Wednesday 13 October 2021

कवठेमहांकाळची महांकाली देवी


एखाद्या देवीच्या नावावरुन त्या गावचे नाव रुढ होणे म्हणजे तसे दुर्मिळ. कमंडलू नदीच्या तीरावर वसलेले हे शहर म्हणून कवठे व ग्रामदेवता श्री महाकाली देवीच्या नावावरुन 'कवठेमहांकाळ' असे नाव पडल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख या मंदिरात देवीच्या दोन मुर्ती आहेत. पूर्वी कमंडलू नदीला आलेले पाणी महांकाली मंदिराच्या पायरीला लागत होते. नदीत दोन कुंड आहेत. त्यातील अंबाकुंडात एका भक्ताला मुर्ती सापडली. ती महांकाली देवीच्या डाव्या बाजूला दिसते. मंदिरापुढे असलेली दीपमाळ साधारण १४० वर्षांची आहे. संस्थान काळात पटवर्धन राजेंच्या पुढाकाराने १९०९ मध्ये मंदिराचा प्रथम जीर्णोध्दार होऊन ५० फूट लांब व ३० फूट रुंदीचे घडीव बांधकाम केले. छतावर चौपाकी पध्दतीची मंगलुरी कौले, सभा मंडपाचे सागवानी खांब बदलण्यात आले. पूर्वी नवरात्रीत सागवानी खांबाना शेतकरी ऊस, ज्वारीचे खुंट, नारळाच्या झावळ्यांनी सुशोभित करत. नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी काचेच्या हंड्यांमध्ये मेणबत्ती किंवा दिवे लावल्याने त्याचा प्रकाश सभामंडप उजळून टाकत असे. सन २००० मध्ये मंदिराचा दुसऱ्यावेळी झालेल्या जीर्णोध्दाराने मंदिराचे रुपडेच पालटले. मंदिराचा गाभारा, सभामंडप संगमरवरी असून २०१० साली कलशारोहण समारंभही झाला. मंदिरात श्री गणेश, श्री मारुती, शिवलिंगही आहे. उजवीकडे तुळस, मागच्या बाजूला श्री नागदेव आणि एक काळ्या पाषाणाची वीरगळ आहे. गर्भगृहात जय-विजय यांचे स्तंभ असून जवळच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.

नित्य पूजेवेळी अभिषेक, देवीसाठी साडी-चोळी, पुष्पसेवा स्वीकारली जाते. विशेष प्रसंगी होणारी पान-पूजा आकर्षक असते. मंदिराचा 'क' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. गुरव बंधूंच्या कित्येक पिढ्या देवीचे पुजारी आहेत.


No comments:

Post a Comment