Friday 6 November 2020

निसर्ग सौंदर्याने नटलेले माथेरान


माथेरान म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती गर्द हिरवाई आणि खऱ्या अर्थाने झुकझुक चालणारी रेल्वे. साधारण ८०३ मीटर किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा वैविध्यपूर्ण, घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. या कडांनाच पॉइंट्स म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉइंट्सना नावे दिली. त्यामुळे सहाजिकच पॉइंट्सची नावे इंग्रजीत आहेत. मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी सन १८५० मध्ये ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो डोंगराकडे आकर्षित झाला. स्थानिक व्यक्तीला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉइंटवरून  वर चढला आणि रामबाग पॉइंटवरून खाली उतरला.  नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला  आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग  त्याचा इतर मित्रपरिवार आणि इंग्रज माथेरानला  स्थायिक झाले.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा  सुटावलेली, वेगळी डोंगररांग आहे. कल्याणच्या मलंगगडापासून ती सुरू होते. मलंगगडाला लागून बदलापूरच्या 'टवली' गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर 'नवरानवरी'चा डोंगर लागतो. यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर 'म्हैसमाळ' नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा 'नाखिंद' डोंगर लागतो आणि  मग 'पेब' दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

माथेरानचे हवामान अतिथंड किंवा उष्ण असे कधीच नसते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. या काळात झालेल्या पावसाने माथेरान हिरवेगार झालेले असते. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातींच्या तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारांत मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही. इथल्या पक्षिसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल,दयाल, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदी पक्षी आहेत.पॅराडाइज,फ्लायकॅचर एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी येथे आढळतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment