Friday 7 January 2022

जगातल्या अद्भुत गावांची ओळख

जगात पुतळ्यांचे असे एक गाव आहे, जिथे माणसांपेक्षा अधिक पुतळ्यांची संख्या आहे. त्याचबरोबर अशी काही गावे आहेत जी खणीत किंवा खड्ड्यात वसलेली आहेत. आता असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण  हे जगच असं अद्भुत आहे की इथे सर्व काही शक्य आहे. चला, जाणून घेऊया अशा काही गावांविषयी! 


नागोरो: पुतळ्यांचं गाव

रानातल्या पिकांच्या रक्षणासाठी, पक्षी आणि प्राण्यांना घाबरवण्यासाठी अनेकदा गावातील शेतात बुजगावणी (एक प्रकारचे पुतळे) उभी केली जातात.  पण जपानमध्ये एक असं पुतळ्यांचं गाव आहे, तिथे तुम्हाला सगळीकडे पुतळेच पुतळे दिसतील. या गावाचं  नाव आहे नागोरो. फार पूर्वी  या गावाची लोकसंख्या 300  होती. या गावातले बहुतेक लोक शहरात स्थायिक झाले होते.  त्सुकिमी अयानो नावाची एक स्त्री एकदा आपल्या वृद्ध वडिलांना भेटायला गावात आली. तेव्हा तिला गाव अगदी निर्जन दिसलं. एक दिवस त्सुकिमीने शेतात स्कॅरेक्रो (मानवासारखा दिसणारा जपानी पुतळा) बनवून उभा केला. गावकऱ्यांना वाटलं की  शेतात कुणीतरी माणूस उभा आहे.  यानंतर त्सुकिमीने गावातील उजाडपणा दूर करण्यासाठी आणखी काही पुतळे जागोजागी उभा केले. 35 च्या आसपास वृद्ध लोकसंख्या असलेल्या या गावात आज 350 हून अधिक पुतळे उभे केले गेले आहेत.  शेतात, गावातल्या रिकाम्या घरांजवळ, अंगणात, रस्त्यावर, बस स्टँडवर, किराणा दुकानासमोर, रस्त्यांच्या कडेला असे पुतळे (स्केअरक्रो) पाहायला मिळतात. याशिवाय शाळेमध्येही स्कॅरेक्रो म्हणजेच मुले आणि शिक्षकांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.  आज जपानमधील अनेक लोक आपल्या मुलांसह या अनोख्या पुतळ्याच्या गावाला भेट देण्यासाठी येतात. साहजिकच  मुले,पालक हे  पुतळे पाहून आनंदून जातात.


कूबर पेडी: खाणीमध्ये असलेले गाव

 गावे सहसा जमिनीवर किंवा डोंगर माथ्यावर वसलेली असतात.  पण जगात एक गाव असे आहे की जिथे लोक खाणीत राहतात.  ऑस्ट्रेलियात असलेल्या या अनोख्या गावाचे नाव कूबर पेडी आहे.  या गावात ओपल दगडाच्या खाणींची संख्या सर्वाधिक आहे.  म्हणूनच कूबर पेडीला 'जगातील ओपल कॅपिटल' म्हणूनही ओळखले जाते.  हे ठिकाण वाळवंटी क्षेत्रात येते. उन्हाळ्यात येथील तापमान खूप जास्त असते. अशा परिस्थितीत येथील रहिवासी रिकाम्या खाणीत राहतात.  कूबर पेडीची बहुतेक लोकसंख्या भूमिगत खाणींमध्ये राहते, कारण खाणीमध्ये बांधलेल्या घरांना उन्हाळ्यात एसीची गरज नसते आणि हिवाळ्यात हीटरची गरज नसते.  मैदानाच्या आत बांधलेल्या घरांमध्ये सामान्य घराप्रमाणे सर्व सोयीसुविधा आहेत.  त्यात दुकाने, चर्च, पुस्तकांची दुकाने आणि हॉटेल्सपासून ते शाळांपर्यंत. किती अद्भुत आहे ना!


मत्माता: जमिनीखालील खड्ड्यातलं गाव

 कुबरपेडीमधले लोक जमिनीखाली रिकाम्या पडलेल्या खाणीत राहतात.  पण जगात असे एक गाव आहे, जिथे लोक शतकानुशतके जमिनीच्या आत खड्डे करून राहत आहेत.  ट्युनिशियाच्या दक्षिण भागात असलेल्या या गावाचे नाव मत्माता आहे.  मत्माता गावातील भूगर्भातील घरे जमिनीपासून कित्येक फूट खाली एका मोठ्या गोल खड्ड्यात आहेत.  मोठा गोलाकार खड्डा एक विशाल अंगण म्हणून काम करतो.  अंगणाच्या एका बाजूने वर जमिनीवर जाणासाठी गच्ची वाट आहे.  त्याच वेळी, जमिनीपासून वेगवेगळ्या दिशांना असलेल्या बोगद्यांमध्ये, लहान मुले, वृद्धांच्या खोल्या, सामान इत्यादी ठेवण्यासाठी स्टोअर रूम आहेत.  खड्ड्यात प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे स्वतंत्र घर आहे.  प्रत्येक घरामध्ये खोल भूमिगत बोगदे आहेत, जे काही अंतरावर असलेल्या इतर घरांशी एकमेकांशी जोडलेले आहेत.  जेणेकरून कडक उन्हात, पावसात एकमेकांच्या घरापर्यंत सहज पोहोचता येईल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment