Wednesday 5 January 2022

लोकेश राहुल : निलंबनापासून कर्णधारपदापर्यंतचा प्रवास


तीन वर्षांत निलंबनापासून कर्णधारपदापर्यंत प्रवास करणारा लोकेश राहुल आता भारतीय क्रिकेट विश्वातला एक चर्चित चेहरा बनला आहे.  त्याची सात वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली असली तरी त्याच्या कामगिरीची यादीही तशी मोठी आहे.  त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामुळे आता निवड समितीने त्याला संघाचे नेतृत्व बहाल केले आहे.

रोहित शर्मा पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नसल्याने राहुल आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहे.  आगामी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी पार्ल आणि केपटाऊन येथे खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघात आत -बाहेर करत राहिलेल्या राहुलच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट जानेवारी 2019 मध्ये आला, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याच्यावर 'काफी विथ करण' या चॅट शो मध्ये महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बंदी घालण्यात आली.  प्रशासकांच्या समितीने (सीओए) ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान स्थगिती दिली आणि त्याला मायदेशी परतावे लागले. 'सीओए'ने राहुल आणि पांड्यावरील निलंबन दोन आठवड्यांनी रद्द केले असले तरी त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडावे लागल्याने न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही. 18 एप्रिल 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या राहुलचे वडील के.एन. लोकेश आणि आई राजेश्वरी दोघेही प्रोफेसर आहेत, पण जेव्हा राहुलने वयाच्या 10 व्या वर्षी बॅट हाती घेतली तेव्हापासून क्रिकेट हेच त्याचे पहिले प्रेम बनले.

राहुलला 2010 च्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकात प्रथमच मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.  न्यूझीलंडमध्ये झालेली ही स्पर्धा भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली आणि संघ सहाव्या स्थानावर राहिला.  त्याच वर्षी राहुलने कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

राहुलने 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हरारे स्पोर्ट्स क्लब येथील पदार्पणाच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यातच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला.  सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डावात शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.  याच दौऱ्यात राहुलला टी-20 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचीही संधी मिळाली.  पदार्पणाच्या सामन्यात तो खाते उघडण्यात अयशस्वी ठरला, परंतु त्याने त्याच वर्षी 27 ऑगस्ट रोजी लेडरहिल, यूएसए येथे वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 110 धावांची खेळी केली, केवळ 20 आंतरराष्ट्रीय डावांत खेळाच्या तिन्ही प्रकारात त्याने शतके झळकावली.

माजी कर्णधार रविचंद्रन अश्विनने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रवेश केल्यानंतर राहुलला पंजाब संघाचा कर्णधार बनवण्यात आले.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 69 चेंडूत 132 धावा करून आयपीएलच्या या मोसमात भारतीय फलंदाजाच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावावर आहे.  या मोसमात 14 सामन्यांत त्याने 55.83 च्या सरासरीने पाच अर्धशतके आणि एका शतकासह 670 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकला.

तो म्हणतो, 'आपलं करिअर फार दीर्घ स्वरूपाचे नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.  मला 2019 नंतर समजले की माझ्याकडे कदाचित 12 किंवा 11 वर्षे शिल्लक आहेत आणि मला संघासाठी खेळण्यासाठी  माझा सर्व वेळ आणि शक्ती पणाला लावावी लागणार आहे.  मानसिकतेतील या बदलामुळे मला खूप मदत झाली. जेव्हा मी संघासाठी चांगले काम करण्याबरोबरच चॅम्पियन संघाचा एक भाग बनून खेळात बदल करण्यावर लक्ष केंद्रित केले तेव्हा माझ्यावरील दबाव कमी झाला.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment