Friday 16 April 2021

खेड्याचा परिपूर्ण विकास साधणारी संस्था-बीसीटी


डॉ.भागवतुला वेंकट परमेश्वरराव यांनी भागवतुला चॅरिटेबल ट्रस्ट (बिसीटी)च्या माध्यमातून आंध्र प्रदेशातील सुमारे 160 गावांमध्ये शिक्षण, कृषी,महिला सक्षमीकरण, अपंग पुनर्वसन आणि आरोग्य या पाच क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. त्यांचा हा व्याप थक्क करणारा आहे. त्यांच्या या कार्याला 'परमेश्वरी कार्य' म्हटले तरी वावगे ठरू नये. माणसाचं झपाटयानं कसं असावं,हे इथं येऊन पाहायला हवं. 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील दिमिली हे डॉ.भागवतुला यांचे मूळ गाव. याच परिसरात ते शिकले ,लहानाचे मोठे झाले. आंध्र विद्यापीठाशी संलग्न अशा विशाखापट्टणमच्याच महाविद्यालयातून त्यांनी एम. एस्सी. ही पदवी संपादन केली. मुंबईच्या अणुशक्ती केंद्रात काही वर्षे वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून कामही केले. नोकरीच्या आवश्यकतेचा एक भाग म्हणून अमेरिकेतील पेन्सिलव्हानिया विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. अनुशास्त्रातील त्या डॉक्टरेटनंतर अणुशक्ती केंद्रातील त्यांचा संशोधनपर कार्यभार वाढणे स्वाभाविक होते. पण वयाची ठराविक वर्षे गाठल्यानंतर नोकरी सोडायची,गावी जायचे, सेवाभावी संस्था स्थापायचे आणि त्यामाध्यमातून योजलेल्या क्षेत्राचा आर्थिक,सामाजिक कायापालट घडवून आणायचा-हे डॉ.भागवतुला परमेश्वरराव यांनी फार पूर्वीच मनाशी ठरवून घेतले होते. 

1967 सालापासूनच डॉ.भागवतुला परमेश्वरराव यांचे या दिशेने प्रयत्न सुरू झाले होते. 1976 साली त्यांनी भागवतुला चॅरिटेबल ट्रस्टची रीतसर स्थापना केली आणि येल्लमचिली, अच्युतपुरम व रामबिली मंडलातील100 गावे हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला सुरुवात केली. शिक्षण, कृषी,महिला सक्षमीकरण, अपंग पुनर्वसन आणि आरोग्य या पाच क्षेत्रात काम करण्याचा निर्धार मनाशी केला.गेली 45 वर्षे हे काम ध्येयवादी वृत्तीने, त्यागी भावनेने त्यांनी चालवले. 

देशापुढची सर्वात मोठी समस्या गरिबीची, असे सर्रास मानले जाते आणि त्या गरिबीचा अर्थ ढोबळमानाने अन्न, वस्त्र, निवारा नसणे, असा घेतला जातो. मात्र परमेश्वरराव यांनी गरिबीचा विचार त्याहीपलीकडे जाऊन केला असावा असे दिसते. गरिबी एक प्रकारची नाही तर ती सात प्रकारांची आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आत्मिक गरिबी असे त्याचे प्रकार आहेत. या साऱ्यांचे निर्मलून असे लक्ष्य समोर 'बीसीटी'ने आपल्या कार्याची उभारणी केली आहे आणि खेड्यामध्येच दडलेल्या खऱ्या भारताच्या उन्नयनाचा ध्यास धरला आहे. 

