Tuesday 11 January 2022

चिमुरडीने केला 'लिंगाणा' सर


मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारण्यात त्यांच्या आई-वडिलांचं योगदान महत्त्वाचं असतं. मुलाला संस्कारशील, धाडसी, भयमुक्त आणि सर्वगुणसंपन्न बनवणं पालकांचं कर्तव्य आहे. मुलं त्यांच्या भावी आयुष्यात कुठेच कमी पडू नयेत,याची पुरेपूर काळजी मुलांच्या लहानपणापासूनच घेतले पाहिजेत.तसे संस्कार दिले गेले पाहिजेत. आजचे पालक त्याबाबत सतर्क असल्याचेच आरोही लोखंडे या चिमुरड्या मुलीच्या पराक्रमावरून दिसून येते.  गिर्यारोहणाची जबदरस्त आवड असणाऱ्या साताऱ्याच्या सहा वर्षाच्या आरोही सचिन लोखंडे या चिमुरडीने  अलिकडेच दुर्गम चढाईचा एक हजार फूट उंचीचा लिंगाणा सर केला आहे. विशेष म्हणजे तिने हा पराक्रम पारंपरिक नऊवारी साडी नेसून केला आहे.हे कौतुकास्पदच म्हटले पाहिजे.

 लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. लिंगाणा समुद्रसपाटीपासून 3 हजार 100 फूट उंचीवर लिंगाणा दुर्ग आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका असल्याने त्याला लिंगाणा हे नाव पडले आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते. सातारा जिल्ह्यातल्या कामेरी गावात राहणाऱ्या आरोही लोखंडे हिने नववर्षाच्या सुरुवातीलाच रविवारी लिंगाणा सर करून तिरंग्याला मानवंदना दिली. तिच्यासोबत तिचे वडील सचिन लोखंडे होते. पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर यांच्या मार्गदर्शनातून लिंगाणा मोहीम 

आयोजित करण्यात आली.

 आरोही अगदी लहान असल्यापासून वडिलांसोबत ट्रेकिंगला जाते. ती सध्या पहिलीत शिकत आहे. आतापर्यंत  तिने वडिलांसोबत 26 किल्ल्यांना तिने भेट दिली आहे. शिवाय लिंगाणासह चार सुळकेही तिने सर केले आहेत. वजीर, वानरलिंगी, तैलबैल या सुळक्यांवर ती पोचली आहे. अतिशय धीटपणे आणि उत्साहात ती मोहिमेमध्ये सहभागी होते, असे तिचे वडील सचिन लोखंडे सुळके यांनी सांगितले. 

आजचे पालक आपल्या पाल्याला काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करीत आहेत,यासाठी स्वतः मेहनत घेताना दिसत आहेत. मुलांनी पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपली प्रगती करावी, यासाठी त्यांचा खटाटोप चालू असतो, हे  उद्याच्या देशाच्या भविष्यासाठी नक्कीच  आशादायी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment