Friday 30 April 2021

वाद्यांची निर्मिती


भारतीय शास्त्रीय संगीतात तंतुवाद्यात मानाचे स्थान मिळवले आहे ते सतारीने आणि तंबोऱ्याने; पण वीणा एकतारी ही देखील वाद्ये याच वर्गातली आहेत. या सर्वांच संबंध येतो भोपळ्याशी. भोपळा हाच या वाद्यांचा तारणहार असतो. महाराष्ट्रात मिरज या ठिकाणी या वाद्यांची निर्मिती होते. ही निर्मिती भोपळ्यापासून होते. पंढरपूरच्या परिसरातून भोपळ्याची खरेदी मिरजचे निर्माते करतात. शेतातले भोपळे वाद्यांसाठीच पिकवतात. सहा-सात महिने जातात. पिकल्यावर शेतातच वाळवतात. सुकल्यावर देठ काढतात. गोलाकार कापतात, साफ करतात. त्वचा मऊ होण्यासाठी पाणी भरतात. दोन दिवसांनी साफ करतात. उभ्या-आडव्या लाकडी काठ्या बसवतात.आकार सारखा राहावा म्हणून. गोलाकार राहाण्यासाठी तून किंवा टून वापरतात.

त्याचा गळा तयार करतात. पुढे लाखेचा वापर करून गळ्यावर दांडी बसवतात. भोपळ्यावर लाकडी तबकडी बसवतात, बंद करतात. कलाकुसर करतात, रंग देतात मग खुंट्या बसवतात, वाधा बसवतात, तारा बसववतात. त्या योग्य प्रकारे जुळवतात आणि सतार, तंबोरा करतात. या सतार, तंबोऱ्याचा वापर शास्त्रीय संगीतात अधिक उपयोग होत आला आहे. अशा संगीतात रागाचा विस्तार केला जातो. त्यावेळी तारांचा मेळ स्वराशी अधिक जुळत जातो आणि संगीतात माधुर्य निर्माण होते. या रागपद्धतीला उंचीवर नेण्यात गायकांचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या त्या पद्धतीतूनच पुढे पुढे ग्वाल्हेर, किराणा, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा घराण्यांची निर्मिती झाली. या घराण्यातील बहुतेक गायकांनी तंबोरा, सतार या वाद्यांना नुसते महत्त्व दिले नाही तर त्यांची रागदारीसाठी साथ घेऊन या वाद्यांना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. यात अल्लादियाँ खान, मोगुबाई कुर्डीकर, मंजी खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, भास्करबुवा बखले अशांचा मोठा वाटा आहे.

No comments:

Post a Comment