'बीसीटी'च्या कामाची सुरुवात दिमिली गावात शाळा स्थापन करून झाली. गावात शाळा नाही आणि या पाच मैल परिसरात शिक्षणाची सुविधा नाही, हे लक्षात आल्या नंतर भागवतुला यांनी गावकऱ्यांना आवाहन करून जमीन मिळवली. त्यांच्याच सहकार्याने शाळा सुरू केली आणि ती शाळा जवळजवळ एक दशकभर सर्वोत्तम शाळा म्हणून गौरवली गेल्यानंतर भागवतुलांनी लक्ष केंद्रित केले ते तशा प्रकारची छोटी शिक्षण केंद्रे स्थापन करण्यावर. आजमितीस 160 खेडेगावांमध्ये 1100 अनौपचारिक शैक्षणिक केंद्रांमधून आणि नाविन्यपूर्ण तत्त्वावरील प्राथमिक शाळांमधून 'बीसीटी'चे काम सुरू आहे. या प्रकल्पाशी 32 हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. शासनाने ठरवून दिलेले शैक्षणिक अभ्यासक्रम राबवणे तेवढ्यापुरते स्वतःला मर्यादित न करता स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याची जोड 'बीसीटी' ने दिली. अनेक गावांत निवासी शाळा चालवताना या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी स्वावलंबी बनेल, आपल्या पायावर उभा असेल याची काळजी घेतली जाते. 

परसबागा फुलवणे, लाकडी खेळणी बनवणे, चरख्यावर सूत काढून खादीचे वस्त्र बनवणे, बेकारी पदार्थांचे उत्पादन, पशुखाद्य आणि संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण  यासारख्या छोट्या छोट्या उद्योगांच्या प्रशिक्षणातून मुलांना स्वावलंबी बनवण्याला हातभार लावला जातो. याखेरीज नृत्य-गायनादी कलांबरोबरच संभाषण-संवाद-वक्तृत्व यातही कसे आपले विद्यार्थी नैपुण्य मिळवतील याकडेही लक्ष देण्यात आले आहे. भारत सरकारने जाहीर केलेले नवे शैक्षणिक धोरण इथे आधीपासूनच पाहायला मिळते.  सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या 50 एकर जमिनीवर शेती,  पशुसंवर्धन, फळबागा यासारखे प्रयोग राबवताना काजू, आंबा, नारळ, बांधकामासाठीचे लाकूड देणारे वृक्ष यांची लागवड 'बीसीटी'ने केली. इथल्या परिसराचा कायापालट करून टाकला.  पडीक जमिनीतून उत्पन्नाची जोड मिळवणे या  परिसरातील ग्रामीण लाभार्त्यांना सहज शक्य झाले. नंतर गोकिवाडीसह अनेक गावांत जमिनी घेऊन असेच यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. एका कृषी क्रांतीचा अनुभव येथील रहिवासी घेत आहेत. 

महिला हे परिवर्तनाचे मुख्य माध्यम मानले जाते. मुलांचे संगोपन आणि गृहस्थाश्रम एवढ्यापुरते मर्यादित असे तिचे जीवन राहू नये, ती आर्थिक सक्षमीकरणाची साधन बनावी यासाठी1980 साली ट्रस्टने 27 गावांमध्ये 3 हजार 700 महिलांच्या माध्यमातून महिला मंडळे सुरू केली. पापड उद्योग, विड्या वळणे, स्क्रीन प्रिंटिंग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, खेळणीनिर्मिती यासारखे उद्योग त्यांना सुरू करून देण्यात आले. स्वयंसहायता गटातून त्यांचे बचतगट स्थापन झाले . आज दिडशेच्यावर गट कार्यरत आहेत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. त्या मुलांनी कुटुंबाचा भार ना बनता रोजगाराचा, अर्थनिर्मितीचा दुवा बनावे या हेतूने हे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. अपंग मुलांना स्वयंरोजगारासाठी उपयुक्त अशा लघुउद्योगांचे प्रशिक्षण आणि आवश्यक भांडवल-कच्चा माल पुरवला जातो. मुलांना स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी1985 मध्ये 'ग्राम आरोग्यालयम ट्रस्ट' ची स्थापना 'बीसीटी'च्या माध्यमातून केली. प्रशिक्षित महिला  नियमितपणे गावोगावी भेटी देऊन आरोग्याचे महत्त्व पटवून देतात. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालये चालवली जातात. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य 'बीसीटी' करत आहे. डॉ. भागवतुला यांचे 10 जून 2019 मध्ये निधन झाले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




No comments:

Post a Comment