Sunday 1 November 2020

नरेंद्र दाभोलकर


नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म १नोव्हेंबर १९४५ रोजी झाला.  हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधर्शद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि. २0 ऑगस्ट, २0१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्‍वर पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली.

वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्याबरोबर विवाह केला. त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले.

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७0 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २00६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधर्शद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध रिंगणनाट्य या पुस्तकात घेण्यात आला .ऑगस्ट २0, इ.स. २0१३ या दिवशी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment