Wednesday 20 October 2021

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ


१) अग अग म्हशी मला कुठं नेशी - एखादी गोष्ट स्वतः इच्छा असून करता येत नसली म्हणजे दुसऱ्याच्या आडून ती करणे .

२) अती खाणे मसणात जाणे - खाणे आणि पिणे यामध्ये अतिरेक झाल्यास परिणाम घातक होतो.

३) असतील शिते तर जमतील भुते - आपल्याजवळ जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत मित्रांची वाण नसते.

४) असेल हरी तर देई खाटल्यावरी - नशिवावर हवाला ठेवणारे लोक स्वतः प्रयत्न करीत नाहीत. ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात .

५) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - भलत्याच माणसाशी गाठ पडली असता किंवा मैत्री जडली असता आपले प्राण धोक्यात पडतात .

६) अती तेथे माती - एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे त्याचा परिणाम वाईट होतो.

७) अती शहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करावयास जातो, तो अंती फसतो.

८) अति राग भीक माग - संतापी माणूस आपलेच नुकसान करून घेतो .

९) अडला नारायण गाढवाचे पाय धरी - थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते.

१०) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यात आनंद मानणाऱ्यांना संधी प्राप्त झाली की जास्त उत्साह येतो. / एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.

११) आयत्या बिळावर नागोबा - विनासायास दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा मिळणे.

१२) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार ?

१३) आपला हात जगन्नाथ - आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.

१४) आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही वाजूंनी कोंडमारा.

१५) आईजीच्या जिवावर बाईजी उदार - दुसऱ्याचा पैसा खर्च करून उदारपणा दाखविणे.

१६) आधी पोटोबा मग विठोवा - अगोदर स्वार्थ मग परमार्थ .

१७) अंथरूण पाहून पाय पसरावे - मिळकत पाहून खर्च करावा .

१८) आयत्या पिठावर रेघोट्या - स्वतः श्रम न करता दुसऱ्याच्या कष्टाचे फळ घेणे.

१९) इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे .

२०) आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते - एकाने मेहनत करावयाची व त्याचा फायदा दुसऱ्यांनी घ्यावयाचा.

२१) आंधळा मागतो एक डोळा , देव देतो दोन - थोड्या लाभाची अपेक्षा असताना जास्ती लाभ होणे.

२२) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे .

२३) उचलली जीभ लावली टाळ्याला - अविचाराने बोलणे .

२४) उथळ पाण्याला खळखळाट फार - अल्पज्ञान असलेला आपल्या ज्ञानाचा फार गाजावाजा करतो.

२५) उंदराला मांजर साक्ष - ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्याच्यावद्दल विचार न करता साक्ष देणे.

२६) उधाराचे पोते सव्वा हात रिते - माल उधार घेणाराचे वजन , माप , भाव इ .मध्ये नेहमी नुकसान होते , म्हणून उधारीचा व्यवहार करू नये. उधार देणारा वजनात मारून फायदा घेतो.

२७) उद्योगाचे घरी ऋद्धीसिद्धी पाणी भरी - उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते .

२८) एक ना धड भाराभर चिंध्या - एकावेळी अनेक गोष्टी केल्याने एकही बरोबर होत नाही.

२९) एकादशीच्या घरी शिवरात्र - अडचणीमागे अडचण येणे .

३०) एका हाताने टाळी वाजत नाही - भांडण एका पक्षाकडूनच होते असे नाही , दुसऱ्या पक्षाचाही त्यात काहीतरी दोष असतो .

३१) ऐकावे जनाचे करावे मनाचे - अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

३२) कधी तुपाशी कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते; तिच्यात बदल होत असतो . सुखदुःखमय जीवन असते.

३३) कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले , तरी कडू ते कडूच - दुर्जन कशानेही सुधारत नाहीत.

३४) कर नाही त्याला डर नाही - जो अपराधी नाही त्याला शिक्षेची भीती वाळगण्याचे कारण नाही.

३५) करावे तसे भरावे - ज्या प्रकारचे कृत्य करावे त्या प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार असावे.

३६) कसायाला गाय धार्जिणी - दुष्ट आणि कठोर माणसाशी सर्व लोक नम्रतेने वागतात.

