांवर दलदली भागात आणि नद्यांमध्ये आढळतो. ही जगातील सर्वात छोट्या माशांची प्रजाती आहे. आतापर्यंत आकारामध्ये सर्वात छोट्या वयाच्या मादीची लांबी 7.9 मिमी आणि सर्वात मोठ्या वयाच्या माशाची लांबी 10.3मिमी इतकी आढळते.

एडोफ्रिन एमसिस: हा जगातील सर्वात छोट्या प्रजातीचा बेडूक आहे. याचा शोध 2009 साली न्यूगिनीमध्ये लावण्यात आला. याच्या शरीराचा आकार 7.7 मिमी आहे. हा सर्वात छोटा कशेरुक प्राणी (पाठीचा कणा वर्गातील) आहे. एका वयस्क माणसाच्या नखावर बसवल्यावरही हा खूप छोटा दिसतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment