Sunday 18 April 2021

मानवी जीवन समृद्ध करणारी नर्मदा


ऋषीचे कूळ आणि आणि नदीचे मूळ शोधू नये,असे म्हणण्याची प्रथा असली तरी प्रत्येक नदीच्या उगमाबाबत उत्सुकता असतेच. नर्मदेचे उगमस्थान सुमारे 3 हजार 500 फुटांवर, अमरकंटक पर्वतावर आहे. त्या ठिकाणी नर्मदामातेच्या मंदिराव्यतिरिक्त अनेक तीर्थस्थाने आहेत. नर्मदेच्या उत्पत्तीविषयी एक पौराणिक कथा सांगण्यात येते. अमर कंटक नावाच्या राजाने आपली कन्या नर्मदा उपवर झाल्यावर तिचा विवाह शोण नामक राजाबरोबर ठरविला. परंतु या शुभ मंगलापूर्वीच अमर कंटाकाने मृत्यूशय्या धरली. त्यावेळेस त्याने नर्मदेस वारसदार नेमले व तो निधन पावला. पितृदुःखाचा काळ ओसरल्यावर तिने शोण राजाकडे आपल्या एका रूपवान दासीमार्फत श्रमाचे प्रतीक पाठवले. शोण राजाने गैरसमजामुळे त्या दासीलाच नर्मदा समजून तिच्याशी नियोजित वधुसमान वर्तन केले.ही गोष्ट नर्मदेला समजताच ती क्रोधायमान झाली व विरक्तीचा मार्ग स्वीकारून नदीरूपात प्रवाहित झाली.

यामागील श्रद्धेचा किंवा दंतकथेचा भाग सोडला तरी अमर कंटक या स्थानी उगम पावलेली नर्मदा सुरुवातीला सौम्य स्वरूपात वाहून नंतर 'कपिलधारा' या प्रपातरूपाने मोठ्या कड्यावरून झेपावते. या ठिकाणचा निसर्ग अत्यंत समृद्ध असून इतरही अनेक देवदेवतांची मंदिरे येथे आहेत. येथून तिचा प्रवास 'रेवा' संस्थानामधून पुढे मंडला टेकड्यांच्या कडेकपारीतून रामनगरपर्यंत अखंड सुरू होतो. त्यानंतर ती जबलपूरजवळ प्रवेश करते. जबलपूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'भेडाघाट' या स्थानी येते. आतापर्यंत उगमापासूनचा प्रवास करीत आलेल्या नर्मदेचा प्रवाह भेडाघाटाहून एक किलोमीटर अंतरावर प्रचंड जलौघाच्या रूपात खालच्या डोहात झेपावतो. त्याला तसेच समर्पक नाव दिले गेले आहे- 'धुवांधार'. त्या प्रचंड प्रपातसमोर उभे राहिल्यावर निसर्गासमोर मानव किती क्षुद्र आहे, याची अनुभूती येते. धुवांधारचा घनगंभीर नाद, त्याचे फेसाळणारे पाणी आणि आपल्यावर होणारे तुषारसिंचन यांनी आपण भारावून जातो. हा रौद्ररूपी जलावतार पुढे चौसष्ट योगिनी मंदिरातील मूर्तीला जणू चरणस्पर्श करीत भेडाघाट येथे अतिशय संथ होतो. या प्रवाहाला शोभा आणतात-दोन्ही तीरांवरील संगमरवरी पाषाण. त्यांचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर त्यातून नौकाविहाराची सोय आहे.

'ताजमहाल' हे संगमरवरातून  निर्माण केलेले शुभ्र रंगाचे प्रतीक मनात ठरलेले असते,परंतु येथे तर निसर्गनिर्मित संगमरवराचे अनेक आकार, विविध रंगछटा, त्यांची प्रवाहातील मोहक प्रतिबिंबे पाहून पर्यटक त्या भावविश्वात रमून जातात. संगमरवरातून वाहणारा नर्मदेचा प्रवाह पुढे सातपुडा व विंध्य पर्वतराजींमधील सपाटी पार करीत वाटेतील होशंगाबाद जिल्ह्याला भेट देऊन अहिल्यादेवी होळकरांच्या महेश्वर येथे येतो. या ठिकाणी राजवाड्याला शोभिवंत करणारे तिच्या काठावरचे प्रशस्त घाट आपल्या प्राचीन वैभवाची , वास्तुकलेची साक्ष देत उभे असलेले आजही दिसतात. अत्यंत साध्या राहाणीची ही साध्वी परंतु अनेक देवस्थानांच्या जिर्णोद्धारांत तिने मदत केली आहे. यापुढे नर्मदा ओम्कारेश्वरी शिवाला जलाभिषेक घालून पुढे गुजरातकडे रवाना होते. नर्मदेवरील सरदार नर्मदा प्रकल्प आणि अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या पुतळ्याच्या दुप्पट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पर्यटकांना खुणावतो आहे. 'गरुडेश्वर' येथे वासुदेवानंद सरस्वतीच्या सुंदर स्थानाला चरणस्पर्श करीत 'भडोच' या श्रेत्री ती सिंधू सागराला समर्पित होते. जिथे जाईल तिथे नर्मदा मानवी जीवन समृद्ध करते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली  

No comments:

Post a Comment