३७) कानामागून आला आणि तिखट झाला - वयाने लहान असून मोठ्यांना शिकविणे ,वरचढपणा दाखविणे .  लहान असूनही डोईजड.

३८) कामापुरता मामा ताकापुरती मावशी - काम साधून घेण्यापुरते गोड बोलणे .

३९) काप गेले नि भोके राहिली - वैभव नष्ट झाले आणि वैभवाच्या गप्पा किंवा निरर्थक खुणा मात्र शिल्लक राहिल्या.

४०) काखेला कळसा आणि गावाला वळसा - वस्तू जवळ असून भान न राहून तिचा गावभर शोध करणे.

४१) कुन्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच जातभाई फितूर झाला म्हणजे फार घात करतो

४२) कुसंतानापेक्षा निःसंतान बरे - वाईट पुत्र असण्यापेक्षा मुळीच नसलेला वरा .

४३) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे राहत नाही - जी गोष्ट होणारच आहे , ती क्षुल्लक अडथळयास जुमानत नाही .

४४) कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र मनुष्य क्षुल्लक वस्तूच्या लाभाने आनंदतो .

४५) कोळसा किती उगाळला तरी काळाच - वाईट गोष्टीची कितीही छाननी केली तरी त्यातून वाईटच निघणार.

४६) कोरड्याबरोबर ओले जळते - वाईटांच्या संगतीने चांगलेही वाईट होतात.

४७) खऱ्याला मरण नाही- खरे कधी लपत नाही , ते केव्हा ना केव्हा तरी उघडकीस येते.

४८) खायला काळ भुईला भार - निरर्थक , आळसात फुकट आयुष्य घालविणाऱ्याला उद्देशून म्हणतात.

४९) खाई त्याला खवखवे- अपराध करणाऱ्याला आपला अपराध जाणवत असतो.

५०) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी- परिस्थितीशी जुळते न घेणारा व स्वतःच्या मताप्रमाणे वागणारा.

५१) खाण तशी माती- आई-बापांचे गुणधर्म मुलांच्या अंगी उतरतात .

५२) खोट्याच्या कपाळी गोटा - खोटे काम करणाऱ्याला शिक्षा होते.

५३) गर्वाचे घर खाली - अभिमानी माणसाचे शेवटी नुकसानच होते.

५४) गरज सरो वैद्य मरो - आपले काम संपल्यावर उपकारकर्त्याला विसरून जाणे . कृतघ्नपणा दाखवणे.

५५) गरजवंताला अक्कल नसते - गरजू मनुष्य मूर्खासारखा वागतो . / गरजू माणसाला नाईलाजाने मूर्खपणा पत्करूनही याचना करणे भाग पडते.

५६) गाव करील ते राव करणार नाही - गावचे सगळे गावकरी एकमताने वागले तर त्यांच्या हातून महत्कार्य होते , तसे प्रत्यक्ष राजाच्याही हातून होत नाही.

५७) गाढवाला गुळाची चव काय - एखाद्या वस्तूचे महत्त्व अडाणी माणसाला कसे कळणार?

५८) गाढवांचा गोंधळ , लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एके ठिकाणी जमा झाले तर ते मूर्खपणाचीच कृत्ये करणार .

५९) गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता - अरसिक मनुष्याला मौल्यवान गोष्टीची योग्यता कळत नाही.

६०) गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

६१) गोगल गाय अन् पोटांत पाय - कपटी मनुष्य.

६२) घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थितीत लहान - मोठे सर्वच उलट वागू लागतात.

६३) घरोघरी मातीच्या चुली - सर्वसाधारण स्थिती सर्वत्र एकसारखीच .

६४) चालत्या गाड्याला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात विघ्न आणणे.

६५) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाचे केव्हातरी अधिकार गाजविण्याचे दिवस येतात . | प्रत्येकाला केव्हा ना केव्हा वर्चस्वाची संधी मिळते.

६६) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे- गुन्हेगाराला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे .

६७) चोराच्या उलट्या बोंबा - आपणच गुन्हा करून आपणच ओरडा करणे.


No comments:

Post a Comment