Tuesday 3 November 2020

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक


माणसाला राहण्यासाठी सध्या तरी पृथ्वीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. पण अवकाशात अन्य सूर्यमालेत अथवा आपल्या सूर्यकक्षेत मानववस्ती किंवा मानवाला राहण्यासाठीचे वातावरण शोधण्याची धडपड माणूस सातत्याने करतो आहे. असं असलं तरी माणसाने पृथ्वीशिवाय राहण्याचं तात्पुरतं ठिकाण शोधलं आहे नव्हे त्याची चक्क निर्मिती केली आहे. आणि ते ठिकाण म्हणजे 'आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक'. अवकाशस्थानकाच्या माध्यमातून माणूस तब्बल दोन दशके या अवकाश स्थानकात (आयएसएस) राहत आहे. येथे तेव्हापासून अंतराळ प्रवाशांचे जाणे-येणे सुरू आहे. 2 नोव्हेंबर 2000 रोजी अमेरिकन अंतराळयात्री बिल शेफर्ड यांनी रशियन सहकारी सगेंई क्रिकालेव्ह व युरी गिडजेंको यांच्यासमवेत अंतराळ स्थानकावर पाहिले पाऊल ठेवले होते. तेव्हापासून गेल्या दोन दशकात 19 देशांचे 241 लोक या स्थानकावर राहून आले आहेत. 'आयएसएस' हे एक मोठे अवकाश यान आहे. येथे अंतराळयात्री राहतात. तसेच ही एक अद्ययावत प्रयोगशाळा असून येथे अंतराळयात्री वेगवेगळे प्रयोग अथवा शोध लावण्याचे काम करत असतात. हे अवकाशयान पृथ्वीपासून सुमारे 250 मैल म्हणजे 402 किमी अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असते. याचा ताशी वेग तब्बल 17 हजार 500 किमी इतका प्रचंड आहे. 

'अंतराळ स्थानक'चा पहिला भाग म्हणजे कंट्रोल मोड्युलच्या रुपात 1998 मध्ये रशियन रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला. पुढे अनेक वर्षात त्याला अनेक भाग जोडले गेले. सर्व सज्जता झाल्यावर 2 नोव्हेंबर 2000 मध्ये पाहिले पथक 'आयएसएस' वर दाखल झाले. यामध्ये अमेरिका,रशिया, जपान आणि युरोपच्या प्रयोगशाळांचा समावेश यात आहे. पहिल्या त्रिकुटाने म्हणजे सर्गेई, युरी गिडजेंको आणि बिल शेफर्ड यांनी कझाकस्थानमधून 30 ऑक्टोबर2000 रोजी 'आयएसएस' च्या दिशेने झेप घेतली. या अंतराळस्थानकसाठी आतापर्यंत120 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे. हे यान पृथ्वीभोवती एक फेरा 90 मिनिटात पूर्ण करते. हे अवकाशस्थानक 109 मीटर लांब असून येथे पॅगी व्हिटसन या अंतराळवीराने सर्वात जास्त एकूण 665 दिवस घालवले आहेत. याया 'अंतराळस्थानका' (स्पेस स्टेशन) च्या माध्यमातून मानवाची अंतराळातील उपस्थिती निश्चित झाली. येथून लावण्यात येणारे शोध मानवासाठी लाभदायक ठरू लागले आहेत. या अवकाश स्थानकच्या माध्यमातून अवकाशातील दुसरे जग शोधणे ,हे 'नासा'चे प्रमुख लक्ष्य आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment