Wednesday 13 October 2021

हातनूर-विसापूर पंचक्रोशीची होनाई देवी


तुळजापूरच्या भवानी देवीचा अवतार म्हणून तासगाव तालुक्यातील हातनूर येथील श्री होनाई देवीचा उल्लेख केला जातो. हातनूर-विसापूर पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे इथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. देवीची आख्यायिका सांगितल्या जातात. त्यात ही देवी कन्नड मुलखातून आल्याचे सांगितले जाते. प्राचीन काळी गावालगत ओढ्याकाठी परीट घाटाजवळ देवीचे मंदिर होते. घाटावर कपडे धुण्याचे अस्वच्छ पाणी देवीच्या अंगावर जात असल्यामुळे देवी अप्रकट झाली. मात्र गावापासून जवळ असणाऱ्या डोंगरावर पुन्हा देवी प्रकट झाली. देवी डोंगरावर असल्याचा दृष्टांत पुजाऱ्याला झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी खोदकाम केले असता घोड्यावर स्वार असलेली मूर्ती सापडली. गावातील लोकांनी या ठिकाणी देवीची स्थापना केली. ज्या डोंगरावर देवीची स्थापना झाली, तो होनाईचा डोंगर म्हणून आता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते, की छत्रपती शिवराय या डोंगरावर वास्तव्याला होते. या ठिकाणी किल्ला बांधण्याचा त्यांचा मानस होता. मात्र जवळच इथे असणाऱ्या नाथबाबाच्या डोंगरावरून शत्रू हल्ला करू शकतो, म्हणून त्यांनी तो बेत रद्द केला. इथे असलेले घोड्याचे नाल शिवरायांच्या घोड्याचे असल्याचे सांगतात. श्रावणात येथे मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. नवरात्रीत दररोज भाविक गडावर दर्शनासाठी येतात. दसऱ्यादिवशी पाटील वाड्यातून देवीची मिरवणूक काढण्यात येते.

यादिवशी पहाटेपासून भाविक ओढ्याकाठी असणाऱ्या मंदिरापासून होनाई मंदिरापर्यंत दंडवत घेतात. नव्या पोर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. सध्या मंदिराचे बांधकाम वेगाने करण्यात येत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या देवस्थानचा परिसर विकसित होत आहे.


No comments:

Post a Comment