Monday 30 November 2020

वासुदेव बळवंत फडके स्मारक


पुणे शहरातील संगम पुलाजवळच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात देशासाठी तारुण्याची होळी केलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी आदी उपेक्षित समाजातील तरुणांना संघटीत करुन स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारणाऱ्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या स्मारकाची सध्या मात्र दुरवस्था झाली आहे. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.  खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. 17 जुलै 1879 ते 9 जानेवारी 1880 या कालावधीमध्ये फडके या कोठडीमध्ये होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमधील स्मारक दुर्लक्षित आहे या स्मारकामध्ये वासुदेव बळवंत फडकेंच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचे चित्रण असलेले म्युरल्स आहेत. प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या कसबी हातांनी फडकेंच्या आयुष्याचे शिल्परुपी चित्रण केले आहे  स्मारकाच्या घुमटावर पराग घळसासी आणि रामचंद्र खरटमलांनी त्याचे रेखाटन केलेला फडकेंचा अर्धाकृती पुतळा आहे.फडकेंना कैद्येत ठेवण्यात आलेली कोठडी सुस्थितीत आहे. स्मारकाभोवती उद्यान उभारण्यात आले होते,पण आज ते इथे दिसत नाही. 


No comments:

Post a Comment