Wednesday 11 November 2020

लक्ष्मी मेनन: रद्दी कागदांपासून बनवला इको-पेन


माणसाच्या डोक्यात कल्पना कोठून येतात कळत नाही, पण त्यामुळेच नवनवीन शोध लागले. संशोधनं झाली आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य आरामशीर झालं. असं असलं तरी काही शोधांमुळे ,काहींच्या अतिरेकामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. काही उत्पादनं मनुष्य-प्राणी-पक्षी यांच्या जीवावर उठली. आज प्लास्टिक हे एक उदाहरण आहे. अशी असंख्य उत्पादनं आहेत. पण काही माणसं पर्यावरणाची काळजी घेत एखादं उत्पादन बनवतात व ती लोकप्रिय बनवतात. असंच एक उत्पादन केरळ राज्यातल्या लक्ष्मी मेनननं बनवलं आहे. ते आहे, रद्दीच्या कागदांपासून बनवलेलं पेन. 'युज अँड थ्रो' असलेला हा पेन उपयोग संपल्यावर टाकाऊ असला तरी त्यात असलेल्या झाडाच्या 'बी' मुळं कुठं तरी एकादं रोप उगवतं आणि पुढे जाऊन त्याचं झाड होतं. पर्यावरणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये हे पेन फारच लोकप्रिय झालं आहे. हे अप्रत्यक्षपणे वृक्षारोपण करण्यासारखं आहे.

लक्ष्मीचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका छोट्याशा गावात झाला. केरळ भेटीत ती अनाथ मुलांना शिल्पकला शिकवायची.  दरम्यान, तिने त्यांना कागदापासून पेन कसे तयार करायचे हे शिकवले.  तिने अशा काही पेना बनवून  सॅनफ्रान्सिस्कोमधील एका आर्ट गॅलरीला पाठविले होते आणि विकले गेले होते. या पेना एका कार्यशाळेत मुलांनी बनवल्या होत्या.   येथूनच मग पेपर पेनमध्ये विविध झाडांच्या बियाणांचा अंतर्भाव  करण्याची कल्पना पुढे आली आणि शिवाय  पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिक पेनला पर्याय म्हणूनही  हा पेन पुढे आला.

लक्ष्मीने आणखी एका गोष्टीची निर्मिती केली आहे.ती आता केरळमधल्या घराघरांत पाहायला मिळते.ती म्हणजे चेकुट्टी बाहुली. कापडाच्या चिंध्यापासून बनवलेली ही बाहुलीदेखील खूप चर्चित आहे. तिला केरळमधील विनाशकारी पूरानंतर याची कल्पना आली.  विणकरांचे गाव असलेले चंदमंगलम एका आठवड्यापेक्षा अधिक काळ पाण्याखाली होते.  यात खूप कपडे भिजले. अक्षरशः त्याच्या नंतर चिंध्या झाल्या.  या चिंद्यामधून तिने एक चेकट्टी बाहुली बनविली. आणि पुढे तिने या बाहुल्यांची निर्मितीच सुरू केली. आज केरळमधील प्रत्येक घरात एक बाहुली आहे.  लक्ष्मी मेनन आज इको-पेन आणि चेकुट्टी बाहुल्यांचे उत्पादन घेऊन कोट्यवधी रुपयांची मालकीण बनली आहे. लक्ष्मी सांगते की, आपलं डोकं नेहमी रिकामं असावं. त्यामुळे अनेक आयडिया सुचतात. संकटातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment