Monday 17 January 2022

रॉकेट इंजिनिअरिंग विशेषतज्ज्ञ:एस. सोमनाथ


विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हिएसएस)चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमनाथ हे रॉकेट इंजिनीअरिंग आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये तज्ज्ञ आहेत. तसेच त्यांनी कामाच्या प्रारंभीच्या काळात 'पीएसएलव्ही'वर काम केले आहे.  सोमनाथ 22 जानेवारी 2018 पासून 'व्हीएसएससी'चे प्रमुख होते.  त्यांची आता के. सिवन यांच्या जागी इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम (केरळ) लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) च्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.  याव्यतिरिक्त त्यांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही)च्या एकत्रीकरणासाठीच्या टीमचे नेतृत्व केले आहे.  अंतराळात जड उपग्रह पाठवणाऱ्या जीएसएलव्ही एमके-3 च्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

एक काळ असा ओढवला होता की, जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) भारतात तयार होऊ शकत नव्हते आणि पाश्चात्य देशांनी त्यासाठीचे तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला होता. अशा मोठ्या कठीण परिस्थितीत एस. सोमनाथ यांच्या प्रयत्नांमुळे भारत जीएसएलव्ही तंत्रज्ञान आणि त्याची आधुनिक आवृत्ती तयार करू शकला.

 सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 मध्ये झाला.  त्यांनी कोल्लमच्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (इंडियन स्पेस इन्स्टिट्यूट), बंगलोरमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  1985 मध्ये ते व्हीएसएससीशी जोडले गेले.  ते जून 2010 ते 2014 पर्यंत जीएसएलव्ही एमके-3 चे प्रकल्प व्यवस्थापक होते.  सोमनाथ हे जीएसएलव्हीसारख्या वाहनांचे सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निकमध्ये तज्ज्ञ मानले जातात.

सोमनाथ यांच्या मते खासगी कंपन्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अंतराळ क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे आणि भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय अवकाश कार्यक्रमात बदल करण्याचीही गरज आहे.  अंतराळ बजेट सध्याच्या 15,000-16,000 कोटींवरून 20,000-50,000 कोटींपेक्षा जास्त करण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले, "अंतराळ बजेटमध्ये वाढ केवळ सरकारी निधी किंवा त्यांच्या पाठींब्याने होऊ शकत नाही, दूरसंचार सेवा आणि हवाई सेवा यांसारख्या क्षेत्रांत जसे बदल घडले तसे बदल या क्षेत्रातही व्हायला हवेत." यामुळे अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील आणि संशोधन आणि विकासात वृद्धी होऊ शकेल.

त्यांना सिनेमाची खूप आवड आहे. ते एकेकाळी तिरुवनंतपुरममधील फिल्म सोसायटीचे सदस्यही होते.  ते खूप चांगले वक्ते आहेत आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यानेही दिली आहेत.  त्यांच्या पत्नीचे नाव वलसाला असून त्या जीएसटी विभागात काम करतात.  त्यांना दोन मुले असून दोघांनीही अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment