Wednesday 13 October 2021

गुड्डापूरची श्री धानम्मादेवी


कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील गुड्डापूर येथील धानम्मादेवी समस्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर लोकांची रिघ असते. लिंगायत धर्माचे संस्थापक श्री बसवेश्वर यांच्या त्या समकालीन. श्री धानम्मा म्हणजे भक्ती, ध्यान, साधना, संसार व क्रांतीचा अपूर्ण संगम आहे. आध्यात्मिक मुलगी, संसारी गृहिणी ते गणाचार दलाचे सेनाप्रमुख असा त्यांचा जीवन प्रवास अलौकिक आहे. जतपासून सुमारे बावीस किलोमीटरवरील गुड्डापूर हे गाव. या गावास मोठा ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभला आहे. लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे हे श्रद्धापीठ श्री धानम्मा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. जगन्माता, महाशरणी वरदायिनी श्री धानम्मा देवीने जन्मस्थळ जत तालुक्यातील उमराणी हे गाव. श्री बसवेश्वरांनीच त्यांचे धानम्मा हे नाव ठेवले. गुड्डापूर त्यांचे सासर. तेथे त्यांनी आपले महात्म्य प्रकट केले. ती त्यांची कर्मभूमी, तर बसवकल्याण ही धर्मभूमी. सध्या नवरात्रीत कर्नाटकसह महाराष्ट्रातून लोक येत आहेत. दरवर्षी कार्तिकी अमावास्येला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात श्री धानम्मा देवीची यात्रा भरते. गुड्डापूरचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. गेल्या काही वर्षांत लोकवर्गणीतून या मंदिराचा विकास होत आहे. सुंदर व भव्य गोपूर उभारण्यात आले आहे. मंदिरात देवीची ध्यानस्थ अवस्थेत बसलेली सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे धर्मपीठ बनले आहे. धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून या मंदिराचा पुढील काही वर्षात या परिसराचा विकास होणार आहे. या गावामुळे लिंगायत समाजाच्या भाविकांसाठी जत तालुका नकाशात आला आहे.


No comments:

Post a Comment