Saturday 24 April 2021

'स्पेस एक्स' अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी कंपनी


स्पेस एक्स ही टेस्लासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इलॉन मस्क यांची कंपनी आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे, अंतराळात कार पाठवलीय, उपग्रह त्यांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवले आहेत. आता या कंपनीने 'नासा'सोबत भागीदारी केलीय ती अंतराळवीरांना पाठवण्यासाठी. म्हणजेच अंतराळात आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये माणसं पाठवणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. अमेरिकेने त्यांच्याकडची स्पेस शटल्स वापरणं 2011 मध्ये बंद केलं. त्यानंतर अमेरिकन अंतराळवीरांना घेऊन जायचं काम स्पेसएक्स कंपनी करत आहे. कंपनीने अशा अनेक मोहिमा राबवल्या आहेत. अमेरिकेच्या 'नासा'ने बोईंग कंपनीशीदेखील अंतराळवीरांना स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी अशाच प्रकारचा करार केलेला आहे.

कंपनीने अंतराळवीरांच्या स्पेससूटचं खास डिझाइन केलं आहे. आतापर्यंतच्या अंतराळवीराच्या स्पेस सूट्पेक्षा हे सूट्स वेगळे होते. या सूटना 'स्टारमन सूट्स' म्हटलं जातंय. आतापर्यंतच्या बोजड सूट्सपेक्षा हे स्पेससूट सुटसुटीत होते. यातली हेल्मेट्स 3D प्रिंट करण्यात आली असून ग्लोव्हज टचस्क्रीन सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजेच हे ग्लोव्ह्ज घालूनही अंतराळवीर टचस्क्रीन वापरू शकतील. पण आतापर्यंतच्या स्पेस सूट्सप्रमाणेच याही सूट्सचा उद्देश तोच आहे - क्रू मेंबर्सना कमी दबावापासून वाचवणं. यामध्ये कॅपस्युलमधला हवेचा दाब कमी होतो. याशिवाय अंतराळवीरांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहील आणि त्यांच्या शरीराचं तापमान कायम राहील याचीही काळजी हे स्पेस सूट्स घेतात. या स्पेससूट्सना एका 'नाळेने' जोडलं जातं ज्यातून त्यांना संपर्कासाठीच्या लिंक्स आणि श्वसनासाठीचे वायू पुरवले जातात. आणि ही केबल वा नाळ त्यांच्या सीटला जोडलेली असते.

कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर आणि बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस यासारख्या चित्रपटांचं काम करणारे हॉलिवुडचे कॉस्च्युम डिझायनर होजे फर्नांडिस यांनी हे स्पेस सूट्स डिझाईन केले आहेत. हे सूट्स स्पेस एक्सच्या कॅप्स्यूलमध्ये - म्हणजेच क्रू ड्रॅगनमध्ये वापरता येतील. स्पेसवॉक्ससाठी म्हणजेच स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून काम करण्यासाठी हे सूट्स वापरता येणार नाहीत.

क्रू ड्रॅगन काय आहे?

या अंतराळवीरांना ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे घेऊन जाणाऱ्या अंतराळयानाला (Spacecraft) क्रू ड्रॅगन म्हटलं जातंय. ISS कडे सामान घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन या अंतराळयानाची ही सुधारित आवृत्ती आहे. जास्तीत जास्त 7 प्रवासी घेऊन जाण्याची या क्रू ड्रॅगनची रचना आहे. पण 'नासा' यामधून जास्तीत जास्त 4 प्रवासी नेईल आणि इतर जागा सामानासाठी वापरली जाईल. या क्रू ड्रॅगनमध्ये असलेल्या Thrusters च्या मदतीने या अंतराळयानाची दिशा ठरवता येईल आणि हे यान स्पेस स्टेशनला जोडता येईल वा तिथून काढता येतील. शिवाय आतापर्यंतच्या यानांपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या यानामध्ये आतापर्यंतच्या बटणांच्या ऐवजी सगळे कन्ट्रोल्स टचस्क्रीनवर असणार आहेत.


No comments:

Post a Comment