Thursday 20 January 2022

प्रेरक घटना- भाषेवर प्रभुत्व


क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक शहरात झाला. त्यांच्या आईवडिलांना सहा मुली आणि आठ मुलगे होते.  सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नववे अपत्य आणि पाचवे पुत्र होते.  सुभाषचंद्र लहानपणापासूनच हुशार होते. बंगाली भाषा सोडली तर त्यांना सर्वच विषयात चांगले गुण मिळायचे. ते बंगाली भाषेत कच्चे होते. एके दिवशी भाषा शिक्षकांनी वर्गातल्या विद्यार्थ्यांना बंगालीमध्ये निबंध लिहायला सांगितला. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या निबंधाच्या तुलनेत बाल सुभाषच्या निबंधात अनेक त्रुटी निघाल्या. शिक्षकांनी वर्गातच या उणिवा सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी सुभाषची खिल्ली उडवली. वर्गातला एक मित्र सुभाषला म्हणाला,' तू मोठा देशभक्त असलास तरी तुझी मातृभाषेवरची पकड मात्र ढिली आहे.' 

त्या वर्गमित्राचं बोलणं बाल सुभाषच्या मनाला फार लागलं. आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला. मातृभाषेत सर्वाधिक गुण मिळवण्याचा चंग बांधला. तो झपाटून कामाला लागला. मातृभाषेचे बारकावे जाणून घेतले. व्याकरणाचा अभ्यास केला. काही दिवसांतच त्याने बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले.

 वार्षिक परीक्षा झाली तेव्हा सुभाष फक्त वर्गातच पहिला आला नाही तर मातृभाषेतही सर्वाधिक गुण मिळवले. हे पाहून वर्गातले सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. वर्गातल्या मित्रांना सुभाषकडून जाणून घ्यायचे होतं की हे त्याला कसे शक्य झाले?  तेव्हा बाळ सुभाष म्हणाला, ' कोणतेही काम कठोर परिश्रम, समर्पणवृत्तीने आणि एकाग्रतेने केल्यास सर्व काही शक्य आहे.' यातून आपल्याला हा धडा मिळतो की आपण कोणत्याही विषयात कमकुवत असलो तरी त्या विषयात स्वतःला पूर्ण झोकून दिल्यास आणि मेहनतीने अभ्यास केल्यास त्यात आपण प्रभुत्व मिळवू शकतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment