Monday 24 February 2020

स्वच्छतेचा कानमंत्र देणारे संत गाडगेबाबा

रामधुनपूर्वी गावं पूर्ण,
व्हावे स्वच्छ, सौंदयवान
कोणाही घरी गलिच्छपण
न दिसावे
देशात सध्या सफाई अभियान जोरात सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानाने सामान्य माणसाला हातात झाडू घेऊन आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रेरित केले. पण तुम्हाला माहित आहे का स्वच्छतेचे खरे जनक हे फार अगोदर जन्मून गेले आहे. होय, संत गाडगेबाबा यांनी फार वर्षांपूर्वी स्वच्छतेचा कानमंत्र जनसामान्यापयर्ंत पोहोचवलेला.

त्यांचे मुळ नाव डेबुजी. अमरावती जिल्यातील, अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेंद्गाव या गावी वडील झिंगराजी जानोरकर आणि आई सखुबाई यांच्या घरी डेबुजीचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना कीर्तनाची, स्वच्छतेची आवड. ते जिथे जिथे जात होते, तिथे तिथे त्यांनी समाजसेवेचे धडे द्यायला सुरुवात केली. आपला परिसर स्वच्छ केला तर गावं स्वच्छ आणि परिणामी देश स्वच्छ हे जनतेला गाडगेबाबा पटवून देत असे.ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले.
त्यांनी समाजाला संदेश दिला:
भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या
ज्यांच्याजवळ कपडे नाही त्यांना कपडे द्या
घर नसेल तर रहायचा बंदोबस्त करा
नोकरी मिळवण्यासाठी लोकांना सहकार्य करा
दुर्बलांना आधार द्या, गरिबांना शिक्षण द्या
दृष्टिहीन आणि अपंग लोकांची सेवा करा
झाडावर, पक्षी-प्राणी यांच्यावर प्रेम करा
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच गाडगेबाबा यांनी अनिष्ट प्रथांच्या उच्चाटनाचे, जनसुधारणेचे व दिनसेवेचे कार्य सुरू केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचा विडा उचलला. ते सतत लोकांना सांगत असे. चोरी करू नका, व्यसन घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका. जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका.
एकदा गाडगेबाबा एका गावात गेले. त्यांनी पहिले कि एक व्यक्ती दगडारुपी देवाची पूजा करत होता. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अभिषेक केला. तेवढय़ात तिथे एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. त्या व्यक्तीला कुत्र्याचा फार राग आला आणि तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा पुढे सरसावले आणि म्हणाले
बिचार्‍या त्या गरीब मुक्या जनावरांना का मारतोस?त्याला हे कुठं माहीत आहे की,माणसांचा देव दगड असतो म्हणून ?
दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.या देवांतच गाडगेबाबा नेहमी रमत असत.जे का रंजले-गांजले, त्यासी म्हणे जो आपुले असे समजून गरिबांची सेवा करण्यातच त्यांना आनंद मिळत असे.
गाडगेबाबा नेहमी म्हणत असत.
मायबाप हो ! पशु कि होत पन्हैया, नरका कछु ना होय !
नर करणी करे तो नरका नारायण होय !
म्हणजेच स्वत: नारायण बनून कार्य करा, तुम्ही हात फिरवाल तिथे लक्ष्मी उभी राहील अन गावं भूवैकुंठ होईल.
गाडगेबाबांनी धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार त्यांनी आपल्या कीर्तनामार्फत केला.
आज समाजाला गाडगेबाबांनी सांगितलेल्या आदश्रांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कित्येक वर्षांनंतरही त्यांनी दिलेला कानमंत्र आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतो. काळ बदलला असला तरीही व्यक्तीला, समाजाला आणि देशाला त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच सात्विक समाधान मिळेल.

No comments:

Post a Comment