Friday 23 April 2021

हे माहिती आहे का?


मानवासह अनेक जीवांचे निवासस्थान असलेल्या पृथ्वीविषयीची ही रंजक माहिती...

● पृथ्वी दहा नोनिलियन विषाणूंचे घर आहे. ही इतकी मोठी संख्या आहे की ती लिहिण्यासाठी दहानंतर ३१ वेळा शून्य लिहावे लागतात. हे विषाणू इतके आहेत की ब्रह्मांडातील प्रत्येक ताऱ्याला दहा-दहा कोटी विषाणू देता येतील!

● एक चमचाभर मातीत संपूर्ण आफ्रिका खंडात राहणाऱ्या माणसांपेक्षा अधिक म्हणजेच एक अब्जापेक्षा अधिक सूक्ष्म जीव असतात. त्यामध्ये जीवाणू, विषाणू, कवक आणि प्रोटिस्ट असतात.

● पृथ्वी म्हणजे लोखंड, ऑक्सिजन आणि सिलिकॉनचे मिश्रण आहे. पृथ्वीमध्ये लोखंडाचे ३२.१ टक्के, ऑक्सिजनचे ३०.१ टक्के आणि सिलिकॉनचे १५.१ टक्के प्रमाण असते.

● पृथ्वीचा सात टक्के भाग सदाहरित वर्षावनांनी आच्छादीत आहे. सर्वात मोठे वर्षावन आहे अॅमेझॉन. हे जंगल दरवर्षी २.२ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वर्षावने जगातील वीस टक्के ऑक्सिजन निर्माण करतात.

● पृथ्वी आपल्या अक्षाभोवती अचूक चोवीस तासांमध्ये फिरत नाही. ती २३ तास,५६ मिनिटे आणि ४ सेकंद फिरते. सूर्यसुद्धा अन्य ताऱ्यांच्या तुलनेत रोज १ अंशाने सरकतो. तो जोडला तर पृथ्वीचा एक दिवस चोवीस तासांचाच दिसतो.

● पृथ्वीच्या पोटात सूर्यापेक्षा अधिक उष्णता आहे. पृथ्वीच्या आतील कोअरचे तापमान ६ हजार अंश सेल्सिअस आहे. ते सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही अधिक आहे. पृथ्वीचा हा इनर कोअर ९८ टक्के लोखंडाचा आहे.

● माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. ते समुद्रसपाटीपासून ८,८४८ मीटर उंच आहे. समुद्रतळापासून जर उंची मोजायची असेल तर हवाई बेटाचा मऊना कीया हे सर्वात उंच पर्वतशिखर ठरते. त्याची एकूण उंची सुमारे ९,३३० मीटर आहे. त्याचा ५,१५२.४ मीटरचा भाग समुद्राच्या आत आहे.

● पृथ्वीची सर्वात लांब पर्वतराजी दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताची आहे. ती सुमारे ७ हजार किलोमीटर लांबीची आहे. मात्र, त्यापेक्षाही लांब पर्वतराजी समुद्राच्या खाली आहे. ही 'मिड ओशन रेंज'६५ हजार किलोमीटर लांबीची आहे. ती मध्य अटलांटिकपासून हिंद महासागर व प्रशांत महासागरापर्यंत जाते.

● पृथ्वीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप ९.५ तीव्रतेचा होताव तो चिलीमध्ये १९६० साली नोंदवला गेला. सैद्धांतिक रूपाने दहापेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मोठी फाल्टलाईन असणे गरजेचे आहे जे अशक्य असते! (संकलन- अनिकेत फिचर्स)

No comments:

Post a Comment