Monday 17 February 2020

ट्वेन्टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेचा इतिहास

महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. या स्पर्धात 10 संघाचा समावेश असून आपल्या भारताला एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. मात्र यावेळेला विश्वचषकाची आशा निर्माण झाली आहे. हरमनप्रित कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. 2009 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत चार वेळा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ याही वेळेला आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.

२००९ विजेते इंग्लंड
पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दोन वर्षानंतर महिलांच्या दवेन्टी-२० महासंग्रामाला सुरुवात झाली. यजमान इंग्लंडने घरख्या मैदानांचा फायदा उठवत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचे गटातील आव्हान सहज चिरडत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडला सहजपणे नमवत इंग्लंडने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंडची यष्टिरक्षक-फलंदाज क्लेयर टेलरने दोन अर्धशतके झळकावत छाप पाडली आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. भारताने गटातून दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले, पण फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताची घोडदौड संपुष्टात आली.
२०१० विजेते : ऑस्ट्रेलिया
दर दोन वर्षांनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणे अपेक्षित असताना पुरुषांची चैम्पियन्स करंडक स्पर्धा लांबणीवर पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक बिघडल्यामुळे अवघ्या १० महिन्यांनी महिलांवर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ आली. कॅरेबियन बेटांवरील तीन ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र यजमान वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत धडक मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारताने सलग दुसऱ्यांदा
उपांत्य फेरी गाठली, पण ऑस्ट्रेलियाने भारताचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर मोहोर उमटवली.
२०१२ विजेते : ऑस्ट्रेलिया
आशिया खोडात पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी 'अ' गटातून अपेक्षेप्रमाणे तर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांनी ब गटातून उपांत्य फेरी गाठली. भारताला मात्र एकही विजय मिळवता न आल्याने साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य आणि अंतिम फेरीत कमी धावा करुनही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमाल दाखवल्यामुळे कांगारूंच्या संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावता आला. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाद करण्याची करामत ऑस्ट्रेलियाची मध्यमगती गोलंदाज ज्युली हंटरने केली. विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वोत्तम
कामगिरी ठरली.
२०१४ विजेते : ऑस्ट्रेलिया
२०१४चा विश्वचषक आठऐवजी १० संघांमध्ये खोळवण्यात आला.२०१२च्या विश्वचषकातील अव्वल सहा संघ तसेच पात्रता फेरीतून आलेले पाकिस्तान, श्रीलंका आणि आयलंडव यजमान बांगलादेश यांच्यात चौथ्या पर्वाचा थरार रंगला. मिताली राजने दोन अर्धशतके हाळकावत भारताला झकास सुरुवात करून दिली, पण भारताचे आव्हान सलग दुसऱ्यांदा साखळीतच संपुष्टात आले. दोन वेळच्या विजेत्या
ऑस्ट्रेलियाला सलामीलाच न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. पण पेटून उठलेल्या ऑस्ट्रेलियाने मग साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक विजयाची हॅदद्रिक साजरी केली.
२०१६ विजेते। वेस्ट इंडिज
भारतात पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० महिला विश्वचषकाचा थरार रंगला. साखळी फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडने अपराजित राहात आपला ठसा उमटवला होता, त्यामुळे त्यांनाच जेतेपदासाठी दावेदार मानले जात होते. स्टेफनी टेलरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने साखळी फेरीतील एका पराभवाचा अपवाद वगळता या विश्वचषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजने सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न धुळीस मिळवले. वेस्ट इंडिजच्या रूपाने नवा जगज्जेता मिळाला. मिताली राजच्या
नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताची घरच्या मैदानावर मात्र डाळ शिजू शकली नाही.
२०१८ विजेते : ऑस्ट्रेलिया
गतविजेत्या वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी- २० विश्वचषकाच्या आयोजनाचा मान मिळाला. वेस्ट इंडिजने साखळी फेरीत चारही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि सलग दुसऱ्यांदा आपण विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची तोफ पहिल्यांदाच धडाडली. साखळीत सर्व सामने जिंकून भारताने थाटात उपांत्य फेरी गाठली. पण इंग्लंडच्या झंझावातासमोर भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पुन्हा एकदा इंग्लंडला नेस्तनाबूत करत चौथ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

No comments:

Post a Comment